मुंबई | Mumbai
बारामतीमध्ये काल, रविवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये बावनकुळे यांच्या या मागणीसंदर्भात विचारले असता, शरद पवार यांनी बावनकुळे यांच्यावर जोरदार टीका केली. या व्यक्तीचे जनमानसात नक्की काय स्थान आहे, हे मला माहिती आहे. ते आता भाजपा प्रदेशाध्यक्ष आहेत. जेव्हा मागची विधानसभा निवडणूक झाली होती. तेव्हा भाजपाने बावनकुळेंना तिकीट देखील दिले नव्हते. भाजपा हा त्यांना तिकीट देण्यासाठी सुद्धा लायक समजत नाही, अशा व्यक्तीबद्दल आपण काय बोलायचे, अशी बोचरी टीका शरद पवार यांनी बावनकुळे यांच्यावर केली होती.
यावरून महाराष्ट्र भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे जेवढे वय आहे त्याहून अधिक वर्षे शरद पवार यांची राजकीय कारकीर्द आहे. आपल्याहून लहान कार्यकर्त्याला बळ देणे, प्रोत्साहन देणे हे पवार यांना माहिती नाही म्हणून ते बावनकुळे यांच्याविरोधात बोलले आहेत. हाच त्यांच्या राजकारणाचा स्वभाव राहिला आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन तुकडे झाले आणि त्यांच्या राजकीय भूमिकांबद्दल आम्ही बोलायची गरज नाही. त्यांचे सहकारी अजित पवार आणि छगन भुजबळ यावर बोलले आहेत, असे प्रत्युत्तर भाजपाने दिले आहे.
भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांचे काम बघून त्यांना भाजपने प्रदेशाध्यक्ष केले आहे. संघटना सर्वोपरी या धारणेने ते काम करत आहेत, असे सांगून, शरद पवार आणि विरोधकांना बोलायला मुद्दे नाहीत, त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत; पण आम्ही पवार आणि ठाकरे यांना प्रश्न विचारत राहणार. हिंदू धर्म संपविणाऱ्या स्टॅलिनला तुमचे समर्थन आहे का? असा सवाल महाराष्ट्र भाजपाने केला आहे. कंत्राटी भरतीसाठीचा जीआर काढून तशी भरती प्रक्रिया राबविल्याबद्दल आणि नोकरीचे स्वप्न बघणाऱ्या तरुण पिढीची फसवणूक केल्याबद्दल माफी कधी मागणार? असा प्रश्नही भाजपाने केला आहे.