लोणी |वार्ताहर| Loni
संगमनेर पोलीस ठाण्यात दुचाकी आणि मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल असलेला किशोरवयीन मुलाला चोरी करताना नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात लोणी पोलीसांना यश आले.
शनिवारी लोणी खुर्द येथील लोमेश्वर कलेशन शेजारील घरात सायंकाळच्या वेळी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या सुदर्शन वैराळ, वय 16 वर्षे रा.संगमनेर याला काही नागरिकांनी संशय आल्याने घराला गराडा घातला. लोणी पोलिसांना कळवल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन त्याला घरातून ताब्यात घेतले.
यावेळी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो संगमनेर येथील रहिवाशी असल्याचे समोर आले. सध्या तो लोणी येथे संगमनेर रोडवर भाडोत्री घरात रहात आहे. त्याच्या सोबत त्याची आई रहात असून ती एका संस्थेत कंत्राटी कामगार आहे. लोणी पोलिसांनी संगमनेर पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती घेतली असता तेथे त्याच्यावर दुचाकी व मोबाईल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली.
हा आरोपी अल्पवयीन असल्याने व त्याच्यावर गुन्हे दाखल असल्याने संगमनेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या आरोपीने शुक्रवारी पिंपरी निर्मळ गावातील एका बिल्डिंग मटेरिएलच्या दुकानातून रोख रक्कम चोरल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून आले आहे. सदर मुलगा अल्पवयीन असला तरी तो सराईत गुन्हेगार असल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले.