Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याजिल्हा झाला केरोसीनमुक्त

जिल्हा झाला केरोसीनमुक्त

नाशिक । प्रतिनिधी

‘चूल मुक्त महाराष्ट्र, धूर मुक्त महाराष्ट्र’ या अभियानाची व्यापक अंमलबजावणीमुळे नाशिक जिल्हा केरोसीनमुक्त झाला आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील सर्व बिगर गॅस जोडणीधारकांना गॅस उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

मागील सहा महिन्यांंपासून जिल्हा प्रशासन करोना संकटाशी दोन हात करत असले तरी इतर आघाड्यांवर देखील शासनाच्या योजनांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. त्यापैकी चूल मुक्त महाराष्ट्र, धूर मुक्त महाराष्ट्र या मोहिमेवर जिल्हा प्रशासन काम करत होते.

सन 2019 पर्यंत येवला,चांदवड, बागलाण, मालेगाव, इगतपुरी, नांदगाव, दिंडोरी, कळवण, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सिन्नर व देवळा असे 13 तालुके व एक धान्य वितरण अधिकारी यांचे क्षेत्र केरोसीनमुक्त झाले होते, तर चालू वर्षाच्या प्रारंभी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे पेठ व सुरगाणा हे दोन तालुके देखील केरोसीन मुक्त झाले.

जिल्ह्यातील धान्य वितरण अधिकारी मालेगाव यांचे क्षेत्र वगळता सर्व तालुके केरोसिन मुक्त झाले. करोना संकटामुळे धान्य वितरण अधिकारी मालेगाव यांचे कार्यक्षेत्र केरोसीनमुक्त करण्याच्या कामात अडथळे निर्माण होत होते.

मागील ऑगस्टपर्यंत या ठिकाणी लाभार्थ्यांना केरोसीन वितरण केले जात होते. संप्टेंबर महिन्यापासून मालेगाव वितरण अधिकारी यांचा केरोसीन कोटा निरंक करण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या प्रारंभी मालेगाव तालुका देखील केरोसीन मुक्त करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले.त्यामुळे सर्व पंधरा तालुके व दोन धान्य वितरण अधिकारी यांचे कार्यक्षेत्र केरोसीन मुक्त करण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे.

शासनाच्या ’चूल मुक्त महाराष्ट्र, धूर मुक्त महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व 15 तालुके केरोसीन मुक्त करण्यात आले आहे. सर्व बिगर गॅस जोडणी धारकांना गॅस उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

- Advertisment -

ताज्या बातम्या