पुणे | प्रतिनिधी
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा नगरीमध्ये ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाल्यानंतर १००वे मराठी साहित्य संमेलन हे ‘न भूतो न भविष्यति’ व्हावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. त्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जाईल आणि कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ९९व्या संमेलनाचा समारोप दि.४ रोजी त्यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराजे देसाई, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संमेलनाचे संरक्षक फरोख कूपर व उद्योजक ऋषिराज यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साहित्य संस्थांमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप केला जाणार नाही तसेच हिंदीची सक्ती होणार नाही. मराठी भाषेचा सन्मान वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी मराठी भाषा भवन, दिल्लीतील कुसुमाग्रज भाषा केंद्र आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचांचा उल्लेख केला. एआयचे आव्हान असले तरी मराठी ही जागतिक व्यवहाराची भाषा व्हावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी संमेलनासाठी ३ कोटी रुपयांची मदत देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
साताऱ्यात मोठ्या संख्येने साहित्यप्रेमी उपस्थित राहिल्याने संमेलनाची शोभा वाढल्याचे त्यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा ९९ वर्षांची परंपरा असलेला मराठी भाषेचा उत्सव असून मराठी स्वाभिमानाचे माहेरघर आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी मांडलेल्या एसटी स्थानकांवर पुस्तकविक्री गाळे सुरू करण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले.
स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी चार दिवसांत सुमारे आठ लाख साहित्यरसिकांनी संमेलनाला भेट दिल्याचे सांगितले. यंदाचे संमेलन यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावर अधिक प्रकाश टाकण्याचे आवाहन केले. तसेच ९९व्या संमेलनाला मिळालेल्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर पुढील नाट्य संमेलनाचे यजमानपद साताऱ्याला मिळावे, अशी मागणीही त्यांनी केली.




