काँग्रेसमधील बंडखोर नेते गांधी-नेहरू घराण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत; परंतु संपूर्ण देश ज्याला ओळखेल असा चेहरा या मंडळींकडे आहे का? घराणेशाही केवळ राजकारणातच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात वाईटच. तिचे समर्थन करता येत नाही; परंतु नरेंद्र मोदी वगळता देशातील कोणताही नेता घराणेशाहीपासून दूर नाही, या वास्तवाकडे कानाडोळा करता येईल का?
काँग्रेसमधील बंडखोर नेते गांधी-नेहरू घराण्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत; परंतु संपूर्ण देश ज्याला ओळखेल असा चेहरा या मंडळींकडे आहे का? घराणेशाही केवळ राजकारणातच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात वाईटच. तिचे समर्थन करता येत नाही; परंतु नरेंद्र मोदी वगळता देशातील कोणताही नेता घराणेशाहीपासून दूर नाही, या वास्तवाकडे कानाडोळा करता येईल का?
काँग्रेस सध्या संकटाच्या काळातून मार्गक्रमण करत आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी गांधी-नेहरू कुटुंबातील नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत हे प्रश्न केवळ विरोधी पक्षांकडून उपस्थित करण्यात येत होते. परंतु जेव्हा एखाद्या मोठ्या पक्षातील दिग्गज नेते विरोधी पक्षांची भाषा बोलायला सुरुवात करत असतील, विरोधी पक्षांनी उपस्थित केलेले प्रश्न उपस्थित करत असतील आणि संसदेत जर काँग्रेस हा महत्त्वहीन पक्ष ठरला असेल तर या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे ठरते. नेहरू-गांधी कुटुंबाने खरोखर आपली प्रासंगिकता गमावली आहे का? या मंडळींच्या जागी काँग्रेसचा नवा चेहरा कोण असेल? कोण असू शकतो? या प्रश्नांवर विचार करणे मग महत्त्वाचे ठरते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबईत झाली होती. सन 1964 मध्ये नेहरू यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून येऊ लागले. जेव्हा इंदिरा गांधी यांनी सत्ता हाती घेतली, त्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी आपापले स्वतंत्र पक्ष स्थापन केले. उडिशा जनकाँग्रेस, बांगला काँग्रेस, भारतीय क्रांतिदल, उत्कल काँग्रेस आणि केरळ काँग्रेस अशी या पक्षांची नावे होती. 1969 मध्ये इंदिरा गांधी इंडियन नॅशनल काँग्रेसमधून बाहेर पडल्या. त्यांनी काँग्रेस (आर)ची स्थापना केली आणि 1971 ची निवडणूक लढवली. आरचा अर्थ रूलिंग असा होता. काँग्रेसच्या दुसर्या गटाचे नाव काँग्रेस (ओ) असे होते. ओ म्हणजे ऑर्गनायझेशनल किंवा ओल्ड. या गटाचे नेते होते कामराज, निजलिंगप्पा, मोरारजी देसाई आणि एस. के. पाटील. काँग्रेस (आर) ने 1971 ची निवडणूक प्रचंड बहुमताने जिंकली.
आणीबाणीनंतर 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. 2 जानेवारी 1987 रोजी काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडली. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस (आय)ची स्थापना झाली. इथे आयचा अर्थ इंदिरा असा होता. 1984 मध्ये निवडणूक आयोगाने याच पक्षाला ‘खरी काँग्रेस’ म्हणून घोषित केले. परंतु पक्षाच्या नावातून ‘आय’ हा शब्द खूप वर्षांनी म्हणजे 1996 मध्ये हटवण्यात आला. आतापर्यंत विरोधी पक्षांचे ध्रुवीकरण जितक्या वेळा झाले, त्यावेळी त्याचा उद्देश काँग्रेसला विरोध आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर करणे हाच होता.
बर्याच वर्षांपासून देशाचे राजकारण यूपीए आणि एनडीए या दोन आघाड्यांभोवती फिरत आहे. या दोन्ही आघाड्यांचे नेतृत्व अनुक्रमे काँग्रेस आणि भाजप यांच्याकडे आहे. भाजप आधी कमकुवत होता. वाजपेयी आणि अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची कामगिरी फारशी प्रभावी झाली नाही. त्यावेळी या नेत्यांना हटवण्याची मागणी अजिबात झाली नाही. परंतु आज काँग्रेस कमकुवत झाला आहे, तर गांधी-नेहरू कुटुंबावर प्रश्नचिन्ह का उपस्थित करण्यात येत आहे? गांधी-नेहरू कुटुंबाव्यतिरिक्त जेव्हा काँग्रेसने निवडणुका लढवल्या तेव्हा पक्षाची कामगिरी खूपच खराब झाली होती. असे असताना हे प्रश्न उपस्थित होत आहेत. वास्तविक इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यापैकी प्रत्येकाच्या नेतृत्वाखाली पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तथापि राहुल गांधी वगळता अन्य नेत्यांनी पक्षाला पुन्हा सत्तेत आणण्याची कामगिरी करून दाखवली आहे. राहुल गांधींना आता अग्निपरीक्षेतून जावे लागेल. परंतु ज्या लोकांना अग्निपरीक्षा हवी आहे त्यांच्या बाबतीतही जाणून घेणे आवश्यक ठरते.
ज्या प्रकारे काँग्रेसमधील असंतुष्ट नेते पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून वारंवार बैठका घेत आहेत, परंतु बंडखोर नेत्यांपैकी बहुतेकांच्या पाठीशी फार मोठा जनाधार नाही. संपूर्ण देशभरात ओळख असलेला एकही चेहरा या नेत्यांमध्ये नाही. त्यामुळे यापैकी एखाद्या नेत्याच्या भरवशावर काँग्रेस शक्तिशाली बनू शकेल किंवा जास्त जागा जिंकू शकेल, असाही दावा करता येत नाही. या सर्व नेत्यांना विजयासाठी गांधी-नेहरू कुटुंबाची गरज आजपर्यंत भासलीच आहे. मग अशा व्यक्तींच्या बोलण्यावर गांधी कुटुंब भरवसा का करेल? तेसुद्धा स्वातंत्र्यापासून पक्षाचे नेतृत्व नेहरू-गांधी कुटुंबाकडेच असताना?1951-52 मध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या, तेव्हा काँग्रेसची घोषणा होती- ‘नेहरूंना मत म्हणजे काँग्रेसला मत!’ तेव्हापासून काँग्रेस आणि नेहरू कुटुंबाचे अस्तित्व एक झाले आहे. नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांचा कार्यकाळ वगळता काँग्रेस पक्षाचे नेतृत्व कायम गांधी-नेहरू कुटुंबाकडेच राहिले आहे.
काँग्रेसचा इतिहास पाहिल्यास आतापर्यंत एकंदर 19 जण पक्षाध्यक्ष बनले. पहिले अध्यक्ष होते जे. बी. कृपलानी. काँग्रेसच्या निवडणुकीतील विजयाचा इतिहास पाहिल्यास गेल्या 74 वर्षांत झालेल्या 17 सार्वत्रिक निवडणुकांमधील सातवेळा गांधी-नेहरू कुटुंबाबाहेरील व्यक्तीने काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व केले. त्यातील चारवेळा पक्षाला विजय प्राप्त झाला तर गांधी-नेहरू कुटुंबातील पक्षाध्यक्ष असताना लढवलेल्या 10 निवडणुकांपैकी चार निवडणुकांत काँग्रेसला पराभवास सामोरे जावे लागले. स्वातंत्र्यप्राप्तीपासून 14 वेळा गांधी-नेहरू कुटुंबाव्यतिरिक्त अध्यक्ष होते आणि त्यांच्या यशस्वीतेचा दर 57 टक्के होता. परंतु हे अध्यक्षही नेहरू-गांधी कुटुंबाच्या कृपेनेच त्या पदावर विराजमान झाले होते, हेही विसरता कामा नये. 2009 मध्ये मनमोहन सिंग यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 206 जागा मिळाल्या होत्या. 1996 ची निवडणूक पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली होती, तीत काँग्रेसने 140 जागा जिंकल्या होत्या. गांधी कुटुंबापैकी राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच असे नेते आहेत ज्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. राजीव गांधी 1985 मध्ये पक्षाध्यक्ष बनले आणि 1989 मध्ये पक्ष निवडणुकीत पराभूत झाला. 1998 मध्ये सोनिया गांधी अध्यक्ष बनल्या आणि 1999 च्या निवडणुकीत पक्षाचा पराभव झाला. त्यानंतर 2014 च्या निवडणुकाही सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालीच झाल्या. या निवडणुकीत पक्षाच्या इतिहासातील सर्वात कमी म्हणजे अवघ्या 44 जागा जिंकण्यात यश आले. सोनिया यांच्यानंतर 2017 मध्ये राहुल गांधी अध्यक्ष बनले. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिली निवडणूक 2019 मध्ये झाली. त्याहीवेळी काँग्रेसला अवघ्या 52 जागाच मिळाल्या. परंतु राहुल गांधी यांच्या यशापयशाचा लेखाजोखा तपासल्यास वेगळीच कहाणी डोळ्यासमोर येते. 2018 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. मिझोराम आणि तेलंगणामध्ये मात्र काँग्रेसचा पराभव झाला. एखाद्या व्यक्तीवर इतके हल्ले झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासारखा निर्णय घेण्यासही ती व्यक्ती सक्षम राहिली नसती. काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांना पुन्हा एकदा काँग्रेसच्याच वळचणीला यावे लागले. काँग्रेसच्या बाहेर राहूनसुद्धा ज्यांनी स्वतंत्र पक्ष चालवला ते केवळ प्रांतिक नेतेच ठरले.
प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यावर काँग्रेस आणि गांधी कुटुंबाला विरोध हा मुद्दाच प्रकर्षाने आहे. जर ही मंडळी इतकी कमी महत्त्वाची आहेत तर प्रत्येकजण त्यांच्यावर टीका करायला पुढे का सरसावतो आहे? ज्यांना देशात सर्वत्र कमी-अधिक स्वरुपात व्यक्तिगत पाठिंबा आहे, असे नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हेच दोन नेते आहेत, हे खरे नाही का? या दोघांच्या लोकप्रियतेत जमीन-अस्मानाचे अंतर आहे, हेही खरेच आहे. हे अंतर भरून काढण्यासाठी असंतुष्ट नेत्यांकडे कोणता चेहरा आहे? कोणते नाव आहे? या प्रश्नांची उत्तरे असंतुष्टांना द्यावी लागतील. उत्तर प्रदेशात काँग्रेसची धुरा दिग्गज नेत्यांच्या खांद्यावर होती; परंतु गेल्या तीन दशकांत काँग्रेस चर्चेत सुद्धा कुठेच नव्हती. प्रियंका गांधींमुळे काँग्रेस किमान चर्चेत तरी आली! घराणेशाही केवळ राजकारणातच नव्हे तर कोणत्याही क्षेत्रात वाईटच. तिचे समर्थन करता येत नाही; परंतु नरेंद्र मोदी वगळता देशातील कोणताही नेता घराणेशाहीपासून दूर नाही, या वास्तवाकडे कानाडोळा करता येईल का?