Sunday, September 15, 2024
HomeUncategorizedगोरगरीब जनतेला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्यावा-अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ द्यावा-अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासोबतच त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

संत एकनाथ रंगमदिर येथे पीएम स्वनिधी महोत्सव अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. कराड बोलत होते. यावेळी एसबीआयचे उप महाप्रबंधक रविकुमार वर्मा, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, रविंद्र निमक, राहुल सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा परिषदेचे अशोक कायंदे, प्रशासन अधिकारी रोहिदास दुरकुलकर आदी उपस्थित होते.

ग्रामीण आणि शहरी भागातील जनतेचे अधिकाधिक प्रमाणात आर्थिक समावेशन झाल्यास देशाच्या अर्थकारणाला गती मिळेल असे सांगून डॉ.कराड म्हणाले, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला व्यवसायासाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी बँकांचा पुढाकार महत्वाचा ठरणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. बँक खाते नसलेल्यांचे खाते उघडणे, विमा योजनेचा सर्वसामान्यांना लाभ देणे आणि अर्थ सहाय्यापासून वंचित असलेल्यांना ते उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे कराड म्हणाले.

महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांना केंद्रीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि त्यासंबंधीची जागरूकता वाढवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. फेरीवाल्यांचे बँकेत खाते, आधार आणि महानगरपालिकेत नोंदणी असल्यास त्यांना स्वनिधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. प्रथम 10 हजार रुपये कर्ज आणि वेळेवर परतफेड केल्यास नंतर 20 हजार व त्यानंतर 50 हजार रुपये कर्ज देण्यात येईल. योजनेतून फळविक्रेते, भजीविक्रेते तसेच फेरीवाले व छोटे व्यावसायिक यांच्या कौटुंबिक अर्थव्यवस्थेला हातभार लागणार आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा लाभ शहरी भागासोबतच ग्रामीण भागात लाभ देण्यासाठी बँकांनी काम करावे तसेच गरजू नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

देशात सुमारे 49 कोटी जनधन खाते सुरू करण्यासोबत या खात्यांशी आधार व मोबाईल जोडणी केल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत पोहोचविणे शक्य झाले. प्रधानमंत्री आयुषमान भारत योजना,उज्वला गॅस योजना यासह विविध योजनेतून सर्वसामान्यांना आधार देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात एसबीआयचे उप महाप्रबंधक रविकुमार वर्मा यांनी पीएम स्वनिधी महोत्सव अंतर्गत लाभार्थ्यांना कर्ज वाटपाविषयी माहिती दिली

- Advertisment -

ताज्या बातम्या