Saturday, October 5, 2024
HomeनगरShrirampur Congress : पक्षनिरीक्षकांसमोर ससाणे-कानडे गटाची गटबाजी चव्हाट्यावर

Shrirampur Congress : पक्षनिरीक्षकांसमोर ससाणे-कानडे गटाची गटबाजी चव्हाट्यावर

शिर्डी (प्रतिनिधी)

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या ससाणे आ. कानडे गटाने उमेदवारी मिळण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले.

- Advertisement -

एकमेकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला. पक्ष निरीक्षक, जिल्हाध्यक्ष तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी करत या वादावर पडदा टाकला. मात्र गटबाजीची राजकीय वर्तुळात शुक्रवारी चांगलीच चर्चा रंगली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदार संघांत काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यांची नेमणूक केली आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी शिर्डी येथे सकाळी शिर्डी, अकोले, नेवासा, श्रीरामपूर, या विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुलाखतीसाठी हजेरी लावली.

पक्ष निरीक्षक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत घेत असताना श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आ. लहू कानडे व माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे गटाच्या समर्थकांनी घोषणाबाजी करत बैठकीत गोंधळ घातला. ‘एकच वादा करण दादा’ अशा घोषणा एका गटाने दिल्या तर ‘कानडे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देत दुसऱ्या गटाने बैठकीत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

पक्ष निरीक्षक मुजफ्फर हुसेन, जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले व काही पदाधिकाऱ्यांनी या वादावर मध्यस्थी केली. त्यामुळे या वादावर पडदा पडला. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत श्रीरामपूर येथील काँग्रेसच्या दोन गटात असलेली अंतर्गत गटबाजी या निमित्ताने दिसून आली. या मुलाखतीत झालेली घोषणाबाजी व अंतर्गत गटबाजीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली दिसून आली.

शिर्डी, नेवासा, अकोलेतून यांनी दिल्या मुलाखती

शिर्डी विधानसभा मतदारसंघात डॉ. एकनाथ गोंदकर, अॅड. पंकज लोंढे, शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून आ. लहू कानडे, हेमंत ओगले, चेतना बनकर, विजय खाजेकर, प्रकाश संसारे, विश्वनाथ निर्वाण, युवराज बागुल, नेवासा विधानसभा मतदारसंघात संभाजी माळवदे, सुरेश शेटे, अकोले विधानसभा मतदारसंघातून सतीश भांगरे या इच्छुक उमेदवारांनी शुक्रवारी पक्ष निरीक्षकांना काँग्रेसचे तिकीट मिळण्यासाठी मुलाखती दिल्या. कोपरगाव व संगमनेर विधानसभा मतदारसंघातून कुठल्याही इच्छुक उमेदवारांनी मुलाखत दिली नसल्याचे समजते

- Advertisment -

ताज्या बातम्या