नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महानगरातील राममंदिरात श्रीरामनवमी अमाप उत्साहात साजरी झाली. यानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. प्रभू श्रीरांमांंची पूजा, अर्चना, नामघोषाने नाशिक नगरी दुमदुमून निघाली होती. यावेळी प्रवचन, कीर्तन, प्रसाद वाटप आदी कार्यक्रम पार पडले.
नाशकातील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दुपारी बारा वाजता प्रभू श्रीरामचंद्रांच्या जयघोषात महापूजा करण्यात झाली. गेले नऊ दिवसांपासून येथे सुरु असलेल्या वासंतिक महोत्सवाचा समारोप झाला. संस्थानकडून पंजीरीचा व बुंदीचा प्रसाद देण्यात आला. यावेळी रामभक्तांची गर्दी पाहवयास मिळाली.
चैत्रस्वर
श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात ‘कृपा मजवरी ठेवा’, ‘गुरु एक जगी त्राता’, ‘जैसी गंगा वाहे’, ‘ठुमक चलत रामचंद्र वाजत पैजनिया’, ‘हरि म्हणा कुणी’ या आणि अशा मराठी व हिंदी विविध भक्तीगीतांच्या सुरांनी काळाराम मंदिर परिसराचे वातावरण प्रस्न्न झाले. श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे आयोजित वासंतिक नवरात्र महोत्सवात शनिवारी ‘चैत्रस्वर’ हा श्रुतिका शुक्ल यांचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाची सुरवात ‘श्रीरामचंद्र कृपाळू’ या गीताने झाली. सुरेल आवाजातील त्यांच्या भक्तीगीतांनी भक्तीरंगांची उधळण केली. त्यांनी गेलेल्या भक्तीगीतांना रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. ‘हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा गोपाळ म्हणा नारायणा’, ‘गुरूविना नाही थारा’, ‘कृपा मजवरी’, वृंदावणी वेणू, पांडुरंग नामी’, ‘स्वामी कृपा कधी करणार’ आदी भक्तीगीतांचे गायन शुक्ल यांनी केले. त्यांना ज्ञानेश्वर कासार (संवादिनी), आदित्य कुलकर्णी (तबला), दिगंबर सोनवणे (पखवाज), भालेराव (तालवाद्य) यांनी संगीत साथ केली.
एकनाथ कुलकर्णी, शुभम मंत्री, मंदार जानोरकर यांनी स्वागत केले. बाळकृष्ण फुलरीया, राहुल लभडे, अभिजित पैठणकर यांचा सत्कार करण्यात आला. शिल्पा हासे यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान, नाशिक येथील श्रीकाळाराम मंदिरात जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदींसह माजी खा. हेमंत गोडसे,कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, आ. देवयानी फरांदे, खा. संजय राऊत, खा. राजाभाऊ वाजे, सुधाकर बडगुजर, सुनील बागुल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खा. शोभा बच्छाव, आ. छगन भुजबळ, आ. पंकज भुजबळ, , वसंत गिते, विलास शिंदे, मामा राजवाडे यांच्यासह राजकीय क्षेत्रातील नेते, पदाधिकारी तसेच प्रशासनातील अधिकार्यांनी दर्शन घेतले.