काल गुरूपोर्णिमा होती. भ्रमणध्वनीवरती शुभेच्छांचा पाऊस पडला..आणि दिन साजरा झाला. जीवनाच्या पाऊलवाटेवरती असलेला अंधकार नष्ट करतो तो गुरू…दिशा देतो ते गुरू..आधार देतो तो गुरू.. सद्मार्गावर नेतो तो गुरू असे कितीतरी विचार या निमित्ताने समोर आले. खरेतर आपल्याकडे गुरूने जे सांगितले ते करत राहाणे हे शिष्याचे लक्षण मानले जाते.गुरूने फक्त कान तयार करायचे नसतात तर मस्तक घडवायची असतात..जो विचाराने विवेकाची पेरणी करतो आणि सत्याच्या धारणेसाठी असत्याच्या विरोधात उभे राहण्याची शक्ती देतो तो गुरू. गुरूचा मार्ग नेहमीचा प्रकाशाचा असतो.गुरू काय सांगतो यापेक्षा तो कसा जगतो. त्या जगण्याचे अनुकरण शिष्याकडून घडत असते. त्यामुळे लढायला शिकविणारा आणि मनगटा बरोबर मस्तकात शक्ती भरणार्या गुरूंची आज नितांत गरज आहे.
जीवनात चोवीस गुरू दत्तमहाराजांनी केले आहे. खरेतर ज्ञानासाठी गुरू करणे हे उत्तमच आहे. वर्तमानात अनेक क्षेत्र आणि विषय नवनव्याने निर्माण होते आहे. त्यामुळे व्यक्ति ज्या ज्या क्षेत्रात स्वतःला डुंबू पाहातो त्या त्या क्षेत्रात प्रत्येकाला गुरू असतो. गुरूला वय, जात, धर्म, पंथ, शिक्षण, गरीब, श्रीमंत असा कोणताही भेद नसतो. जो जगायला शिकवितो तो गुरू.
अनेकदा वर्गात शिकणारा विद्यार्थी हा देखील शिक्षकासाठी गुरू असू शकतो. निसर्गातील प्राणी,पक्षी देखील जीवनासाठी संदेश देऊन जातात त्यामुळे तेही गुरूच. शाळेत शिकविणारे सारेच गुरू मानत गेल्यांने ती संख्या उंचावते..पण अक्षर साक्षरतेपेक्षा जीवन उन्नत करण्यासाठी जे बळ भरतात, परीस्थितीवर मात करण्याची शक्ती देतात, ज्याचे जगणे हिच शिष्यासाठी प्रेरणा असते अशी माणंस ही गुरूस्थानीच आहे. आपल्या भारतीय पंरपरेत गुरू शिष्य पंरपरा मोठी आहे. त्या पंरपरेतील गुरू आणि शिष्य हे उत्तमोत्तम आहे. त्या पंरपरेने मार्गक्रमण करण्याची गरज आहे. त्या पंरपरेतील नावे वर्तमानात देखील कायम आहेत. याचे कारण त्या गुरूची असणारी ज्ञानसाधना.
भारतीय पंरपरेतील ऋषीमुनी यांची ज्ञानसाधना ही जीवनानुभव होता त्यात लोककल्याणाची धारणा होती. ज्या ज्ञानात लोककल्याण, राष्ट्रहित नाही ते ज्ञान निर्माण करणारा गुरू काय कामाचा? वर्तमानात गुरूचा आदर होतांना दिसत नसल्याची काही प्रमाणात भावना आहे. पण खरच असे चित्र आहे का? ज्ञान आणि आदर यांचा संबंध आहे. जितके ज्ञान अधिक तितका आदर अधिक असतो. गुरूची ज्ञान साधना थांबली की ज्ञानाची पातळी कमी होते.तर शिष्याची ज्ञानसाधना सुरू राहिल्यांने त्याचे ज्ञान उंचावत राहाते. त्यामुळे आदराचा भाग कमी होत जातो का याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे गुरू म्हणून काळाच्या ओघात सातत्यांने पात्र राहायचे असेल तर ज्ञानाची साधना सातत्यांने सुरू ठेवावी लागेल.
विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या ज्ञानातील अंतर पस्तीस मिनिटापुरते असेल तर आदरही पस्तीस मिनिटेच राहाणार आहे.त्यामुळे ते अंतर वाढविले, की आदर कमी होण्याची शक्यता नाही. ज्ञानासाठी शिष्य आणि गुरू यांच्यात वादही हवा. मी सांगितले तेच खरे असे वर्तमानात नाही होऊ शकत. पाश्चात्य देशात माझा गुरू आदराला पात्र आहे पण त्यांच्या मताला मी पाठींबा देऊ शकत नाही असे म्हणणारे शिष्य पंरपरा आहे. आपल्याकडे देखील ती पंरपरा निर्माण झाली तर सत्यापर्यत पोहचता येईल. सत्याचा शोधा मार्ग दाखविणे हे गुरूचे काम आहे. अनुकरण प्रियता रूजविणे म्हणजे गुरूत्व नव्हे. त्यामुळे संघर्षाची शक्ती देणे, बंडखोरीचा विचारे देणारे गुरू वर्तमानात हवे आहेत. आपली भारतीय पंरपरा हजोरा वर्ष सुरू आहे, पण त्या पंरपरेचे पाईक होण्यासाठीचा मार्ग अनुसरणे महत्वाचे आहे. पैसा नाही म्हणून वर्गाच्या बाहेर काढणे , पैसा नाही म्हणून शिक्षण नाकारणे आणि सर्व काही पैशासाठी करणे… आणि तरीसुध्दा आम्हाला इतिहासातील गुरूसारखा सन्मान मिळायला हवा असं म्हणणे म्हणजे आपण इतिहास समजावून न घेणेच आहे.
त्यामुळे सातत्याने ज्ञानाची साधना करीत शिक्षकांने आचार्यभावापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे. पोहचता येणार नाही म्हणून प्रयत्न न करणे हे गुरूचे लक्षण निश्चित नाही. सतत प्रयत्न करीत ध्येयापर्यत चालत राहाणे महत्वाचे आहे. त्या प्रवासातून उत्तम शिष्य निर्माण होतील. शेवटी अक्षरांनी काय घडेल माहित नाही, पण जीवनाच्या प्रवासात योग्य दिशेने प्रवास घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यांने व आत्म उन्नतीची दिशा दाखविल्यांने रामकृष्ण पंरमहंसांनी नरेंद्र दत्त यांचे विवेकानंदात रूपांतर केले.
हा काही नावातील बदलाचा प्रवास नाही तर जीवनधारेत आणि विचारातील बदल आहे. त्यामुळे या बदलांच्या दिशेने जाण्यासाठी पाऊलवाट निर्माण करीत प्रवास सुरू ठेवणे हीच गुरूपोर्णिमा…!
– संदीप वाकचौरे
(लेखक हे शिक्षक आणि शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक आहेत.)