नवी दिल्ली – New Delhi
कोरोनाच्या महामारीत अथक परिश्रम करणार्या कोरोना योद्ध्यांना आयपीएल संघ दिल्ली कॅपिटल्स आपली जर्सी समर्पित करणार आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत दिल्लीचे खेळाडू ‘थँक्यू कोव्हिड वॉरियर्स’ असा संदेश लिहिलेली जर्सी परिधान करतील.
आज शनिवारी आयपीएलची सुरुवात चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याद्वारे होणार आहे. ‘दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकृत जर्सीवर ’थँक्यू कोव्हिड वॉरियर्स’ असे लिहिलेले असेल आणि संपूर्ण हंगामात संघ ही जर्सी परिधान करेल‘, असे संघाने एका निवेदनात म्हटले.
दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, फिरकीपटू अमित मिश्रा आणि सहायक प्रशिक्षक मोहम्मद कैफ यांनी व्हर्च्युअल बैठकीत डॉक्टर आणि पोलिस अधिकार्यांशी संवाद साधला. इशांत म्हणाला, ‘सर्व सफाई कामगार, डॉक्टर, सुरक्षा दल, रक्तदाते, समाजसेवक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना आमचा सलाम आहे.’
तर, अमित मिश्रा म्हणाला, ‘या कोरोना वॉरियर्सचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. आम्ही तुम्हा सर्वांना सलाम करतो. तुमचे कार्य प्रेरणा देत राहील.‘ यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही कोरोना योद्ध्यांना मानवंदना देणार असल्याचे सांगतिले आहे. त्यासाठी आयपीएलच्या हंगामात त्यांच्या जर्सीवर ’माय कोविड हिरोज’ हा संदेश लिहिला जाणार आहे.