इंदोरमधील सिमरोल परिसरात एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली. महाविद्यालयाच्या एका माजी विद्यार्थ्याने प्राचार्यांना पेटवून दिले. प्राचार्या त्यांचे काम संपवून महाविद्यालयातून परत जात असताना ही दुर्घटना घडली. प्राचार्यांची स्थिती गंभीर आहे. त्या 90 टक्के भाजल्याचे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. तो विद्यार्थी गुंड प्रवृत्तीचा असून याआधीही त्याने एका प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल असल्याचे त्या वृत्तात म्हटले आहे. या घटनेचे धागेदोरे शोधण्याचा पोलीसांचा प्रयत्न सुरु आहे. त्यातुन घटनेमागच्या कारणांचा कदाचित उलगडा होईल. पण कारणे कोणतीही असली तरी विद्यार्थ्याचे कृत्य समर्थनीय नाहीच किंवा विद्यार्थी गुंड प्रवृत्तीचा आहे असे म्हणून ही घटना दुर्लक्ष करण्यासारखी देखील नाही. या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात जे कोणाही संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारे ठरावेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद हरवत चालला असावा का? पुर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यात आपुलकीचे नाते असायचे. शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण वाढीकडे आणि शाळाबाह्य वर्तनाकडेही बारीक लक्ष असायचे. ही प्रक्रिया आता थांबली असावी का? तसे असेल तर त्याची कारणे काय असावीत? एका वर्गातील विद्यार्थ्यांची वाढती संख्या असे त्याचे एक कारण सांगितले जाते. शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे. त्यातून शिकवायलाच पुरेसा वेळ मिळत नाही. मग विद्यार्थ्यांशी आपुलकीचे नाते निर्माण कसे आणि कधी होणार, असा प्रश्न शिक्षक विचारतात. या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी आंदोलन देखील केले होते. ‘आमच्या वेळचे शिक्षक’ हा ज्येष्ठांचा जिव्हाळ्याचा विषय. व्यक्तीमत्वावरील शिक्षकांच्या प्रभावाचा अभिमानाने उल्लेख करतात. किती शिक्षक माणुस घडवण्याची जबाबदारी म्हणून त्यांच्या पेशाकडे पाहातात? मुलांवर संस्कार करण्याची आणि मुल्ये रुजवण्याची जबाबदारी शाळेची, पर्यायाने शिक्षकांची असते असे बहुसंख्य पालक मानतात. पण चांगला माणुस घडवण्याची जबाबदारी फक्त त्यांचीच आहे का? त्या प्रक्रियेत पालक आणि समाजाचाही तितक्यात समरसतेने सहभाग अपेक्षित असतो. मुले त्यांच्या पालकांना त्यांचा आदर्श मानतात याचे भान किती पालकांना असते? पुर्वीच्या काळी घराच्या परिसरात राहाणार्या ज्येष्ठांकडून आपसुकच परिसरातील मुलांचे सामाजिक पालकत्व स्वीकारले जायचे आणि समाजाचीही त्याला मान्यता होती. त्यामुळे मुलांच्या शाळा आणि घरबाह्य सामाजिक वर्तनावर कडक नजर ठेवली जायची. चुक दिसेल तिथे ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जायचा. त्यासाठी प्रसंगी दोन फटकेही दिले जायचे. त्याला कोणाचाही फारसा आक्षेप नसायचा. परिसरात एखादे तरी संस्कार केंद्र चालवले जायचे. पालक देखील मुलांना सक्तीने त्या केंद्रात पाठवायचे. सामाजिक पालकत्वाचा समाजाला विसर पडला असावा का? इंदोरच्या घटनेचा व्यापक दृष्टीकोनातून विचार केला जायला हवा. चांगला माणूस घडवण्याला प्राधान्य दिले जायला हवे. ती जबाबदारी सामुहिक आहे. याचे भान ठेवण्याची वेळ आला आली आहे.