Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यारोजगार हमीची कामे दोन महिन्यांपासून ठप्प

रोजगार हमीची कामे दोन महिन्यांपासून ठप्प

नाशिक। प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme )कामांवरील मजुरांची उपस्थिती नोंदवण्यासाठी 1 जानेवारीपासून मोबाईलद्वारे एनएमएमएस या प्रणालीचा वापर करून दिवसातून दोन वेळा (सकाळी 6 ते 11 व दुपारी 2 ते 4) फोटो अपलोड करणे बंधनकारक केल्यामुळे जिल्ह्यातील कुशल व अकुशल मजुरांकडून करण्यात येणारी रोजगारी हमी योजनेतील सार्वजनिक कामे जवळपास दोन महिन्यांपासून ठप्प आहेत.

- Advertisement -

रोजगार हमी योजनेतून सार्वजनिक व वैयक्तिक लाभाची कामे करता येतात. रोजगार हमी योजनेतील काम करण्यासाठी मजुरांनी रोजगार कार्ड नोंदवणे गरजेचे असते. त्यानंतर रोजगार हमी योजनेतील कामे करता येतात. वैयक्तिक लाभाच्या योजनेत प्रत्यक्ष लाभधारक कुटुंबातील सदस्यांकडे रोजगार कार्ड असणे बंधनकारक असते. सार्वजनिक कामे जसे पांणंध रस्ता, शिवार रस्ता, बंधारे आदी कामे करताना 90 टक्के काम यंत्राने व 10 टक्के काम मजुरांकडून करून घेणे बंधनकारक असते.

यापूर्वी कुशल व अकुशल कामांचे 60:40 हे प्रमाण गावपातळीवर राखणे बंधनकारक असल्यामुळे सार्वजनिक कामे करण्यास मर्यादा येत होत्या. आता हे प्रमाण जिल्ह्यासाठी ठरवण्यात आल्यामुळे रोजगार हमीतील कामांचा आराखडा तयार करताना वनविभाग, सामाजिक वनीकरण, जलसंधारण विभाग तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांवरील मजूर यांच्या संख्येवरून 60 : 40 प्रमाण राखले जाते. यामुळे रोजगार हमी योजनेतून रस्ते, शिवाररस्ते, पाणंध रस्ते तसेच बंधार्‍यांची कामे मोठ्याप्रमाणावर मंजूर केली जातात व त्यात ठेकेदारी पद्धतीने शिरकाव केला जातो.

मजुरांकडून 10 टक्के काम करून घेणे अपेक्षित असताना ठेकेदार संपूर्ण काम मजुरांकडून करून घेतात व ग्रामरोजगार सेवकास हाताला धरून केवळ कागदोपत्री मजुरांची हजेरी दाखवली जाते, अशा तक्रारी सरकारकडे गेल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून सार्वजनिक लाभाच्या कामांवरील मजुरांची मोबाईल अ‍ॅपद्वारे हजेरी घेणे बंधनकारक केले आहे.

पूर्वी हा नियम 20 पेक्षा अधिक मजूर असलेल्या कामांसाठीच लागू होता. आता तो सरसकट लागू केला आहे. रोजगार हमी योजनेसाठी 256 रुपये मजुरी दिली जाते तसेच त्यासाठी किती काम करायचे हेही निश्चित केलेले आहे. त्याचवेळी शेतीकामासाठी कामानुसार 300 ते 500 रुपये रोज मिळत असतो. तसेच दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी पैसे मिळण्याची हमी असते. त्या तुलनेत रोजगार हमी योजनेवर काम केल्यानंतर किमान पंधरा दिवसांनी पैसे मिळत असतात. यामुळे सर्वसाधारण भागात रोजगार हमीच्या कामांसाठी मजूर मिळत नाही. या नव्या नियमामुळे फोटो काढण्यासाठी मजूर आणायचे कोठून, असा प्रश्न ठेकेदारांसमोर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या