Friday, November 1, 2024
Homeशब्दगंधचैताचा रंग संग दरवळ सावरियाँ ।

चैताचा रंग संग दरवळ सावरियाँ ।

चैताचा रंग संग दरवळ सावरियाँ।

या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या अन् मनात जागवली ती चैत्र महिन्यातली गंमत. चैत्र महिना हा चांद्र वर्षातील पहिला महिना आणि त्या महिन्यात पौर्णिमेला किंवा त्याच्या जवळपास चित्रा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला चैत्र महिना म्हणतात.

- Advertisement -

वसंतातला हा महिना आणि वसंतऋतूमुळे सगळ्या सृष्टीला बहर येतो. या ऋतूत अनेक औषधी वनस्पती येतात. अनेक फुले, फळांनी झाडे लगडलेली असतात. वसंताचे आगमन होताच सगळे वातावरण आल्हाददायक होते. वसंत वायू-वृक्षांना नाचवतो. कोकिळांना गायला लावतो आणि गिरिकंदात संगीतसभा भरवतो. वृक्षांवरील भ्रमरांचा गुंजारव ऐकून वाटते, की हे वृक्षच अंतरीची प्रसन्नता गीतातून व्यक्त करीत आहेत..अस वर्णन आदी कवींनी केलेले आहे. या अशा प्रसन्न वातावरणात सृष्टी सुद्धा फळ फूल लेवून नटलेली असते.

या सगळ्यात जास्त मनाला मोहरुन जातो तो मोगर्‍याचा सुगंध. मोगरा हा सगळीकडे शोभतो. लांबसडक सुंदर वेलीवर तो शोभा आणतो. त्याच्या असल्याने तिच्या वेणीच्या आणि तिच्या, सौंदर्यात भर पडते. तिच्या अस्तित्वाचा दरवळ सगळीकडे पसरतो, जाणवत राहतो.

तसा विचार केला तर मोगरा आपल्याला आपल्या जीवनात वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळा भेटतो. मला आठवते, माझ्या लहानपणी म्हणजे मी 5/6 वीत असताना माझ्या आजोबांनी आमच्या मागच्या अंगणात मोगर्‍याची एक काडी आणून लावली होती. थोड्या दिवसांनी त्याला कोवळी कोवळी पान आली आणि वसंतातल्या एका रात्री मला त्या पानांमधून सुगंध आला. खूप निरखून निरखून बघितल्यावर त्या पानाच्या आड एक कळी दिसली. आणि दुसर्‍या/तिसर्‍या दिवशी त्याचे सुंदर फूल झालेले होते. त्या गडद हिरव्या पानांवर देखणे मोगर्‍याचे फूल माझ्या मनात कायमच आहे. मग त्यानंतर मी नेहमी रात्री फूल/कळी शोधायची आणि त्या अर्धवट उमललेल्या फुलाचा वास त्या अंगणात खूप खूप दरवळलेला असायचा. माझ्या मनाचा आसमंत त्या दरवळीत अजुनही वेळ मिळेल तेव्हा न्हाऊन निघतो.

मोगर्‍याची लहानपणी आवड निर्माण झाली ती कायमचीच. मोगरा लहानपणी सोबती झाला. पुढे सासरच्या अंगणात सुद्धा बरेच मोगर्‍याची झाड आहेत. भरपूर फुलांनी जेव्हा देवघर सजवतात तेव्हा त्याच्या वासाने मन प्रसन्न होत.

कुठेतरी लग्न मंडपात जेव्हा मोगर्‍याचा वास दरवळत असतो तेव्हा तो वातावरण प्रसन्न करतो. खरे तर विविध रंगाची फूल असतात, पण हे शुभ्र पांढरे मोगर्‍याचे फूल जास्त सुंदर व रुबाबदार वाटते. तारुण्यातली मोगर्‍याची सोबत अत्यंत रोमहर्षक वाटते.

जोडीदाराने अवचित आणलेला मोगर्‍याचा गजरा लावून आपण जणू मुकूटच डोक्यात घातल्याच्या अर्विरभावात वावरत होतो. तो मोगरा मग सगळे जगच. सजवून हरखून टाकतो. मनात त्यावेळी गाणे रुंजी घालत

फुलले रे क्षण माझे फुलले रे…

मोगर्‍याला अभंगांमधून मनाची उपमा दिलेली आहे. मन हा मोगरा अर्पूनी ईश्वरा पुनरपी संसारा येणे नाही

असे जेव्हा संत सांगतात तेव्हा भक्तीत रममाण होणार्‍या मोगरा रुपी मनाची भाव अवस्थाच सांगतात. ईश्वर चरणी रममाण झाल्यावर संसारातले लक्ष कमी करणे हेच योग्य आहे. असच आपल्याला संत वचन सांगते.

आपल्याला खर्‍या अर्थाने सर्वार्थाने आनंदी करणार्‍या या मोगर्‍याचे उगमस्थान भारतीलच आहे. त्याच्या 4 जाती आहेत, मोतीया मोगरा, मदन मोगरा, वनमल्लिका आणि आरती मोगरा हे त्याचे प्रकार आहेत. मोगर्‍याला संस्कृत मधून मालती म्हणतात तर हिंदीमधून चमेली म्हणतात. ही फूल भारताबरोबर भूतान, एशिया, पाकिस्तान आणि इतर देशात आढळतात. हे सुंदर अस मोगर्‍याचे फूल फिलिपीन्स देशाचे राष्ट्रीय फूल आहे.

मोगर्‍याच्या फुलांचा वापर अ‍ॅरोमा थेरपीमध्ये केला जातो. कारण त्याच्या वासाने मन शांत होते. मोगर्‍याचे अत्तर केले जात. चहामध्ये वापरला जातो. तसेच उन्हाळ्यात मोगर्‍याचे फूल टाकून माठातले थंडगार पाणी प्यायलाने तृषा शांत होते.

मोगर्‍याच्या फुलाने आपल जीवन मन सुगंधी होतेच. पण

मोगरा फुलला, मोगरा फुलला

फुले वेचिता बहरू कळीयासी आला

हे ज्ञानेश्वर माऊलींचे वचन जेव्हा आपण लता दिदींच्या स्वरात ऐकतो तेव्हा लता दिदींचा स्वर ही सुगंधी होतो. आणि आपल्या मनात भक्तीरुपी मोगरा फुलतो.

स्वाती साखरे,

निवेदिका

कुंडीत मोगरा लावलाय ?

आपल्याला आपल्याच कुंडीतील मोगरा माहीत असतो. पण मोगर्‍याच्या सिंगल, डबल, गुंडुमलई, मोतीया, बटमोगरा, वसई, मदनबाण अशा अनेक जाती आहेत. तो इंडोनेशिया आणि फिलिपीन्स या देशांचे राष्ट्रीय फूल आहे.

पाण्याचा निचरा होणार्‍या मातीने कुंडी भरा.

मोगर्‍याला फार पाणी घातलेले सोसवत नाही. बेतानेच पाणी घाला.

उन्हाळा आणि मोगरा यांचे नातेच सुगंधी. त्याची अनुभूती घेण्यासाठी साधारणत: दोन आठवड्यातून एकदा खत टाकावे.

मोगर्‍याला ऊन आवडते बरं का. त्यामुळे मोगरा लावलेली कुंडी भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा जागी ठेवावी.

मोगर्‍याचाही बहर ओसरतो. त्यानंतर त्याच्याही फांद्या 5-6इंच छाटाव्यात. त्यानंतर 5-6 दिवसांनी पाणी घालावे. मग बघा तुमच्या मोगर्‍यालाही फुटवा धरतो.

दोन वर्षांनी माती जरुर बदलावी.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या