Tuesday, May 28, 2024
Homeअग्रलेखसार्वजनिक स्वच्छतेचा संस्कार महत्वाचा

सार्वजनिक स्वच्छतेचा संस्कार महत्वाचा

राजकीय स्वातंत्र्यापेक्षा स्वच्छता जास्त महत्वाची आहे असे महात्मा गांधीजी म्हणत. सर्वांना सार्वजनिक स्वच्छतेची अपरिहार्यता करोनाच्या साथीने लक्षात आणून दिली. लोकसहभागातून सार्वजनिक स्वच्छता राखणे सहज शक्य आहे हे सांगलीतील निर्धार फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी आचरणातून दाखवले. पंढरपूरची आषाढवारी नुकतीच पार पडली. या दिवशी पंढरपूर लाखो वारकऱ्यांना सामावून घेते. याच मुहूर्तावर हजारो लोक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरात दाखल होतात.

त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्नशील असते. तथापि त्या प्रयत्नांना लोकसहभागाची जोड मिळाली तर काम अधिक जोमाने होण्याची शक्यता दुणावते. निर्धार फाउंडेशनचे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे आषाढी एकादशीनंतर पंढरपूरमध्ये स्वच्छता वारी करतात. श्रमदानातून स्वच्छता करतात. निर्माल्य संकलन करतात. घाटाच्या कठड्यांच्या भिंतींना रंगरंगोटी करतात. आश्या प्रकारे अनेक सामाजिक संस्था, काही लोक वैयक्तिक पातळीवर त्यांच्या परीने सार्वजनिक स्वच्छता राखण्यासाठी कार्यरत असतात. नाशिकमध्ये चंदू पाटील हे गोदातटी उभे राहतात. गोदापात्रात कचरा फेकू नये यासाठी लोकांना आवाहन करतात. गोदापात्रातील कचरा काढून तो पुनर्वापरासाठी महानगरपालिकेकडे सोपवतात. प्लॉगर्स ही युवा सामाजिक संस्था आहे. त्यांचे कार्यकर्ते आठवडा अखेरीस गोदावरीचा परिसर स्वच्छ करतात. हे काम महत्वाचे आहेच. तथापि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छता ठेवणे ही देखील सामाजिक जबाबदारी आहे. तो संस्कार पालकांनी मुलांवर जाणीवपूर्वक करायला हवा. अनेक पालक, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती घरातील मुलांवर संस्कार करतात. थोरामोठांचा आदर राखणे, नम्रता, आपुलकी, समयसुचकता, वेळेचे पालन अशा अनेक गोष्टी ते मुलांना शिकवतात. तसेच स्वच्छतेचा संस्कार देखील व्हायला हवा. कचरा इतस्ततः टाकू नये, प्लास्टिकचा वापर मर्यादित कसा करायचा, कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा का करायचा अशा अनेक गोष्टी त्यांना जाणीवपूर्वक शिकवल्या जायला हव्या. घर स्वच्छ ठेवणे म्हणजे घरातील कचरा घराबाहेर उघड्यावर फेकणे नव्हे. अनेक संस्था कचऱ्यापासून घरी खत बनवायला, त्या खतापासून गच्चीवरची बाग फुलवायला शिकवतात. गच्चीवरच्या बागेचा छंद पालकांना जडला तर मुलांमध्ये त्याची आवड आपसूकच निर्माण होऊ शकेल. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे याचे भान मुलांमध्ये लहानपणीच रुजवले जायला हवे. लोकांनी निर्माण केलेल्या कचऱ्याचे काय होते, कोणत्या कचऱ्याचा पुनर्वापर होऊ शकतो, कोणता कचरा आरोग्यासाठी धोकादायक बनतो, प्लास्टिकवर बंदी का घातली जाते, त्यामुळे होणारे प्रदूषण, याविषयी मुलांना माहिती दिली जायला हवी. कचरा डेपोत काम कसे चालते हेही नेऊन दाखवले जाऊ शकेल का? यासंदर्भातील कार्यानुभव मुलांच्या मनावर ठसू शकेल. कदाचित त्यातूनच सार्वजनिक स्वच्छतेची जाणीव त्यांच्यात रुजेल. महात्मा गांधीजींना अपेक्षित असलेली गाव पातळीवरची स्वच्छता साध्य होऊ शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या