धमाने – Dhule – Dhamane
आई-वडिलांची अपार मेहनत, रात्रंदिवस केलेली शेतमजुरी आणि आचारीचे काम करतांना वडीलांना बसलेले विस्तवाचे चटके या सर्व गोष्टींचे भान ठेवून उच्च अधिकारी व्हायचे हे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षेला सामोरे जाणारा नगाव येथील तरुण गोपाल अभिमन पाटील याने अखेर आरटीओ पदाला गवसणी घातली.
धुळे तालुक्यातील नगाव येथील गोपाल अभिमन पाटील या तरुणाची सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आरटीओपदी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत निवड करण्यात आली. नुकत्याच जाहीर झालेल्या प्रतीक्षा यादीतील निकालातही निवड करण्यात आली आहे. दरम्यान गोपाल पाटील हा नगाव येथील अतिशय सामान्य कुटुंबातील गरीब शेतकरी व आचारी अभीमन राजाराम पाटील यांचा मुलगा आहे.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या 2017 मध्ये झालेल्या परीक्षेत त्याना हे यश प्राप्त झाले आहे. याआधी तो पारोळा नगरपालिकेमध्ये कर प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होतो. त्यानंतर दिलेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन कर सहाय्यक म्हणून मुंबई येथे सध्या सेवेत आहे. 2017 मध्ये आरटीओ पदासाठीची परीक्षा त्याने दिली होती. तेव्हा जाहीर झालेल्या निकालात ते प्रतीक्षा यादीत होता. आज प्रतीक्षा यादीतून त्याची ही निवड जाहीर करण्यात आली.
ही बातमी नगावमध्ये पोहोचताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान गोपाल पाटील याचे चुलत भाऊ सतीश पाटील हे देखील न्यायाधीश पदावर कार्यरत आहेत. गोपाल पाटील यांचे प्राथमिक माध्यमिक व उंच तंत्रनिकेतनचे शिक्षण हे नगाव येथेच झालेले आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून गेलेल्या या तरुणाने मिळविलेले हे यश म्हणजे नगाव भूमीतील यशस्वी तरुणांच्या शिरपेचात रोवलेला एक तुरा आहे.
नगाव बनते स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचे हब
धुळे शहरापासून जवळच असलेल्या नगाव या एका खेडे गावातील तरुणांनी जणू स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन उच्च अधिकारी पद प्राप्त करण्याचा जणू विडाच उचलला आहे. कारण याच गावातून स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्यांमध्ये न्यायाधीश, पोलीस निरीक्षक, पोलीस विक्रीकर निरीक्षक, डॉक्टर, समाज कल्याण अधिकारी आणि आता आरटीओ अशा विविध पदांवर निवड होणे सुरूच आहे. त्यामुळे नगाव हे स्पर्धा परीक्षेतील यशस्वीत्यांचाही हब बनत चालल्याचे म्हटले जाते.
मला मिळालेले यश हे पूर्णपणे माझ्या शिक्षणासाठी ज्या आई-वडिलांनी अहोरात्र परिश्रम घेतले त्याचेच फळ आहे. तसेच मी नगाव या खेडेगावात प्राथमिक माध्यमिक व उच्च तंत्रनिकेतनचे शिक्षण गावातच पूर्ण केले. तेथील गुरुजनांचे मिळणारे मार्गदर्शनही मी विसरू शकणार नाही.
गोपाल पाटील, नगाव