नाशिक । प्रतिनिधी Nashik
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने नाशिकमध्ये महायुती नेत्यांंची मांदीयाळी जमणार आहे.
मध्य नाशिकच्या भाजप आ. देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नातून त्रंंबक रोड येथे दुध डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या मुला -मुलींसाठी वस्तीगृह तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेचे विभागीय कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता होणार आहे.
तसेच मुंबई नाका येथे क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अर्धकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल.
नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी गंगापूर रोड पंपिंग स्टेशन येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वातील विविध पैलू उलगडणार्या स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांंचा हस्ते होणार आहे.
अखिल भारतीय महानुभाव पंथाद्वारे महाकवी कालिदास कला मंदिर येथे सायंकाळी 5 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य सत्कार व कृतज्ञता सोहळा होणार आहे. याप्रसंगी ध्वजारोहण, श्रीमूर्तीपूजन, संतपूजन, कृतज्ञता सोहळा, धर्मसभा, महाप्रसाद आदीसह विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.