Sunday, May 19, 2024
Homeब्लॉगटेलिमेडिसीन काळाची गरज...

टेलिमेडिसीन काळाची गरज…

रुग्णांच्या उपचारामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यालाच ‘टेलिमेडिसीन’ म्हणतात. फोनपासून इ-मेलपर्यंत आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअरपर्यंत विविध साधनांचा उपचारासाठी केलेला वापर टेलिमेडिसीन ठरतो. आता या संकल्पनेचा देशात वेगवान प्रसार होणे आवश्यक आहे.

आजच्या काळात बरेचदा रुग्ण आहे तिथे डॉक्टर उपलब्ध नसतात आणि जिथे डॉक्टर आहे तिथे रुग्णाला घेऊन जाणे शक्य नसते. विशेषतः ग्रामीण भागामध्ये हे चित्र सर्रास दिसते. या समस्येवर गेल्या दोन-तीन दशकांमध्ये तंत्रज्ञानाने मार्ग शोधले आहेत. रुग्णांच्या उपचारामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यालाच ‘टेलिमेडिसीन’ म्हणतात.

सर्वसाधारणपणे टेलिमेडिसीन म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात झालेला व्हिडिओ कॉल असे समजले जाते. परंतु टेलिमेडिसीनची व्याप्ती तेवढ्यापुरतीच मर्यादित नाही, तर फोनपासून इ-मेलपर्यंत आणि इ-मेलपासून अत्याधुनिक सॉफ्टवेअरपर्यंत विविध साधनांचा उपचारासाठी केलेला वापर टेलिमेडिसीन ठरतो. टेलिफोन यंत्रणा अस्तित्वात येऊन शंभरहून अधिक वर्षे झाली. मोबाईललादेखील तीसएक वर्षे होत आली. परंतु प्रत्यक्ष रुग्णाच्या उपचारात या तंत्रज्ञानाचा वापर फार उशिरा सुरू झाला. 1940 च्या दशकात पेनसिव्हेनिया राज्यात वीस मैल दूर असलेल्या रुग्णाचे काही रिपोर्ट लँडलाईन टेलिफोनद्वारे डॉक्टरकडे पाठवण्यात आले आणि संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. तरीदेखील या तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा वाढवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला खूप काळ जावा लागला. पुढे पन्नासच्या दशकात नेबास्का विद्यापीठात अमेरिकेमध्ये आणि त्याच सुमारास कॅनडामधील माँट्रियलमध्ये रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात दृश्यमान संवाद साधता येईल, अशी प्रणाली विकसित करण्यात आली.

- Advertisement -

पुढे या क्षेत्राचे महत्त्व ओळखून नासा आणि अमेरिकन सरकारच्या आरोग्य विभागाने सत्तरीच्या दशकात यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करायला सुरुवात केली. डॉक्टर पोहोचले नसलेल्या आणि रुग्णसेवेचे जाळे अत्यल्प असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आले. भारत सरकारला याचे महत्त्व कळले आणि इस्रो या संस्थेने 2000 मध्ये टेलिकॉमवर आधारित रुग्णसेवा देण्याचे तंत्रज्ञान विकसित केले, पण ही निव्वळ सुरुवात होती आणि भारतात हे सर्व अत्यंत वेगाने विकसित होण्याची गरज होती. भारतामध्ये आजही ग्रामीण भागात डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. अशावेळी थातूरमातूर उपाय आणि गावोगाव पसरलेल्या भोंदूंचे जाळे फोफावते. आपल्याकडील लोकसंख्या विचारात घेता उपलब्ध असलेली रुग्णालये, त्यातली सेवासुविधा अत्यंत अपुरी आहे.

कोणत्याही सरकारी रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी असते. खासगी रुग्णालयातील दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात नाहीत. दिल्लीच्या एम्स या सरकारी रुग्णालयात दररोज तब्बल दहा हजार रुग्ण विविध प्रकारच्या तपासण्या आणि डॉक्टरांच्या सेवा सल्ल्यासाठी येतात. जी अवस्था दिल्लीतल्या एम्सची तीच मुंबईतल्या केईएम आणि जे. जे. इस्पितळातली. त्यात भर तातडीच्या केसेसची. डॉक्टरांची अपुरी संख्या, वॉर्डबॉय आणि नर्सेसची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणे या सगळ्या समस्या पाचवीला पुजलेल्या. हेच चित्र सर्वसामान्यपणे मेट्रो शहरात आणि इतर जिल्हा सरकारी रुग्णालयात दिसते.

कोविडकाळानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवा बहाल करण्याचे अनेक यशस्वी प्रयोग शासकीय आणि खासगी पातळीवर जोमाने सुरू आहेत. या सगळ्या प्रकारातून मिळणार्‍या रुग्णसेवेचे निकाल खूप आश्वासक आहेत आणि यात खर्च कमी करण्याची संधी देखील आहे. अंतिमतः याचा फायदा रुग्णांनाच होऊ शकतो. टेलिमेडिसीन म्हणजे फक्त व्हिडिओ कन्सल्टेशन नव्हे तर रुग्णाची याआधी केलेल्या चाचण्यांच्या विविध प्रकारची माहिती, झालेली औषधोपचार योजना, झालेल्या शस्त्रक्रिया, घातक ठरणार्‍या अ‍ॅलर्जी याची महत्त्वाची माहिती रुग्ण समोर असताना डॉक्टरला उपलब्ध असणे हेदेखील अंतर्भूत आहे. टेलिमेडिसीनचे जागतिक चित्र खूपच आशावादी आहे आणि यात देशोदेशी अत्यंत उत्कंठावर्धक असे प्रयोग यशस्वी झालेले दिसतात. विकसित राष्ट्रांमध्ये टेलिमेडिसीनचा वापर सर्रास केलेला आढळतो आणि त्या पद्धतीने केलेला उपचार मान्यता पावत आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये हे वळण अद्याप रुजायचे आहे आणि याच देशांमध्ये गरज आणि संधी आहे. परंतु या देशांमध्ये धोरण सातत्याचा अभाव दिसून येतो.

भारतातदेखील 20 वर्षांनंतर हा प्रयोग सर्वमान्य झाला असे दिसत नाही. याचे कारण यातील यशोगाथा व्यवस्थित सांगितल्या गेल्या नाहीत आणि सुस्पष्ट मॉडेल डॉक्टरांसमोर ठेवले गेले नाही. त्यात नियम, तरतुदी, विविध प्रकारची धोरणे-त्यांचा अडसर ही महत्त्वाची बाब आहे.

या प्रक्रियेत राष्ट्रीय पातळीवरून राज्यपातळीवर आणि पुढे जिल्हा पातळीपासून तालुकास्तरापर्यंत एक सुहीत आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असे जाळे उपलब्ध असण्याची गरज आहे. या व्यवस्थेत परस्पर सामंजस्य सहकार्य नसल्याने दिरंगाई दिसून येते. 2005 मध्ये आपल्याकडे आरोग्य विभागाने केंद्रीय पातळीवर नॅशनल टेलिमेडिसीन टास्क फोर्स स्थापन केली. त्यानंतर या सर्व प्रकाराला गती आली आणि आयसीएमआर – आरोग्यश्री अशा प्रकारच्या अभिनव योजना राबवण्यात आल्या. परदेशात 911 अथवा 101 हा नंबर फिरवला की ताबडतोब तातडीने वैद्यकीय सहाय्य पुरवले जाते. आपल्याकडे 108 नंबर फिरवल्यावर रुग्णवाहिकेसकट डॉक्टर्स उपलब्ध होतात. ही खूप दिलाशाची बाब आहे. मोठी नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा टेलिमेडिसीनचा खरा उपयोग होतो. भारतात मात्र रुग्ण आणि डॉक्टर एकमेकांसमोर नसतील तेव्हाच या संकल्पनेचा वापर होताना दिसतो. याचे एक प्रमुख कारण म्हणजे 75 टक्के डॉक्टर्स शहरात आहेत आणि 65 टक्के जनता खेडेगावात आहे. टेलिमेडिसीनसाठी एक सक्षम नियमन करणारी अधिकृत संस्था ही काळाची गरज आहे. त्यांनी अशा प्रकारच्या सेवेला योग्य ते निकष लावून पूर्ण तपासाअंती अधिकृतता प्रदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे ही व्यवस्था अधिकाधिक समाजाभिमुख होईल आणि विश्वासास पात्र होईल. आज सरकारी पातळीवरील कल्पकता आणि नियंत्रण व्यवस्था यात बदल होणे अपेक्षित आहे.

या संकल्पनेच्या अंमलबजावणीमध्ये रुग्णसेवेतल्या शिखर संस्था, डॉक्टरांच्या संस्था यांचा प्रत्यक्ष सहभाग मोलाचा आहे. कारण अनेक ठिकाणी डॉक्टर्स टेलिमेडिसीनचा वापर करायला कचरतात. त्यातून काही कायदेशीर झंझटी निर्माण झाल्या तर त्याला कोण जबाबदार? ही भीती दडली आहे. सरकारी पातळीवरील अनास्था ही गंभीर बाब आहे. आज सक्षम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ते परवडणार्‍या किमतीतही आहे. मध्य प्रदेशमध्ये इस्रो या संस्थेने टेलिमेडिसीनचे जाळे उभे करण्यासाठी टेलिव्हिजन, संगणक आणि अत्याधुनिक सॉफ्टवेअर्स उपलब्ध करून दिली. पण त्याचा पुरेसा वापर झाला नाही. सॉफ्टवेअर योग्यवेळी अपग्रेड केली गेली नाहीत. रुग्णांचा विश्वास संपादन करण्यासाठी सरकारी आणि खासगी पातळीवरून प्रयत्न झालेच नाहीत. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणावर घरगुती उपचार आणि बोगस डॉक्टर ही घातक साखळी आपण तोडू शकलो नाही. शिवाय या क्षेत्राचा हुकमी वापर करण्यासाठी लागणारी तज्ज्ञांची फौैजही आज उपलब्ध नाही. एखाद्या रुग्णाने आपला वैद्यकीय पूर्वेतिहास, चाचण्यांचे रिपोर्ट टेलिमेडिसीनच्या माध्यमातून डॉक्टरपर्यंत पोहोचवले तर त्याच्या गोपनियतेचे आणि सुरक्षिततेचे काय हे पाहावे लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरुकता आणावी लागेल. तज्ज्ञांची उपलब्धता तातडीने होणेही गरजेचे आहे. अजूनही अनेक रुग्ण डॉक्टरशी प्रत्यक्ष बोलण्यात एकप्रकारचे समाधान अनुभवतात. फोनवर बोलताना ते अवघडलेले असतात. यात काही प्रमाणात तथ्य आहे. यासाठी विविध खासगी सेवाभावी संस्थांच्या जाळ्याचा वापर करता येईल.

महाकुंभाच्या वेळी टेलिमेडिसीनचा वापर यशस्वीपणे झाला. आज इस्रोच्या व्हिलेज रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागात वाढणार्‍या मधुमेहावर यशस्वी उपचार होत आहेत. अशी जवळपास 500 केंद्रे आज उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात डिपार्टमेंट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या खात्याने टेलिमेडिसीनच्या वापरासंदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे घालून विश्वासार्हता वाढवली आहे. कोविडकाळात प्रत्यक्ष डॉक्टर, रुग्ण भेटू शकत नव्हते किंवा टेलिमेडिसीनचा वापर करून डॉक्टरांनी अक्षरश: हजारो रुग्णांचे जीव वाचवले. हा एक चमत्कारच म्हणायला हवा.

- Advertisment -

ताज्या बातम्या