Sunday, September 8, 2024
Homeनाशिकदहा वर्षीय सोनाक्षीकडून मलंगगड सर; सिन्नर तालुक्यातील पहिलीच महिला बाल ट्रेकर्स

दहा वर्षीय सोनाक्षीकडून मलंगगड सर; सिन्नर तालुक्यातील पहिलीच महिला बाल ट्रेकर्स

सिन्नर | प्रतिनिधी

शहरातील शिवाजी नगर भागातील लक्ष्मीनारायण लॉन्स परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या सोनाक्षी रमेश शिरसाठ या दहा वर्षाच्या चिमुकलीने नुकताच कल्याण जवळील मलंगगड बालेकिल्ला सर करत तालुक्यातील पहिलीच महिला बाल ट्रेकर्स बनण्याचा मान मिळवला आहे.

- Advertisement -

सोनाक्षीचे वडील व आई हे माळेगाव औद्योगिक वसाहतीत काम करतात. वडील रमेश यांना गड-किल्ले सर करण्याची पहिल्यापासून आवड आहे. सुट्टीच्या दिवशी ते आपल्या मित्रपरिवारासोबत विविध गडांवर व डोंगरांवर ट्रेकिंगसाठी जात असतात. त्यामुळे सोनाक्षीलाही वडीलांकडे बघून ट्रेकिंगची आवड निर्माण झाली.

त्यानंतर सोनाक्षीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर वडिलांसोबत ट्रेक करू लागली. वयाच्या चौथ्या वर्षी तिने हरिहर किल्ला गड सर केला होता. याची दखल घेऊन तीला नारी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता नुकतेच तीने ट्रेकिंगसाठी सगळ्यात अवघड असलेला मलंग गड बोलकिल्ला सर करुन आपल्या ट्रेकिंगच्या आवडीला वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले.

हा किल्ला सर करण्यासाठी तिला पॉइंट ब्रेक अ‍ॅडव्हेंचरचे जॉकी साळुंखे व वडील रमेश शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. मलंग गड किल्ल्याची उंची 3 हजार 200 फूट आहे. नियमित ट्रेकिंग करणार्‍या ट्रेकर्ससाठी हा किल्ला मध्यम श्रेणीत गणला जातो. मात्र, बालट्रेकरसाठी हा किल्ला अवघड श्रेणीतला म्हणावा लागेल.

सोनाक्षीने पॉइंट ब्रेक टीमसोबत पहाटे पाच वाजता किल्ला चढाईला सुरुवात केली. किल्ल्यावर जायला तीन ते साडेतीन तास लागतात. ब्रिटिशांच्या हल्ल्यामध्ये किल्ल्याच्या पायर्‍या तुटून गेल्याने गडावर चढाई करणे जिकरीचे आहे. साधारणपणे तीन हजार फूट खोल दरीला जोडण्यासाठी १२ ते १५ फूट लांबीचा लोखंडी पाइप बसवलेला आहे. त्यावरुन चालत जावे लागते. थोडीशी हलगर्जीही ट्रेकरला मरणदारात घेऊन जाऊ शकते.

अशा ठिकाणी चिमुकल्या सोनाक्षीने प्रबळ इच्छाशक्ती व शारीरिक क्षमतेच्या जोरावर सोनाक्षीने बालेकिल्ला सर केला. या किल्ल्यावर सहा पाण्याच्या टाक्या आहेत. तसेच एक छोटा वाडा आहे. ज्याला छप्पर नाहीये. मात्र, त्याच्या भिंती अजूनही शाबूत आहे. गडावर पोहोचल्यावर सोनाक्षीसह वडील रमेश व साथीदारांनी शिवरायांचा जयघोष केला. सोनाक्षीने हा किल्ला सर करत तालुक्यातील बाल ट्रेकर्समध्ये पहिलीच ट्रेकर्स बनली आहे. तीच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

आतापर्यंत 30 गड-किल्ले सर

सोनाक्षीचे वडील रमेश हे नेहमी गड भ्रमंतीला जात असताना महाराजांचा इतिहास तिला सांगत असतात. आपल्या पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराज माहित रहावे त्यासाठी त्यांनी बनवलेले स्वराज्य बघणे गरजेचे आहे. सह्याद्री फिरुन सह्याद्री प्रमाणेच तीलाही कणखर बनवण्याचा वडील रमेश यांचा उद्देश आहे. त्यानूसार सोनाक्षीने आतापर्यंत आपल्या वडीलांबरोबर 30 गड-किल्ले सर केले आहे. त्यात सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, हरिहर, लोहगड, विसापूर, मल्हारगड, अंजनेरी, ब्रह्मगिरी, दुर्ग भंडार अशा अनेक किल्ल्यांचा समावेश आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या