Monday, November 25, 2024
Homeअग्रलेखमूळ उद्देश समजावून घ्यावा

मूळ उद्देश समजावून घ्यावा

 निसर्गचक्रात आणि मानवाच्या अस्तित्वात झाडांचे महत्व वेगळे सांगायला नको. प्राणवायूचा पुरवठा करणारा वृक्ष हा एकमेव स्रोत मानला जातो. हिंदी महासागर क्षेत्रातील समुद्रातील उष्णतेच्या लाटांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. पुण्यातील हवामान शास्त्रज्ञांच्या एका गटाने याचा अभ्यास करून हा निष्कर्ष नोंदवला आहे, असे प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हंटले आहे. जंगले, पर्यायाने झाडांची संख्या मोठ्या संख्येने वाढवणे हा तापमानवाढ रोखण्याचा एक प्रभावी उपाय आहे यावर अभ्यासकांचे एकमत आढळते. प्रदूषण नियंत्रणात देखील झाडे कळीची भूमिका बजावतात. अनेक सामाजिक संस्था या क्षेत्रात काम करतात. सर्वांना पावसाचे वेध लागले आहेत. पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणवर घेतले जातात. व्यक्तिगत आणि संस्थात्मक पातळीवर पावसाबरोबरच वृक्षारोपणाचे वेध लागतात असे आजकाल गमतीने म्हंटले जाते. इतक्या मोठ्या प्रमाणात शहरी परिसरात झाडे लावण्याचे कार्यक्रम स्वयंस्फूर्तीने घेतले जातात. तथापि झाडे लावणे हा एक इव्हेन्ट किंवा कार्यक्रम नाही तर ती एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे याकडे अभ्यासक वारंवार लक्ष वेधत आहेत. झाडे लावलीच पाहिजेत तथापि त्यामागचा उद्देश समजावून न घेता केले गेलेले वृक्षारोपण फक्त वाया जाते. अभ्यास न करता लावली गेलेली झाडे तितक्या प्रमाणात जगत नाहीत. रोपांबरोबरच माणसांचे कष्टही वाया जातात आणि वृक्षारोपणाचे अस्तित्व फक्त छायाचित्रांपुरते उरल्याचे आढळते. रस्त्यांच्या कडेला अशा मृत झाडांचे अवशेष अनेक ठिकाणी आढळतात. वृक्षारोपणामागचे शास्त्र लोकांनी समजावून घेण्याची गरज आहे. देशी झाडे लावावीत, परदेशी झाडे लावू नयेत या अभ्यासकांच्या आवाहनांमधील तथ्य लोकांनी जाणून घ्यायला हवे. तापमानवाढीमागे अनेक कारणे असली तरी भारतात परदेशी वृक्षांची संख्या वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर तापमानवाढ होत असल्याचा दावा अभ्यासक करतात, तो का? हेही कळायला हवे. राज्य एकच असेल तरी विविध ठिकाणी वातावरण वेगळे असते. स्थानिक जैविविधतेत वैविध्य आढळते. पावसाचे प्रमाणही एकसारखे नसते. काही ठिकाणी तो प्रचंड कोसळतो तर काही ठिकाणी भिजपाऊस होतो. मातीचा कस, पाण्याची आणि जागेची उपलब्धता आणि नैसर्गिक परिसंस्थेची गरज यातही सारखेपणा आढळत नाही. याचा अभ्यास करूनच त्या त्या भागाच्या गरजेनुसार झाडे लावावीत असे अभ्यासक सांगतात. उदाहरणार्थ कडुनिंब उष्ण आणि कोरड्या हवामानात जोम धरतो, मग तो कोकणात बहरेल का? कदंबाला ओलावा चांगल्या पद्धतीने टिकवून ठेवणारी माती लागते, मग तो डोंगराळ भागात जोम धरेल का असा प्रश्न वृक्षारोपण अभ्यासक शेखर गायकवाड विचारतात. त्यामागील शास्त्र लोक समजावून घेतील का? पर्यावरण पूरक अनेक वृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचीही जपणूक या माध्यमातून केली जाऊ शकेल. नाशिकमध्ये जाणीवपूर्वक फुलवलेल्या देवराया लोकांनी आवर्जून पाहायला हव्या. याबाबत जागरूकता वाढायला हवी. तात्पर्य, झाडांची संख्या वाढवण्यासाठी वृक्षरोपण मोहीमा मोठ्या प्रमाणात आखल्या जायलाच हव्यात. फक्त त्याचा इव्हेन्ट होऊ नये. त्यामागचा उद्देश साध्य व्हायला हवा. त्यासाठी गरज आहे ती जागरूक होऊन ती प्रक्रिया समजावून घेण्याची. आणि ती फार अवघड नाही असे अभ्यासक सांगतात. ती सामाजिक जबाबदारी आहे याचे भान ठेऊनच यावर्षी वृक्षारोपण केले जाईल अशी अपेक्षा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या