– आनंद खरे
टेनिस व्हॉलिबॉल या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांचा आज (16 जुलै) जन्मदिन! हा दिवस ‘जागतिक टेनिस व्हॉलिबॉल दिवस’ म्हणून साजरा केला येतो. त्यानिमित्त…
आज 16 जुलै! जागतिक टेनिस व्हॉलिबॉल दिवस! टेनिस व्हॉलिबॉल हा भारतीय आणि महाराष्ट्राचा खेळ आहे. या खेळाची सुरुवात 1999 साली झाली. या खेळाची एकविसाव्या वर्षात यशस्वी वाटचाल सुरु झाली आहे. पुण्याचे डॉ. व्यंकटेश वांगवाड या खेळाचे जनक! अथक परिश्रम घेऊन त्यांनी या खेळाची उत्तरोत्तर भरभराट केली आहे. डॉ. वांगवाड यांनी टेनिस व्हॉलिबॉल खेळाला आपले आयुष्य वाहून घेतले आहे.
या खेळाचा प्रचार-प्रचार योग्य पद्धतीने व्हावा म्हणून भारतातील सर्व राज्यांचे दौरे केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा खेळ स्थिरस्थावर होण्यासाठी तेथील क्रीडा संघटना आणि संघटकांशी बोलून आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले आहे. या खेळाला शासन मान्यता आणि सर्व प्रकारचे सहकार्य मिळवण्यासाठी अनेक वेळा मुंबई आणि दिल्ली दौरे केले आहेत. विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन प्रयत्न सुरु ठेवले आहेत. अर्थात हे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी त्यांना पदरमोड करून अमाप पैसा खर्च करावा लागला. त्याची कोणतीही पर्वा न करता या मराठी खेळाला जागतिक पातळीवर आणि थेट ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्याची मनिषा त्यांना स्वस्थ बसू देत नाही.
एकवीस वर्षांच्या कालखंडात विविध गटाच्या 21 राज्यस्तरीय आणि 21 राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. याचबरोबर सन 1913-14 पासून या खेळाचा शालेय राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये समावेश झाला आहे. सन 2000 ला त्यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये परिसवांदात हा खेळ सादर केला. 2001 ला रशिया दौरा करून प्रात्यक्षिके सादर केली. त्यानंतर थायलंड, बँकॉक, मलेशिया, श्रीलंका, भूतान, नेपाळ, बांगला देश आदी देशांचे दौरे करून या खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी काम केले.
आतापर्यंत 10 आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजिथ केल्या आहेत. गेल्या वर्षीच्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पुणे, बालेवाडी येथील क्रीडा संकुलात पहिल्या आशियाई स्पर्धांचे आयोजन केले. या खेळाच्या वाटचालीत डॉ. व्यंकटेश वांगवाड यांनी जे अथक परिश्रम घेतले आहेत याची जाणीव ठेवून त्यांच्या जन्मदिन म्हणजे 16 जुलै हा दिवस ‘जागतिक टेनिस व्हॉलिबॉल दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. दरवर्षी यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. गेल्या 3 महिन्यांपासून देशात ‘करोना’चा प्रादुर्भाव सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणे सध्यस्थितीत शक्य नाही. म्हणून आज (16 जुलै) ऑनलाईन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
याचाच भाग म्हणून 11-12 जुलैस राज्यस्तरीय पंच परीक्षा घेण्यात आली. आज प्रत्येक जिल्ह्यात वृक्षारोपण, चर्चासत्र, परिसंवाद आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लॉकडाउन असले तरी सर्व जिल्ह्यांत, सर्व राज्यांत आणि देशाबाहेरही असे विविध कार्यक्रम आयोजित करून जागतिक टेनिस व्हॉलिबॉल दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करून या खेळाचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड यांना त्यांचा 71 व्या जन्मदिवशी शुभेच्छा देऊया!