चांदवड | प्रतिनिधी chandwad
आज (८ ऑगस्ट) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर सोग्रस येथे भरधाव छोटा हत्ती (क्र. MH15 HH 3559) ने शाळकरी मुलांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. यात अक्षय रमेश महाले (विद्यार्थी) याचा जागीच मृत्यू झाला तर सोग्रस-मालसाने परिसरातील ११ विद्यार्थी व महिला गंभीर जखमी झाले.
जखमींमध्ये लक्ष्मी शंकर गांगुर्डे, ओम शंकर आहेर, वैष्णवी उर्फ समृद्धी सतिष पवार, रोहित साहेबराव पवार, शुभम ज्ञानेश्वर पवार, पायल शंकर गांगुर्डे, वर्षा निवृत्ती गोधडे, सविता शंकर गांगुर्डे, शुभम कैलास महाले, आदित्य शंकर गांगुर्डे, दीपक बाळू केदारे यांचा समावेश आहे.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करत घटनेचा तीव्र निषेध केला. वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे महामार्ग काही काळ ठप्प राहिला.
घटनास्थळावरून प्रवास करत असलेले शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तत्काळ थांबत जखमींना रुग्णवाहिका व इतर वाहनांतून रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. चांदवड उपजिल्हा रुग्णालयात गंभीर जखमींना प्राथमिक उपचार देऊन पिंपळगाव व चांदवड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, आमदार डॉ. राहुल आहेर यांनीही तातडीने घटनास्थळी व खाजगी रुग्णालयांना भेट देत जखमींची विचारपूस केली. तसेच प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत व तत्पर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, पोलीस निरीक्षक कैलास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक आखेगावकर यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा दाखल होऊन ग्रामस्थांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली.




