Saturday, July 27, 2024
Homeनगरशिक्षक मतदारसंघासाठी मतदानाच्या वेळेत वाढ

शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाच्या वेळेत वाढ

आणखी सहा उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी (5 जून) 4 उमेदवारांनी 6 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 19 अर्ज दाखल झाले असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, मतदानाच्या वेळेत बदल करण्यात आला असून सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी सुधारित वेळ निश्चित करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.

- Advertisement -

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 31 मे पासून अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. उद्या शुक्रवार (7 जून) अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत 19 अर्ज दाखल झाले आहेत. नगर जिल्ह्यातून जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी नामनिर्देशन अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये पंडित सुपडू गव्हारे (जळगाव) यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन राजलदास चावला (नाशिक) यांनी अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन अर्ज सादर केले आहेत.

महेंद्र मधुकर भावसार (धुळे) यांनी अपक्ष व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असे दोन अर्ज सादर केले आहेत. दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे (नगर) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे. काल एकही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज नेले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान निवडणूकीच्या मतदानाची वेळ याआधी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती. परंतू या वेळेत बदल करण्यात आला आहे. मतदानाची सुधारित वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतची निश्चित करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या