कोलकाता | Kolkata
पश्चिम बंगालमधील (West Bengal) कोलकाता (Kolkata) येथील चोरबागान सार्वजनिक दुर्गापूजा मंडपात (Durga Puja Mandp) शनिवारी (१७ ऑक्टोबर) संध्याकाळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू (Death) झाला असून, २५ हून अधिक भाविक गंभीर जखमी झाले आहेत. लखलखत्या प्रकाशलेल्या आणि आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या उत्सवाचे रूपांतर काही क्षणांतच एका दुर्दैवी शोकांतिकेत झाले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत पूजा समितीच्या सचिव आणि उपाध्यक्षांसह ७ जणांना अटक केली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
कोलकाता पोलिसांच्या (Kolkata Police) माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी चोरबागान दुर्गापूजा मंडपात भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. यादरम्यान अचानक पाऊस सुरू झाल्याने परिस्थिती आणखी बिघडली. त्यातच मंडपात गर्दी वाढत असताना, स्पिकरवरून मंडपाचा काही भाग कोसळण्याची शक्यता असल्याची चुकीची घोषणा करण्यात आली. या अफवेमुळे किंवा चुकीच्या सूचनेमुळे मंडपात असलेले भाविक प्रचंड घाबरले आणि बाहेर पडण्यासाठी एकच धावपळ व गोंधळ उडाला. यातूनच ही भीषण चेंगराचेंगरी झाली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मंडपाचे प्रवेशद्वार आणि येण्या-जाण्याचे मार्ग अत्यंत अरुंद असल्याचे समोर आले आहे. तसेच गर्दी नियंत्रणासाठी पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात नव्हते आणि आयोजकांचे गर्दीचे योग्य नियोजन नसल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
सात जण अटकेत, BNS अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल
दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गिरीश पार्क पोलीस ठाण्यात भारतीय (Girish Park Police Station) न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५, ११० आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, त्यापैकी ७ जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून तपास सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे ही घोषणा नेमकी कोणी आणि का केली, याचा कसून तपास सुरू असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे
- – राज कुमार सेवरा उर्फ राजा (४८) – पूजा समितीचे सचिव
- – शांतनु दुबे (५५) – उपाध्यक्ष
- – बिप्लब मुखर्जी उर्फ जॉय (४८) – बांबू स्ट्रक्चर (वासाचा सांगाडा) बनवण्याचे प्रमुख
- – कौशिक साहा (५३) – गर्दी नियंत्रण व व्हीआयपी पास तपासणी करणारे
- – पिंटू डे (५१) – गर्दी व्यवस्थापन पाहणारे
- – सुमन चक्रवर्ती (३०) – खाजगी सुरक्षा व्यवस्थेचे प्रमुख
- – राजेश पाल (२९) – सुरक्षा व्यवस्था कर्मचारी




