Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाINDvsAUS 2nd Test : भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, रहाणेचं ट्विट ठरतेय चर्चेचा...

INDvsAUS 2nd Test : भारताचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, रहाणेचं ट्विट ठरतेय चर्चेचा विषय

दिल्ली l Delhi

भारताने एडिलेडचा बदला मेलबर्नमध्ये घेतला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मेलबर्न कसोटी ८ गडी राखून जिंकली. याआधी ऑस्ट्रेलियाने एडिलेड कसोटी ८ गडी राखून जिंकली होती.

- Advertisement -

मेलबर्नच्या दुसऱ्या कसोटीत विजय झाल्यामुळे चार कसोटी सामन्यांच्या ‘बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी’ स्पर्धेत भारताने १-१ अशी बरोबरी साधली. यामुळे मेलबर्नमध्येच होणार असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याचे महत्त्व आणखी वाढले. मेलबर्नमध्ये तिसरी कसोटी ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. आधी तिसरी कसोटी सिडनीत होणार होती. मात्र सिडनीत कोरोना संकटाची तीव्रता जास्त असल्यामुळे तिसरी कसोटी मेलबर्नमध्येच खेळवण्याचा निर्णय झाला आहे.

एडिलेड कसोटीत ३६ धावांवर ऑल आउट झाल्यानंतर भारताचा ८ विकेटनी लाजिरवाणा पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात नियमीत कर्णधार विराट कोहली आणि जलद गोलंदाज मोहम्मद शमी यांच्या शिवाय उतरलेल्या भारतीय संघाने कमाल केली. अजिंक्य रहाणेने फलंदाजीत शतकी खेळी करून टीकाकारांना चोख उत्तर दिले. पण त्याच वेळी उत्तम कर्णधार कसा असतो हे देखील दाखून दिले.

दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनी ६४ धावांची भर टाकली. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २००वर संपुष्टात आल्याने भारताला विजयासाठी ७० धावांची गरज होती. विजयासाठीचे सोपे लक्ष्य पार करताना भारताची सुरूवात खराब झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो पाच धावावर करून बाद झाला. त्यानंतर आलेला अनुभवी चेतेश्वपर पुजारा देखील लवकर बाद झाला. पुजाराला कमिन्सने ३ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर शुभमन गिल (नाबाद ३५) आणि अजिंक्य रहाणे (नाबाद-२७) यांनी विजयासाठीची औपचारिकता पूर्ण केली.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने कालच्या ६ बाद १३६ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. कॅमरून ग्रीन आणि पॅट कमिन्स हे दोघे मैदानावर होते. पहिल्या काही ओव्हर भारतीय गोलंदाजांनी ही जोडी फोडण्याचे खुप प्रयत्न केले पण त्याला यश मिळाले नाही. अखेर ९० षटकानंतर नव्या चेंडूने जसप्रीत बुमराहने भारताला ब्रेक मिळून दिला. त्याने पॅट कमिन्सला २२ धावांवर बाद केले आणि ऑस्ट्रेलियाची सातवी विकेट घेतली. या दोघांनी ५७ धावांची भागिदारी केली. त्यानंतर पदार्पणाची कसोटी खेळणाऱ्या मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलिया दोन धक्के दिले. त्याने प्रथम कॅमरून ग्रीनला ४५ धावांवर माघारी पाठवले आणि मग नॅथन लायनला जडेजाकडे कॅच देण्यास भाग पडले. दुसऱ्या सत्राचा खेळ संपण्याआधी अश्विनने जोश हेजलवुडची बोल्ड काढली आणि ऑस्ट्रेलियाचा २०० धावांवर ऑल आउट केला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. बुमराह, अश्विन, जडेजा यांनी प्रत्येकी २ तर यादवने एक विकेट घेतली.

या ऐतिहासिक विजयानंतर अजिंक्य रहाणेनं एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोसोबत एक सुंदर असं कॅप्शनही पोस्ट केलं आहे. रहाणेचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय आहे. रहाणेच्या या ट्विटने सर्व नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. अजिंक्य रहाणेनं बॉक्सिंग डे कसोटी सामना जिंकल्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये संपूर्ण भारतीय संघ दिसत आहे. यामध्ये सपोर्ट स्टापपासून खेळाडू आणि नेट गोलंदाजाचाही समावेश आहे. या फोटोवर अजिंक्य रहाणेनं ट्विट करत म्हटलं आहे की, ‘स्पेशल टीम, स्पेशल विजय’ रहाणेचं हे ट्विट व्हायरल झालं आहे.

विजयानंतर अजिंक्य रहाणेचं सर्वच स्तरातून कौतुक होतं आहे. लक्ष्मण, सचिन,कैफ आणि विराट कोहली यांच्यासह अनेक दिग्गजांनी रहाणे आणि भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या कसोटीत झालेला दारुण पराभव विसरत ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजलं. कर्णधार अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात नाबाद २७ धावा झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अजिंक्यच्या या शतकी खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यानिमीत्ताने त्याला मानाचं Johnny Mullagh Medal देण्यात आलं.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या