बँकॉक | Bangkok
एका स्कूल बसला लागल्याने आगीत २५ विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना थायलंडमध्ये घडली आहे. थायलंडच्या खु खॉट शहराजवळ असलेल्या झीर रंग्सीत मॉलनजीक मार्गावर सदर बसला अचानक आग लागली. भारतीय वेळेनुसार दुपारी १२.३० वाजता ही घटना घडल्याचे समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या स्कूल बसमध्ये शिक्षकांसह एकूण ४४ जण होते. त्यांच्यापैकी १६ जण गंभीररित्या भाजले असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
या बसमध्ये ३ ते १५ वर्षे वयोगटातील मुलं असल्याची माहिती आहे. त्याच्यासोबत ५ शिक्षकही प्रवास करत होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य हाती घेण्यात आले. मात्र पोलिसांनी अद्याप मृतांचा निश्चित आकडे दिलेला नाही. त्यामुळे अधिक मृत्यू झाले असल्याचीही साशंकता व्यक्त केली जात आहे.
१६ विद्यार्थी आणि तीन शिक्षकांना आतापर्यंत रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही आग कशी लागली याबाबत सध्या कुठली अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, ही बस सहलीसाठी जात असताना तिचा पुढचा एक टायर फुटला. यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटले आणि बस धातूच्या खांबाला धडकली. यामुळे बसला आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या भयंकर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.