त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून त्र्यंबकेश्वरला कुशावर्त ते गायत्रीमंदिर पर्यंत सिमेंट काँक्रिट स्लॅबखाली बंदिस्त असलेली गोदावरी नदी येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यात मोकळा श्वास घेणार आहे. कारण सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी आज दि.28 मार्च रोजी त्र्यंबकेश्वरला मंत्री गिरीष महाजन आणि आखाडा परिषदेचे महामंत्री यांच्यात झालेल्या बैठकीत गोदावरील स्लॅब काढण्याचा निणय घेण्यात आला.
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रपुरीजी महामंत्री हरिगिरी महाराज तसेच शेकडो साधू, पुरोहित संघाचे प्रतिनिधी भाजपचे पदाधिकारी, देवस्थानचे प्रतिनिधी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या सभागृहात बैठक झाली.
कुशावर्त तीर्थलगत सत्यनारायण मंदिर ते गायत्री मंदिरापर्यंत गोदावरी नदी स्लॅब टाकण्यात आल्याने ऐन त्र्यंबक शहरात बंदीस्त होती. अखेर ती मुक्त करण्याचा निर्णय झाल्याने शहरातील गोदावरीप्रेमी, नागरिकांमध्ये चर्चेचा विषय होता.
बैठकीत श्री चंद्र भगवान घाटापासून प्रयागतीर्थापर्यंत असलेल्या जुन्या नदीच्या बाजूने चार ते पाच किलोमीटर पर्यंत घाट बांधून त्यामध्ये गोदावरी कुशावर्त तीर्थाचे पाणी न्यायचे आणि या संगम घाटात भाविकांना स्नान घडवायचे, अशा प्रकारचे नियोजन यावेळी निश्चित करण्यात आले. यासाठी दोन किलोमीटर पर्यंत पायी पाहणी मंत्री महाजन, साधू-महतांनी केली.सिंहस्थ अमृत स्नान काळात पर्वप्रसंगी आखाडे साधू साधूंचे रामता पंच व निवडक साधू कुशावर्त तीर्थ स्नान करतील असे ठरले. भाविकांसाठी नवीन घाटांमध्ये स्नान व्यवस्था करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरवण्यात आले. त्र्यंबकेश्वरच्या सर्व तलावांमध्ये व अहिल्या गोदा संगमासह इतर घाटांंमध्ये सिंहस्थकाळात बारा महीने पाणी वाहते राहतील असे नियोजन केले जाणार आहे. यावेळी नगरपालिकेचे अधिकारी, देवस्थान, आखाड्यांचे प्रतिनिधी, साधु-महंत आदी उपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा