पेठ | प्रतिनिधी Peth
महाराष्ट्र-गुजरात सीमारेषेवर गेली कित्येक दिवसांपासून वनतस्करांनी हैदोस मांडल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी वनविभाग सतर्क झाला आहे. वनविभागाने झरी-बेजावड रस्त्यावर कारवाई करून लाखो रुपयांचे सागवान, वाहने तसेच घोरपडी जप्त केल्या. याप्रकरणी सहा जणांना जेरबंद करण्यात आले.
वनसंपदेच्या तस्करीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वनविभाग प्रयत्नशील असताना तस्करांकडून हुलकावणी दिली जात होती. वनविकास महामंडळाचे फिरते पथक व झरी- आंबे वनपरिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचार्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार झरी-बेजावड रस्त्यावर पहाटे ४ वाजेदरम्यान पिकअप वाहन (जीजे-०५ बीएस ४९४०) व होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (जीजे-१५ ईजे ५०१७) यांच्यासह ६ आरोपी भरत शिवा ठाडर, पिंट्या ठाडर, निलेश जोगार, निलेश दोडका, ढवळू मांडे, सुरेश दोडका सर्व राहणार गुजरात तसेच सागवान इमारती ६ नग (६५३ घ. मि.) तसेच २ जिवंत घोरपडींसह जेरबंद करण्यात यश मिळवले.
या कारवाईत सागवान इमारती लाकूड किंमत ३,९३,४७८ रुपये तसेच पिकअप वाहन २,५०,०००, मोटरसायकल १ लाख १० हजार असा मिळून ७,५३,४७८ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
वनविभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. सुजित नेवसे, सहा. व्यवस्थापक धीरज परदेशी, प्रवीण डमाळे याच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश बलय्या, वनपाल भरत तायडे, चेतन चौरे, नितीन, वनरक्षक कुंदन राठोड, गणेश म्हस्के, नावेद सय्यद, मंगेश वाघ आदींनी सहभाग घेतला. याप्रकरणी भारतीय वन अधिनियम व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ नुसार गुन्ह्याची नोंद करून आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.




