Monday, June 24, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित; प्रकाश सोळंकेंचा दावा

माझ्या घरावरील हल्ला पूर्वनियोजित; प्रकाश सोळंकेंचा दावा

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

- Advertisement -

माझ्या घरावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. माझे घर जाळणाऱ्यांमध्ये माझ्या राजकीय विरोधकांचे कार्यकर्ते, समाजकंटक होते आणि बिगर मराठा समाजाचे कार्यकर्ते होते, असा खळबळजनक दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे (जि. बीड) आमदार प्रकाश सोळंके यांनी गुरुवारी येथे  केला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये घडलेले हिंसक आंदोलन हे गृह खात्याचे अपयश असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा आंदोलन पुकारले. या आंदोलनाला पाठिंबा देताना बीड जिल्ह्यात हिंसक घटना घडल्या. ३० ऑक्टोबरला प्रकाश सोळंके यांचा माजलगाव येथील बंगला जाळण्यात आला. आंदोलकांनी सोळंके यांच्या गाड्यांना आग लावली तसेच बंगल्यावर दगडफेकही केली. या पार्श्वभूमीवर सोळंके यांनी आज पत्रकार परिषदेत काही खळबळजनक दावे केले.

त्या दिवशी माझ्या बंगल्यासमोर जो जमाव जमला होता त्यामध्ये मराठा समाजाशिवाय इतर समाजाचीही माणसे होती. त्याचबरोबर जे अवैध धंदे करणारे, वाळू, गुटखा, हातभट्टी, धान्याचा काळाबाजार करणाऱ्या समाजकंटकांचाही यात समावेश होता. माझे ३० ते ३५ वर्षांपासूनचे काही राजकीय विरोधक आहेत, त्यांचे कार्यकर्ते त्या जमावात दिसत होते. त्यांच्या संस्थेत काम करणारे कर्मचारी आणि शिक्षक सुद्धा जमावात होते, असा आरोप करत २५० ते ३०० च्या संख्येने असलेल्या जमावापासून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनीच आपल्याला वाचवले, असा दावा सोळंके यांनी यावेळी केला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या घरावर चालून आलेल्या जमावाकडे शस्त्र, कुऱ्हाडी, पेट्रोल बॉम्ब तसेच मोठ्या प्रमाणात दगड होते. मला मारण्याच्या पूर्ण तयारीनिशी हा जमाव माझ्या घरावर चालून आला होता. पूर्वनियोजित कट करुन हे लोके माझ्या घरावर दगडफेक करत होते. माझ्या घरात घुसून त्यांनी जाळपोळ केली. फर्निचरचे नुकसान केले. जमाव चालून आला तेव्हा मी घरात एका ठिकाणी बसलो होतो. माझ्या तीन गाड्या जाळल्या. मला भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळल्या. जमाव ज्या तयारीने आला होता ते पाहता त्यांचा हेतू जाळपोळ करणे, दगडफेक करणे आणि माझ्या जीविताला हानी पोहचवणे हाच होता. तसे नियोजन त्यांनी केले होते. मात्र मी घरात ज्या ठिकाणी बसलो होतो, तिथे ते पोहोचू शकले नाहीत, अशी माहिती प्रकाश सोळंके यांनी दिली.

या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज मी पाहिले. त्यात इतर आंदोलक या दगडफेकीला विरोध करत होते. ज्यांनी माझा जीव वाचवला ते सुद्धा मराठा समाजाचेच कार्यकर्ते होते. त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला सीसीटीव्हीचे फुटेज दिले आहे. त्यामध्ये समाजकंटक, मला राजकीय विरोध करणारे स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे सरसकट सर्वांना अटक न करता तुम्हाला कॅमेऱ्यात दगडफेक करताना जे दिसत आहेत त्यांनाच अटक करण्याची विनंती आपण पोलीसांना केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. बीडची घटना म्हणजे गृहखात्याचे पूर्णपणे अपयश आहे. ज्या घटना घडल्या त्यावेळी पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या