लोणी |वार्ताहर| Loni
केंद्र सरकारच्या मनरेगा ऐवजी अस्तित्वत येत असलेल्या विकसित भारत व्हीबी-जी राम-जी या योजनेच्या जनजागृतीसाठी लोणी बुद्रुक येथे देशातील पहिल्या विशेष ग्रामसभेचे आज गुरुवार दि. 1 जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले असून केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान या सभेला उपस्थित राहणार आहेत.
ग्रामीण जनतेचे रोजगार आजिविका विविधिकरण व सामाजिक आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने मनरेगा या योजने ऐवजी विकसित भारत: रोजगार आणि अजिवीका गारंटी मिशन (ग्रामीण) अधिनियम 2025 मंजूर केले आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) ऐवजी व्हीबी-जी राम-जी ही योजना अस्तित्वात येत आहे.
या योजनेची जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायतीने लोणी बुद्रुक येथे विशेष ग्रामसभेचे आज दि. 1 जानेवारी रोजी दुपारी 1.30 वाजता कार्यालयासमोर आयोजन केले आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराजसिंह चौहान हे ग्रामसभेला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, शालिनीताई विखे पाटील, योजनेचे सचिव गणेश पाटील, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सभेचे इंटरनेट कनेक्टिव्हिटीद्वारे तसेच फेसबुक, युट्यूब अशा समाज माध्यमांद्वारे लाईव्ह टेलिकास्ट केले जाणार आहे. देश पातळीवरील महत्त्वपूर्ण योजनेच्या पहिल्या जनजागृती विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा मान लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीला मिळाला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.




