Sunday, December 15, 2024
Homeब्लॉगनव्या आजाराचे आव्हान

नव्या आजाराचे आव्हान

विषाणूजन्य आजारांचा वाढता ससेमिरा हे मानवजातीपुढील आव्हान बनत आहे. करोना महामारीचे सावट अद्यापही पूर्णतः सरलेले नसतानाच ‘मंकी फ्लू’ या नव्या विषाणूजन्य आजाराने दस्तक दिली. त्याचे सावट कायम असतानाच आता देशातील तीन राज्यांत ‘टोमॅटो फ्लू’ या आजाराचा फैलाव वाढत आहे.

विषाणूजन्य आजारांनी सध्या जगभरातील मानवी जीवन त्रस्त झाले आहे. कोविड या आधुनिक मानवी इतिहासातील सर्वात मोठ्या महामारीचा धोका आजही कायम असतानाच मंकी फ्लू या आजाराचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले. यादरम्यान अमेरिकेत पोलिओची लागण झालेले काही रुग्ण आढळल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे. आता एका नव्या आजाराने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आणि लान्सेट या विज्ञानविषयक मासिकाने त्याबद्दल इशारा दिला आहे. टोमॅटो फ्लू असे या आजाराचे नाव असून हा आजार प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये पसरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या आजाराबाबतची गंभीर बाब म्हणजे लान्सेट या मासिकाने भारतात लहान मुलांमध्ये हा आजार वेगाने पसरत असल्याबद्दल इशारा देताना वेळीच तो रोखण्याचे उपाय केले नाहीत तर तो साथीचे रूप घेऊ शकतो आणि प्रौढांमध्येही तो पसरू शकतो, असे म्हटले आहे. यानंतर केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी करून सर्व राज्यांना या आजाराला रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या आजाराचे जे वर्णन केले आहे त्यानुसार हात, पाय आणि तोंड विकाराचा किंवा एचएफएमडी विकाराचा एक प्रकार असावा, असे म्हटले आहे. हा विकार आपल्या देशात दहा वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. लान्सेटनुसार, भारतात आतापर्यंत टोमॅटो फ्लूचे 100 रुग्ण आढळले आहेत. सध्या तरी हा आजार जीवघेणा नाही, पण तो संसर्गजन्य असल्याने त्याचा फैलाव वेगाने होऊन तो प्रौढांमध्येही पसरण्याची भीती आहे.

- Advertisement -

हा एका नव्या विषाणूपासून होणारा आजार आहे. केरळमधील पाच वर्षांखालील मुलांमध्ये हा प्रथम आढळून आला आहे. यावर्षी मे महिन्यामध्ये टोमॅटो फ्लूचा पहिला रुग्ण केरळमधील कोलम जिल्ह्यात आढळून आला. पण अमेरिकेतील एका संशोधनानुसार टोमॅटो तापाचे रुग्ण जगभरात 2007 मध्येही आढळून आले होते.

या आजाराचे मूळ, प्रकार आणि कारणे याविषयी लान्सेटच्या रिपोर्टमध्ये कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मुलांना चिकन गुनिया किंवा डेंग्यूचा ताप आल्यानंतरचा परिणाम म्हणजे टोमॅटो फ्लू, असेही या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हात, पाय आणि तोंड विकारात मुलांच्या अंगावर बारीक पुरळ उठतात, त्यांना खाज सुटते आणि वेदनाही होतात, मुलांना ताप येतो, मळमळते. टोमॅटो फ्लूमध्येही अशीच लक्षणे दिसतात. टोमॅटो फ्लूमध्ये सुरुवातीला ताप येतो त्यानंतर घसा खवखवण्याचा त्रास सुरू होतो. ताप आल्यानंतर दोन-तीन दिवसांनी शरीरावर लाल रंगाचे पुरळ येऊन फोड येतात, ते टोमॅटोसारखे लाल रंगाचे असल्याने त्याला टोमॅटो फ्लू असे म्हटले जाते. टोमॅटो फ्लूचे फोड प्रामुख्याने हात, पाय आणि तोंडात येतात.

टोमॅटो फ्लू हा संसर्गजन्य आजार म्हणजेच संक्रमित व्यक्तीकडून दुसर्‍याला बाधा होत असल्यामुळे हा आजार झालेल्या मुलांना वेगळे ठेवणे आवश्यक आहे. त्यांच्या वापरण्याच्या वस्तू, खेळणी यातून याचा प्रसार होऊ शकतो. म्हणूनच करोनाबाधित व्यक्तींचे ज्याप्रमाणे विलगीकरण केले जात होते तशाच प्रकारे टोमॅटो फ्लू झालेल्या रुग्णांपासून शारीरिक अंतर राखणे गरजेचे आहे. पण याबाबत चिंतेची बाब म्हणजे तो लहान मुलांमध्ये आढळून येत असल्याने त्यांचे विलगीकरण करताना एकटी पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. संक्रमित मुलाला इतर मुलांमध्ये मिसळू देऊ नये. तसेच संक्रमित व्यक्तीच्या रोजच्या वापराच्या वस्तू म्हणजे कपडे, रूमाल, टॉवेल, खेळणी इतरांनी वापरू नयेत. मुलांना पूर्ण विश्रांती घ्यायला लावणे आवश्यक आहे. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी पोषक आहार गरजेचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टोमॅटो फ्लूमध्ये येणारे पुरळ, फोड खाजवू नयेत. कारण यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता असते.

इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे या आजाराचे नाव टोमॅटो फ्लू असले तरी त्याचा टोमॅटोशी काही संबंध नाही. या आजारात अंगभर लाल रंगाचे पुरळ येतात आणि त्यांचा आकार टोमॅटोएवढा होत जातो म्हणून त्याला टोमॅटो फ्लू म्हणतात. तो टोमॅटोपासून होत नाही किंवा टोमॅटो खाल्ल्यामुळेही होत नाही. हा आजार होण्याची नेमकी कारणेही अद्याप अज्ञात आहेत. सर्वसाधारणपणे हा आजार आपोआप बरा होतो, असेही काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

लहान मुलांमध्ये अनेक प्रकारचे विषाणू संसर्ग होत असतात, त्या प्रत्येकाची चाचणी घेण्याची गरज नसते आणि ते शक्यही नसते. पण गेल्या पाच वर्षांत लहान मुलांना होणार्‍या विविध संसर्गांच्या चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढले आहे. कोविड महामारीमुळे आरोग्याविषयी लोक अधिक जागरुक आणि सावध झाले आहेत. टोमॅटो फ्लू हा एचएफएमडी विकाराचा प्रकार आहे की चिकन गुनिया आणि डेंग्यूचा परिणाम आहे यावर संशोधन सुरू आहे. एचएफएमडीचे निदान त्याची लक्षणे दिसल्यावर लगेच होते. तसेच टोमॅटो फ्लूचेही आहे. एचएफएमडी कॉक्सॅकी व्हायरस ए-6 आणि ए-16 मुळे होतो. सध्या तरी टोमॅटो फ्लूवर कोणतीही विशिष्ट लस नाही. ज्यांना हा आजार होतो त्यांना तापावरील रूढ उपचारच केले जात आहेत.

आजवरच्या सर्वच आजारांचा इतिहास पाहिल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना गरजेच्या ठरतात हे लक्षात येते. या जोडीला दुसरा महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे वेळेवर निदान. आज जगभरात कर्करोगाची संख्या झपाट्याने वाढत असून अनेक जणांचा या दुर्धर व्याधीने मृत्यू होत आहे. कर्करोग हा असाध्य आजार असला तरी वेळेवर निदान झाल्यास रुग्णाचे आयुष्य वाढवता येऊ शकते. विषाणूजन्य आजारांबाबतही तीच स्थिती आहे. कोविडच्या काळात भारतात असो वा जगभरात झालेल्या मृत्यूंसंदर्भातील माहिती पाहता काहींना योग्य उपचाराअभावी जीव गमवावा लागला, तर अनेकांचे निदान होण्यास वेळ दवडल्याचे लक्षात आले. कोविडची बाधा झालेल्यांना न्यूमोनिया झाल्याचीही अनेक उदाहरणे दिसून आली. यावरून धडा घेऊन सर्वसामान्यांनी आरोग्यासंदर्भातील तक्रारींबाबत दुर्लक्ष करता कामा नये. कारण हे दुर्लक्ष जीवावर बेतणारे ठरू शकते. टोमॅटो फ्लूचाच विचार करता रेस्परेटरी सॅम्पल्सद्वारे या आजाराचे निदान होऊ शकते. यासाठी आजारपणाच्या 48 तासांत श्वसनाचे नमुने दिले जाऊ शकतात. याखेरीज हा विषाणू मलाच्या नमुन्यांमधूनही शोधला जाऊ शकतो. संसर्गजन्य आजारांमध्ये योग्य वेळी जर बाधा झाल्याचे लक्षात आले तर दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे बाधितावर तत्काळ उपचार करून पुढील हानी टाळता येते आणि दुसरे म्हणजे याचा संसर्ग रोखण्यास मदत होते. जगभरातील शास्रज्ञांच्या आणि पर्यावरणतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे आणि जागतिक तापमानवाढीमुळे येत्या काळात अशा अनेक विषाणूंचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या आरोग्य आपत्तींबाबत शासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कोविड, मंकी फ्लू यांसारख्या विषाणूंची बाधा झालेले रुग्ण हे प्रामुख्याने बाहेरच्या देशातून भारतात आले आणि इथे त्याचा प्रसार झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर आपल्याला परदेशातून येणार्‍या नागरिकांबाबत, त्यांच्या आरोग्याबाबत एक ठोस तपासणी पद्धत, यंत्रणा विकसित करावी लागणार आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही आरोग्याबाबतच्या कोणत्याही असामान्य तक्रारींबाबत सजग राहिले पाहिजे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या