Monday, May 27, 2024
Homeनाशिकतहसीलदार डॉ. अहिरराव यांचा शासकीय सेवेचा राजीनामा

तहसीलदार डॉ. अहिरराव यांचा शासकीय सेवेचा राजीनामा

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (सर्वसाधारण) डॉ. राजश्री हरिश्चंद्र अहिरराव यांनी गुरुवार दिनांक २६ रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शासकीय सेवेतून त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने त्यांचा राजकारण प्रवेशाचा मार्ग सुकर आणि प्रशस्त झाला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात त्यांनी एकूण १६ वर्षे सेवा केली आहे. त्यापैकी नाशिक जिल्ह्यात तहसीलदार म्हणून १४ वर्ष महसूल सेवा व सन २०२१ पासून ऑक्टोबर २०२३ पर्यंत त्या जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे तहसीलदार पदावर कार्यरत होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २००७ मध्ये नायब तहसीलदार पदी त्यांची निवड झाली होती.

त्यानंतर त्यांनी २००८ ते २००९ साली निवासी नायब तहसीलदार निफाड, २००९ ते २०१३ दरम्यान नाशिक निवासी तहसीलदार, सन २०१३ ते १४ साली तहसीलदार निफाड २०१४, १५  साली तहसीलदार राहुरी, जिल्हा अहमदनगर, २०१५ ते २०१८ दरम्यान तहसीलदार नाशिक, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक ,२०१८ ते २०२१ तहसीलदार संजय गांधी निराधार योजना जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, २०२१ ते २०२३ दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक, येथे तहसीलदार सर्वसाधारण या पदावर शासकीय सेवा केली आहे.

सन १९९४ ते २००७ कालावधीत त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्रात सेवा केलेली आहे. विधानसभेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीतच त्यांचे नाव उमेदवार म्हणून चर्चेत होते. त्यांना सासरी आणि माहेरी राजकारण तसेच समाजकारणाचा वारसा मिळाल्याने त्यांचीही लोकप्रतिनिधी म्हणून जनसेवा करण्याची सुप्त इच्छा होती. मात्र शासकीय सेवेत असल्याने त्यांना गावोगाव काही उपक्रम, योजना, कार्यक्रम राबवताना मर्यादा येत होत्या. त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमातील सहभाग आणि उपस्थिती बाबत नाशिकरोड देवळाली विधानसभा मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे यांनी वेळोवेळी हरकती घेऊन त्यांच्याविरुद्ध शासन, प्रशासन, राज्य सरकारकडे तक्रारी केल्या होत्या.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मध्यंतरी प्रसार, समाज माध्यमात आरोप- प्रत्यारोपांच्या फेरीही दोघींमध्ये झडल्या होत्या. मात्र आता तहसीलदार पदाचा राजीनामा दिल्याने डॉ. राजश्री अहिरराव या राजकारणात सक्रिय होणार असल्याचे आणि देवळाली मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. एक कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, कार्यक्षम, निष्कलंक, अनुभवी, उच्च शिक्षित प्रशासकीय सेवेतील अधिकारी म्हणून डॉ.अहिरराव यांची प्रतिमा असल्याने ती त्यांची जमेची बाजू ठरेल.

प्रबळ इच्छुक म्हणून उमेदवारीसाठी त्या अनेक राजकीय पक्षांच्या संपर्कात आहेत. काही पक्षांनी त्यांना उमेदवारीसाठी ऑफरही दिलेली आहे. मात्र मतदार संघातील बदलती राजकीय समीकरणे बघून त्या कुठल्या पक्षाकडे मतदारसंघ जातो, याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी त्यांनी सध्या तरी कुठल्याही राजकीय पक्षात थेट प्रवेश न करता वेट आणि वॉचची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे देवळालीतील इतरही दावेदारांमध्ये नक्कीच चलबिचल निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या