नाशिक | प्रतिनिधी
नाशिकची निवडणुक दिवसेंदिवस चुरशीची होताना दिसत आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यातच ठाकरे गटाचे नाराज असलेले उमेदवार विजय करंजकर यांनी बंडखोरी करत आज शेवटच्या दिवशी अर्ज भरल्याने नाशिकच्या निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट पहायला मिळाला आहे. नाशिकची थेट लढत होणार नसून इथे पाच उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होईल असे चित्र दिसत आहे.
विजय करंजकर हे महाविकास आघाडीकडून नाशिकच्या जागेवरून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते. त्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून त्यांनी महायुतीतून देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजय करंजकर हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार, अशा चर्चा देखील काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. अखेर त्यांनी आज अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला.
करंजकर यांनी आज अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाबरोबरच महायुतीचेही टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे मतांच्या विभाजनाचा फटका नेमका कोणाला बसणार हे ठामपणे सांगता येणार नाही.
विजय करंजकर काय म्हणाले
काही दिवसांपुर्वी मी फॉर्म घेऊन ठेवला होता तो तो घरी काय वाळीत ठेवायचा होता का त्यामुळे मी आज अर्ज दाखल केला आहे. अजून दोन दिवस आहे मी कार्यकर्त्यांसोबत बैठक, मेळावा घेऊन काय तो निर्णय घेऊ. बंडखोरी करण्याच्या प्रश्नावर करंजकर म्हणाले, तुका म्हणे पुत्र व्हावा ऐसा गुंडा लागो तिन्ही लोकी झेंडा, पक्षाने मला एक वर्षापुर्वीच सांगितलं होतं तुम्हाला लढायचं आहे जोमात सुरु व्हा, मी एक वर्षापासून फिरत आहे मी माझ्या मतदारसंघात दोन तीन फेऱ्या झाल्या आहे आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने उमेदवारी नाकारली तर ते कारण मला कळायला पाहीजे होतं आणि ते जर कळालं असतं तर अधिक बरं झालं असतं, म्हणून मी फॉर्म भरला आहे, बाकी बघु.