मुंबई | Mumbai
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) सत्ताधारी शिंदे गट व भाजप यांच्यावर हल्लाबोल करतांना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी अंधारेंनी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात (Lalit Patil Drug Case) शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांचा सहभाग असल्याचे म्हटले होते. त्यावरून चांगलेच राजकारण तापले होते. अशातच आता सुषमा अंधारे यांनी पोलिसांच्या बाबतचा एक व्हिडीओ एक्सवर (ट्विटर) शेअर करत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे…
सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, “उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जनस्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड”, असे त्या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.
दरम्यान, व्हिडीओमध्ये दिसणारा नेमका हा प्रकार काय आहे, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही. तसेच हा व्हिडिओ सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केला आहे. त्यामुळे आता या व्हिडिओवर फडणवीस काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
सुषमा अंधारेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक पोलीस व्हॅन उभी असून त्या व्हॅनच्या आडोशाला काही पोलीस काही व्यक्तींशी बोलत असल्याचं दिसत आहे. हा प्रकार पुण्यातला असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. काही वेळाने त्या लोकांनी पोलिसांना काही पाकिटं दिली आणि ही पाकिटं घेऊन पोलीस व्हॅनच्या आत गेले. आतमध्ये कैदी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.