मनमाड । प्रतिनिधी Manmad
येथील भारतीय अन्न महामंडळाच्या डेपोत गळफास घेतलेल्या अवस्थेत एका मजुराचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दिलकुश चौधरी हे त्या मृत कामगारांचे नाव असून ते बिहारच्या पुर्निया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. दिलकुश चौधरी ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून या मजुराने आत्महत्या केली की घातपात आहे याचा तपास सुरु केला आहे.
शहरातील भारतीय अन्न महामंडळाचा एफसीआय धान्य साठवणूक डेपोत लाखो टन धान्य साठविले जात असल्याने हा डेपो देशासाठी महत्वाचा असल्यामुळे त्याला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचारी, मजूर आणि धान्य घेऊन जाणारे ट्रकचे चालक, क्लीनर यांनाच डेपोत जाण्याची परवानगी आहे तर इतरांना प्रवेशबंदी आहे.
सध्या डेपोत ट्रकमध्ये धान्याचे पोते चढविणे, उतरविणे यासह इतर काम करण्यासाठी ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने मजूरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. गोडाऊन क्र. 88 जवळ दिलकुश चौधरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.