मुंबई | Mumbai
मुंबईतील मराठी माणसांचा मुद्दा हाती घेत एकत्र आलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनसे आणि उद्धवसेना या पक्षांची मुंबई महानगपालिका निवडणुकीसाठी युती झाली आहे. त्यांचे मुंबईतीली जागावाटपही झाले आहे. जागावाटप करून उमेदवार निश्चित झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंकडून मुंबईकरांसाठी वचननामा आणि सभांच्या नियोजनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे बंधुंचा वचननामा पुढील आठवड्यात प्रसिध्द केला जाणार आहे.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा महापालिकेच्या निमित्ताने येत्या ५ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. म्हणजे सोमवारपासून ठाकरे बंधूंच्या सभा गाजणार आहे. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता यावी म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे बंधूंनीही एकत्र येऊन मुंबई राखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
थोड्यावेळापूर्वी पार पडलेल्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी या बाबात अधिकृत माहिती दिली की, ठाकरे बंधूंच्या उद्धवसेना आणि मनसे या पक्षांचा वचननामा ४ जानेवारी रोजी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा मुंबई महानगरपालिका आणि एमएमआरमधील महानगरपालिकांच्या क्षेत्रात होणार आहेत, अशी माहिती उद्धवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी दिली आहे.
या ठिकाणी होणार सभा
मुंबईत पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर आणि शिवाजी पार्क आदी ठिकाणी ठाकरे बंधूंच्या तीन सभा होणार आहेत. कल्याण, डोंबिवली, ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी एकेक सभा होणार आहे.नाशिकला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही एक सभा होणार आहे. तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या महापालिकांमध्ये स्वतंत्र सभाही होणार आहेत. महापालिका निवडणुकीला अवघे १४ दिवस उरले आहेत. तसेच मनसे आणि ठाकरे गटातील नेत्यांच्याही सभा होणार आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्याही संयुक्त सभा होणार असल्याचे समजते आहे. तसेच उद्धव सेना आणि मनसेचा वचननामा हा एकत्रित असणार आहे. तसेच आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे या वचननाम्यावर काम करत आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




