एखादं नृत्य लोकप्रिय होण्यात नृत्य दिग्दर्शकाचा महत्त्वाचा वाटा असतो. सरोज खान यांनी नृत्यदिग्दर्शिका म्हणून खूप नाव कमावलं. श्रीदेवी, माधुरी दीक्षितपासून ऐश्वर्या राय, करीना कपूरपर्यंत प्रथितयश अभिनेत्रींना आपल्या तालावर नाचवलं. त्यातही माधुरीसोबत त्यांचे निराळेच बंध जुळले. ही हरहुन्नरी नृत्यदिग्दर्शिका आज आपल्यात नाही. माधुरीने त्यांच्यासोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा आज समयोचित ठरतो. त्याचं हे शब्दांकन
‘मास्टरजी’ ही सरोज खान यांची बॉलिवूडमधली ओळख. त्यांनी बॉलिवूडपटांमधल्या नृत्याला खर्या अर्थाने ग्लॅमर मिळवून दिलं. ‘तेजाब’मधल्या ‘एक, दो, तीन’ या गाण्यामुळे माधुरी दीक्षित लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली. या गाण्यावर थिरकताना तिचं नृत्यकौशल्य पणाला लागलं असलं तरी त्यामागे सरोज खान यांचे अथक परिश्रम होते. सरोज खान यांनी नव्वदीचं दशक गाजवलं. माधुरी, श्रीदेवीला ‘स्टारडम’ मिळवून देण्यात त्यांचाही महत्त्वाचा वाटा होता असं म्हटल्यास वावगं ठरू नये. त्यांनी माधुरीसोबत बरंच काम केलं. ‘बेटा’मधल्या ‘धक धक करने लगा’ या गाण्याचं नृत्यदिग्दर्शनही त्यांनीच केलं होतं. ‘अंजाम’मधलं ‘चने के खेत में असो’, ‘देवदास’मधलं ‘डोला रे डोला ’असो किंवा अगदी अलीकडच्या ‘कलंक’मधलं ‘तबाह हो गए’ हे गाणं असो, सरोज खान यांचा ‘परिसस्पर्श’ लाभलेल्या या प्रत्येक गाण्याचं खर्या अर्थाने ‘सोनं’ झालं. सरोज खान यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केलं होतं. मात्र त्यांना नृत्याची खूप आवड होती. आपल्या या कलेला त्यांनी नवे आयाम दिले. बॉलिवूडमध्ये नृत्यदिग्दर्शिका म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं. आजही नृत्यदिग्दर्शिका म्हटलं की सरोज खानच आठवतात. त्यांनी अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं. मात्र माधुरीसोबत त्यांचं वेगळंच नातं होतं. त्यांच्या नात्याचे बंध खूप घट्ट होते. म्हणूनच सरोजजींच्या जाण्याने आपण उद्ध्वस्त झाल्याचं माधुरीने म्हटलं. बॉलिवूडची एके काळची सुपरस्टार असणार्या माधुरीने सरोजींसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत.
सरोज खान यांच्या रुपात मी माझ्या गुरू आणि एक मैत्रीण गमावली आहे. त्यांनी माझ्या नृत्यकौशल्याला खर्या अर्थाने न्याय दिला. मी पूर्ण क्षमतेने नृत्य सादर करावं यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील राहिल्या. माझी नृत्यकला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता आणि याबद्दल मी त्यांची कायमच ऋणी राहीन. सरोजजींच्या निधनामुळे जगाने अत्यंत हरहुन्नरी आणि गुणवान असं रत्न गमावलं आहे. त्यांच्या निधनामुळे माझ्या आयुष्यात भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. सरोजजींच्या आता फक्त आठवणीच उरल्या आहेत.
‘तेजाब’मधल्या ‘एक, दो, तीन’ गाण्याच्या चित्रिकरणादरम्यानचे काही प्रसंग मला आठवतात. त्या मला शास्त्रीय नृत्यांगना समजायच्या. त्यामुळे ‘एक, दो, तीन’ वर मी नृत्य करू शकेन का, याबाबत त्यांच्या मनात शंका होती. ‘एक, दो, तीन’मध्ये शास्त्रीय नृत्याला वाव नव्हता. हे बॉलिवूडपटातलं नखरेल गाणं होतं. त्यामुळे त्याच्या चित्रिकरणाआधी त्यांनी मला सराव करायला सांगितलं. या गाण्यात कॅमेरा, त्याचे अँगल्स यांना प्रचंड महत्त्व होतं. बॉलिवूडमधल्या नृत्याची स्टाईल, पद्धत शिकायची असल्याने मी सरोजजींच्या सल्ल्यानुसार नाचाचा भरपूर सराव केला. त्यांच्यासोबत काम करताना, शिकताना खूप मजा आली. सरोज खान यांचं एक वैशिष्ट्य होतं. त्या कधीही हूक स्टेप्सची पुनरावृत्ती करत नसत. ‘एक, दो, तीन’ या गाण्यानंतर त्यातल्या कोणत्याही स्टेपची पुढच्या गाण्यांमध्ये पुनरावृत्ती करायची नाही. प्रत्येक गाण्यातल्या नृत्यात वैविध्य आणायचं. वेगवेगळ्या स्टेप्स सादर करायच्या. या स्टेप्समुळे गाणं लोकांच्या कायम स्मरणात राहायला हवं, असं आमचं ठरलं होतं. पुढे आम्ही ठरल्याप्रमाणे काम केलं आणि सगळं अगदी छान जुळून आलं.
सरोजजी फक्त नृत्य दिग्दर्शनापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत. नृत्य कशा प्रकारे चित्रित करावं, कोणत्या कोनात करावं, कोणत्या पद्धतीने चित्रिकरण केल्यास पडद्यावर प्रभावी दिसू शकेल याबाबत त्या अधूनमधून मार्गदर्शन करत असत. ‘राजा’च्या सेटवर घडलेला एक प्रसंग मला आठवतो. या चित्रपटातलं ‘अखियां मिलाऊं’ हे गाणं खूपच गाजलं. या गाण्याचं चित्रिकरण पूर्ण झालं होतं. त्यानंतर सरोजजींना काय वाटलं कुणास ठाऊक? या गाण्यातून खट्याळपणा डोकावत असल्यामुळे त्या पद्धतीच्या डोळ्यांच्या हालचाली जवळून चित्रित करण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी केली. यामुळे छान मूड तयार होईल आणि गाणं लोकांच्या मनावर अधिक चांगल्या प्रकारे ठसेल असं त्यांचं म्हणणं होतं.
‘राजा’चे दिग्दर्शक इंद्रकुमार याबाबत थोडे साशंक होते. पण सरोजजींचा स्वत:वर पूर्ण विश्वास होता. त्यांनी इंद्रकुमारना फक्त दहा मिनिटं द्यायला सांगितली. माझ्याशी बोलल्या. मलाही त्यांचं म्हणणं पटलं. डोळ्यांच्या हालचाली खूपच छान वाटतील, हे मला जाणवलं. आम्ही या हालचालींचं चित्रिकरण केलं आणि गाण्याची सुरूवातच या दृश्याने झाली. ‘अखियां मिलाऊं’मधल्या डोळ्यांच्या हालचाली खूप गाजल्या. यावरूनच सरोजजींची दूरदृष्टी लक्षात येते.
सरोजजींमुळे मला बॉलिवूडपटांमधल्या नृत्यांचे बारकावे कळले. चित्रपटात कसं नाचायचं हे त्यांनीच मला शिकवलं. त्यांच्याकडून मी नृत्याच्या पलीकडे बरंच काही शिकले. हिंदी चित्रपटसृष्टीतल्या माझ्या प्रवासात अगदी सुरूवातीपासून त्या सोबत होत्या. त्यांच्या अनेक आठवणींनी माझ्या मनात घर केलं आहे. त्यांच्या सोबत घालवलेले क्षण माझ्या डोळ्यांसमोरून जात आहेत. महिलांना रुपेरी पडद्यावर कशा पद्धतीने सादर करायचं, त्या कशा ऐटबाज, डौलदार दिसतील याची त्यांना चांगली जाण होती. त्या काव्याच्या पलीकडे जाऊन नृत्याचा विचार करत असत.
सर्वसाधारणपणे कॅमेर्याचा कोन लक्षात घेऊन नृत्य साकारलं जातं. मात्र सरोजजी खूप वेगळ्या होत्या. सरोजजींनी नृत्याला कधीही शारीरिक हालचालींपुरतं मर्यादित ठेवलं नाही. त्यांनी नेहमीच हावभावांवर भर दिला. त्यांनी नृत्यात पावित्र्य, आध्यात्मिकता शोधली. त्यांच्या नृत्यात डौल असायचा. नृत्य साकारताना महिला ग्रेसफूल दिसायला हव्यात, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. म्हणूनच त्यांच्यासोबत केलेलं प्रत्येक काम, प्रत्येक गाणं, प्रत्येक नृत्य माझ्या मनावर कोरलं गेलं. आजची तरुणाई आमच्या गाण्यांवर थिरकते. या गाण्यांचा रिमेक करावासा वाटतो. यावरूनच ही सगळी गाणी चिरतरुण असल्याची खात्री पटते. आम्ही जे केलं ते योग्य होतं याबाबत अजिबात शंका नाही.
‘कलंक’मधलं ‘तबाह हो गए’ या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन सरोजजींनी केलं होतं. त्यांच्यासोबत पुन्हा काम करायची संधी मिळाल्याचं मला खूप समाधान वाटतं. बॉलिवूडमध्ये आपल्याला काम मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. अर्थात सरोजजींसारख्या जुन्या-जाणत्या नृत्यदिग्दर्शिका अशी खंत व्यक्त करत असतील तर त्यात नक्कीच काही तरी तथ्य असावं. यामुळे सरोजजींचं नाही तर बॉलिवूडचं आणि नवोदित अभिनेत्रींचं नुकसान झालं. त्यांच्यासारख्या अत्यंत अनुभवी नृत्य दिग्दर्शकाच्या सानिध्यात आपलं नृत्य अधिक परिपक्व होत जातं. माझ्याबाबतीतही हेच घडलं. ‘तबाह हो गए’ हे गाणं ऐकताच सरोजजीच या गाण्याला योग्य न्याय देऊ शकतील, असं मला वाटलं. मग मीच त्यांना या गाण्यासाठी नृत्य दिग्दर्शन करण्याची विनंती केली. या गाण्याच्या निमित्ताने सरोजजी व रेमो डिसूझा एकत्र आले आणि या जोडीने खरंच कमाल केली. मी सरोजजींसोबत अनेक वर्षं काम केलं. काळाच्या ओघात आमचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं.