मुंबई | Mumbai
उद्धव ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी पुन्हा एकदा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना टार्गेट केले आहे. यामुळे रामदास कदम आणि अनिल परब यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. वाळू उपसा प्रकरण आणि कांदिवली येथील सावली बारवरून परबांनी मंत्री कदमांना घेरले होते. कांदिवलीतील सावली बार हा मंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावावर असल्याचे परब यांनी म्हटले होते. ज्यानंतर सोमवारी (ता. 21 जुलै) मंत्री योगेश कदम यांनी परबांनी केलेले आरोप फेटाळत त्यांना प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्र्यांच्या स्वत:च्या आईच्या नावाने डान्सबार चालतो. त्यावर कारवाई कोण करणार? अशाप्रकारे डान्सबारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरावायला लाज वाटत नाही का, असा सवाल ठाकरे गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मुंबई उपनगरातील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या ‘सावली’ या बारचा मुद्दा पुन्हा उचलून धरला.
आमदार अनिल परब यांनी माहितीच्या अधिकाराच्या आधारे सर्व माहिती बाहेर काढत मंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी परब यांनी केली आहे. स्वतः माजी मंत्री रामदास कदम यांनी सावली बार हा त्यांच्या पत्नीच्या नावे असल्याचे मान्य केल्याचे परबांनी म्हटले आहे.
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि महसूल मंत्र्यावर आरोप केले. त्यांच्या मातोश्रीच्या नावाने असलेला बार आहे, त्यात डान्सबार चालवला जात होता. अश्लील नृत्य केले जात होते. पैसे उडवले जात होते. मी सर्व माहिती माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. ही माहिती खोटी असू शकत नाही. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीत २२ बारबाला, २२ गिऱ्हाईक आणि चार कर्मचारी यांच्यावर कारवाई केली आहे. बारचे नियम तुडवले गेले आहेत.
पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले की, सावली बारविषयी खुलासा करताना रामदास कदम म्हणाले आहेत की हा बार माझ्या पत्नीच्या नावाने आहे. पण हा बार नाही तर तो डान्सबार आहे. त्यामुळे आता बारची मालकी कोणाकडे आहे, याबद्दल कोणताही संभ्रम राहिलेला नाही. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो, तो सुद्धा पोलीस स्टेशनच्या नाकाच्याखाली. हे गृहराज्यमंत्री नवी मुंबईपर्यंत डान्सबारवर रेड करायला जातात. का तर अश्लीलता पसरते म्हणून, अनैतिक धंदा आहे म्हणून, समाजविघातक कृती म्हणून हे रेड करतात. त्याला हरकत नाही, हे चांगले काम आहे. पण स्वत:च्या आईच्या नावाने जो डान्सबार चालतोय, त्यावर कोण कारवाई करणार?, असा सवाल अनिल परब यांनी उपस्थित केला.
त्यांनी माझा उल्लेख अर्धवट वकील म्हणून केला आहे. त्यांना एक गोष्ट कळली पाहिजे, मी विधानसभेत वकील म्हणून बोलत नाही. विधानसभेत मी आमदार म्हणून बोलतो. माझ्या आमदारकीची चौओथी टर्म आहे. विधानसभेचे नियम आणि कायदे मला चांगले माहीत आहे. त्यामुळे मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही.
कागदपत्रांत काय उल्लेख आहे?
आम्हाला माहीत नव्हते असे म्हणत असतील तर ३१ तारखेला रेड झाली, तशीच २८ मे २०२३ रोजी झाली होती. दुसरी रेड 10/8/2023 ला झाली होती. म्हणजे दोन दोन रेड या बारवर झाल्या आहेत. याचे पुरावे आहेत. माझे कागद नाही. या एफआयआरच्या कॉपी आहेत. माहितीच्या अधिकारात मिळाली आहे. म्हणजे तुमच्या बारमध्ये अश्लीलता चालते, पोरी चालवल्या जातात हे तुम्हाला माहीत आहे. हे माहीत असून तुम्ही काळजी घेतली नाही. त्यामुळे या निमित्ताने तुमची जबाबदारी सिद्ध होते, असा दावा अनिल परबांनी केला.
डान्सबारचा परवाना कोणाकडे?
डान्सबार आम्ही चालवत नाही. आम्ही चालवायला दिला आहे. जो चालवतो त्याच्यावर जबाबदारी आहे, असे त्यांनी सांगितले. कायद्याच्या तरतुदी आणल्या आहेत. तुमच्या नोकराने, किंवा तुम्ही ज्याला प्राधिकृत केले त्याने एखादे दुष्कृत्य केले तर त्याची जबाबदारी कुणाकडे. एक नोकरनामा असतो. तुम्ही कुणाशीही अग्रीमेंट करा, त्याला काही किंमत नाही. कोणताही डान्सबार चालवताना एक नोकरनामा असतो. त्यात चालवणाऱ्याची माहिती द्यावी लागते. माझ्याकडे नोकरनामा आहे. त्यावर मालकाला सही करावी लागते. एखादे कृत्य तुमच्यावतीने जो प्राधिकृत झाला आहे, त्याने केले तर त्याची जबाबदारी काय? म्हणजे तुमच्या वतीने ज्या कोणी प्राधिकृत केला असेल जो काम करत असेल तो जबाबदार असला तरी हे कृत्य ज्याच्या नावाने परवाना आहे, त्याने केले असे समजण्यात यावे, असा टोला परब यांनी कदम यांना लगावला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




