तालिबानने (Taliban) अखेर अफगाणिस्तान (Afghanistan) सरकारची स्थापना केली आहे. या मंत्रिमंडळातील बहुतांश जणांवर गंभीर गुन्हे ( Serious crimes) दाखल आहेत किंवा त्यांना दहशतवादी (Terrorist) घोषित करण्यात आलेले आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुल्ला हसन अखुंद (Mulla Hassan Akhund) या कुख्यात दहशतवाद्याकडे तालिबानने पंतप्रधानपद ) Prime Minister’s post) सोपवले आहे. याखेरीज जगभरात होणार्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यांचा मास्टरमाईंड (Mastermind of suicide bombings )म्हणून कुख्यात असणार्या सिराजुद्दीन हक्कानीकडे गृहराज्यमंत्रीपदाची (Minister of State for Home Affairs to Sirajuddin Haqqani) जबाबदारी असणार आहे. यावरुन अफगाणिस्तानात आता दहशतराज सुरू होणार हे स्पष्टपणाने दिसत आहे.
तालिबानची मानसिकता, कार्यपद्धती आजही पूर्वीसारखीच आहे, हे आता पूर्णतः स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नजिकच्या भविष्यात अफगाणिस्तान टेरर स्टेट म्हणून पुढे येणार असून अवघ्या जगासाठी ती खूप मोठी डोकेदुखी ठरणार आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेला आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. कारण तालिबान सुधारलेला आहे हा अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा एक प्रमुख आधार होता. याच आधारावर अमेरिकेने दोहामध्ये तालिबानशी चर्चा केली होती. अशा अमेरिकेला ही प्रचंड मोठी चपराक आहे.
तालिबानने जाहीर केलेले नवे मंत्रिमंडळ 33 जणांचे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मंत्रिमंडळामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. अफगाणिस्तान हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे शासन कारभारामध्ये महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्त्व दिले जावे, अशी तरतूद या देशाच्या घटनेमध्ये करण्यात आलेली आहे. असे असूनही तालिबानने महिलांना प्रतिनिधित्त्व डावलले आहे.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अफगाणिस्तानात एकूण 12 वांशिक टोळ्या आहेत. यामध्ये पख्तुन, ताझिक, उझबेक, हजारा यांचा समावेश होतो. त्यांचा विचार करून पाहिल्यास तालिबानचे मंत्रिमंडळ या सर्वांना सामावून घेणारे नाहीये. साहजिकच, या मंत्रिमंडळावरुन अनेक मतभेद निर्माण झाले आहेत. त्यातून तालिबान हे एकसंध राहिलेले नाही, ते विभागले गेले असल्याचे समोर येत आहे.
मुळातच तालिबानमध्ये एकूण सहा टोळ्या आहेत. या सहा टोळ्यांमध्ये सत्तेवरुन कमालीची स्पर्धा निर्माण झाली होती, संघर्ष निर्माण झाला होता. त्यामुळेच हे मंत्रिमंडळ स्थापन होत नव्हते. पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचे प्रमुख फईज अहमद अफगाणिस्तानात ठाण मांडून बसले होते. त्यामुळे या सरकार स्थापनेमध्ये पाकिस्तानचा खूप मोठा हात असल्याचे स्पष्ट होते. मंत्रिमंडळातील महत्त्वाची सत्तापदे पाकिस्तानधार्जिण्या तालिबानी टोळ्यांना देण्यात आली आहेत.
काही दिवसांपूर्वीपर्यंत मुल्ला बरादर तालिबानच्या राजवटीखालील अफगाणिस्तानचे नवे प्रमुख बनणार अशी चर्चा होती. बरादर पाकिस्तानच्या तुरुंगामध्ये दहा वर्षे कैदेत होता. पाकिस्तानची त्याच्याबाबतची भूमिका नकारात्मक होती. त्यामुळे पाकिस्तान त्याला कैदेतून मुक्त करण्यास तयार नव्हता. पण काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेच्याच सांगण्यावरुन पाकिस्तानला मुल्ला बरादरला मुक्त करावे लागले होते. याच मुल्ला बरादरने दोहा अॅग्रीमेंटमध्ये सहभागी होऊन अमेरिकेशी चर्चा केली होती.
त्यामुळे पंतप्रधान बनल्यानंतर बरादरची भूमिका ही अमेरिकाधार्जिणी राहण्याची भीती पाकिस्तानला होती. म्हणूनच एकाएकी बरादरला बॅकफूटवर ढकलण्यात आले. त्याजागी मुल्ला हसन अखुंद याचे नाव पुढे आले. मुल्ला अखुंद हे अत्यंत रहस्यमय किंवा गूढ स्वरुपाचे व्यक्तिमत्त्व मानले जाते. मुळात अखुंद जिवंत आहे की नाही याविषयीच साशंकता आहे. गेल्या 30 वर्षांत अख्ख्या जगाकडे या व्यक्तीचा केवळ एकच फोटो उपलब्ध आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने त्याला दशहतवादी घोषित केले असल्याने तो काबूलमध्ये येऊ शकत नाही. 9/11 ला अमेरिकेवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यापूर्वीच त्याला ब्लॅक लिस्ट केले आहे.
तालिबान 1.0 च्या सरकारमध्ये अखुंद अत्यंत सक्रिय होता. इतकेच नव्हे तर भारतात कार्यरत असणार्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांंबरोबर त्याचे अत्यंत घनिष्ट संबंध होते. इतकेच नव्हे तर एअर इंडियाच्या विमानाचे अपहरण घडवून आणणारा मास्टरमाईंड हा दुसरा तिसरा कोणी नसून तो मुल्ला अखुंदच होता. तत्कालीन परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह मौलाना मसूद अझहरला दहशतवाद्यांच्या हवाली करण्यासाठी कंदहारला गेले होते तेव्हा त्याला अखुंदनेच स्वीकारले होते.
थोडक्यात, जैश ए मोहम्मद, लष्करे तैय्यबा, आयएसआय, पाकिस्तानी लष्करी अधिकार्यांशी अत्यंत घनिष्ट संबंध असणारा दहशतवादी म्हणून अखुंदची ओळख आहे. तथापि, तो अद्यापही पुढे आलेला नाही. कदाचित जाहीरपणाने जगासमोर आल्यास अमेरिकन गुप्तहेर संघटनांकडून त्याला टिपले जाण्याची भीती असावी. अन्यथा, त्याच्या नावाने राज्यकारभार चालवला जात असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हा सर्व पाकिस्तानचा कट आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
मुल्ला अखुंदच्या निर्दयीपणाची जगाला ओळख झाली ती अफगाणिस्तानातील बामियान मधील ऐतिहासिक बुद्धमूर्तींच्या विध्वंसामुळे. अत्यंत निर्घृणपणाने त्याने या बुद्धमूर्तींवर तोफांनी हल्ले केले आणि अफगाणिस्तानचे पारंपरिक वैभव लयाला घालवले. अशी व्यक्ती तालिबानच्या शासनाचा प्रमुख म्हणजेच पंतप्रधान बनणार असेल तर त्यावरुन हे सरकार कोणत्या प्रकारे काम करेल, हे वेगळे सांगायला नको. भारतासाठी या सर्व गोष्टी चिंता वाढवणार्या आहेत.
कारण भारताचे आजही शेकडो प्रवासी अफगाणिस्तानात अडकून पडलेे आहेत. त्यांना सुरक्षा मिळणे गरजेचे आहे. पण ही जबाबदारी तालिबानच्या नव्या शासनात गृहराज्यमंत्री बनलेल्या सिराजुद्दीन हक्कानी याच्याअंतर्गत येते. सिराजुद्दीन हक्कानी हा हक्कानी नेटवर्कचा एक महत्त्वाचा मोहरा मानला जातो. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने आणि अमेरिकेने दहशतवादी घोषित केले आहे. जगभरात होणार्या आत्मघाती बॉम्बहल्ल्यांचा मास्टरमाईंड म्हणून तो कुख्यात आहे.
दोन वर्षांपूर्वी भारताच्या काबूलमधील दुतावासावर दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यात 50 जण मरण पावले होते. याची जबाबदारी हक्कानी नेटवर्कने घेतली होती. हक्कानी नेटवर्क हे सर्व दहशतवाद्यांना रसद पुरवणारे आणि पूर्णपणे पाकिस्तानच्या आधीन असलेले आहे. त्यामुळे भारतापुढील आव्हाने वाढली आहेत.
तालिबानच्या मंत्रिमंडळातील संरक्षण खाते याकूब ओमरकडे देण्यात आले आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला ओमर याचा हा मुलगा आहे. या मंत्रिमंडळातील 33 पैकी बहुतांश जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत किंवा त्यांना दहशतवादी घोषित करण्यात आलेले आहे. अलीकडेच अफगाणिस्तानच्या सरकारी वृत्तवाहिनीवरुन काही व्हिडिओ दाखवण्यात आले.
गेल्या 20 वर्षांमध्ये तालिबानी योद्ध्यांनी आत्मघाती हल्ले करुन, बॉम्ब हल्ले करुन ज्या-ज्या लोकांना ठार मारण्यात आले, त्या सर्व कारवायातील हत्यारे, बॉम्बगोळे यांची भव्य यात्रा काढून त्याचा हा व्हिडिओ होता. यातून तालिबान शासनाने योग्य तो संदेश जगाला दिला आहे. याखेरीज अल् कायदा, आयसिस खोरातन, तहरीक ए तालिबान आदी दहशतवादी संघटनांचे हजारो कार्यकर्ते अफगाणिस्तानच्या भूमीवर पोहाचले आहेत. अलीकडेच अल् कायदाने तालिबानबरोबर एक बैठक केली.
सारांश, अमेरिकेने सैन्यमाघारीचा निर्णय घेऊन एक खूप मोठी घोडचूक केलेली आहे. संपूर्ण जगाला याची किंमत मोजावी लागणार आहे.