नाशिक | मोहन कानकाटे Nashik
आपल्याकडे प्राचीन काळापासून एकत्रित कुटुंबपद्धती आहे. आता कालमानानुसार त्यात बदल होतांना दिसत आहे. आधुनिकीकरण,नागरिकरण किंवा छोटी कुटुंब व्यवस्था या अशा अनेक कारणांमुळे ही एकत्र कुटुंबपद्धती विभक्त स्वरूपात आकाराला येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या छोट्या कुटुंब व्यवस्थेतही तिघा चौघांमध्ये एकमत होत नाही किंवा योग्य सुसंवादही आढळत नाही. त्यामुळे घरात सातत्याने अनेक प्रकारचे वादविवाद होत असतात. एकंदरीत एकत्रित कुटूंब पद्धतीचा धाक उरला नाही अशी परिस्थिती आहे.शिवाय गरिबी, दारिद्र्य, बेरोजगारी या कारणांमुळे सामाजिक स्तरावरचे एक करुणाजनक चित्रही पाहायला मिळते.
याच गरिबी आणि दारिद्र्यामुळे अनेक घटना घडत असतात. गुन्हेगारी हा त्यातला एक भाग आहेच, परंतु पोट भरण्यासाठी किंवा असमंजसपणामुळे आपले घर सोडून पळून जाणार्या मुलींची संख्या हा सामाजिक स्तरावरचा एक विचित्र भाग अनुभवायला येतो. जेव्हा या मुली आपले स्वतःचे घर सोडून आई-वडिलांना दूर लोटून घरातून पळ काढतात. त्यावेळी एकत्र असलेल्या या समाजातील वेदना तीव्रपणे जाणवत राहते. बर्याचदा या मुली रेल्वे प्लॅटफॉर्म, बस स्थानक किंवा फुटपाथ किंवा मित्र-मैत्रिणींकडे आश्रयाला असतात. त्यांचे वय लक्षात घेता, त्यांची विचारणा केल्यास वेगवेगळी कारणे ते घर सोडून पळून आल्याचे सांगतात. अर्थात ज्या वयात या मुली पळून जातात ते वय काही विचार करण्यासारखे नसते.
यामधील अनेक मुलींचा गैरवापर देखील होत असतो. घरदार नाही, कुटुंब नाही, डोक्यावर छप्पर नाही. अशावेळी निम्म्या मुली भीक मागून किंवा त्यांचा भीक मागण्यासाठी वापर होऊन कसेतरी जीवन जगत असतात. तसेच त्यांची परिस्थिती कोमेजल्यासारखी असते. जगण्याचा आधार त्या मुली शोधत असतात. परंतु, त्याची खात्री आणि हमी नसल्याने निराधार आणि निराश्रय अवस्थेमध्ये या मुलींना आपले आयुष्य जबरदस्तीने सहन करावे लागत असल्याचे दिसते.प्रामुख्याने देशासह राज्यातील सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये हा प्रकार घडतांना दिसत आहे.
मुली घर सोडून जाण्याची कारणे
1) प्रेमप्रकरण – सध्या मुलींमध्ये प्रेमप्रकरण हे घर सोडून जाण्याचे मुख्य कारण असल्याचे समोर येत आहे. याचबरोबर आई-वडिलांसोबत क्षुल्लक कारणावरून झालेला वाद देखील मुलींच्या घर सोडण्याला कारणीभूत ठरत आहे.
2) हट्टी स्वभाव – काही मुली हट्टी स्वभावाच्या असतात. त्यातून बर्याचदा घरी न सांगता बाहेर मित्रमैत्रीण किंवा नातेवाइकांकडे या मुली जातात. त्यापैकी काही मुली दोन-तीन दिवसांत घरी परत येतात. परंतु, काही मात्र येत नाहीत.
3) सोशल मीडियाचा अतिवापर – मोबाईलवर सोशल मीडियाचा अतिवापर होत असल्याचे पाहायला मिळत असून या वयात मुली तारुण्यात येत असतात. त्यामुळे प्रेमाच्या आकर्षणातून आमिषाला बळी पडून मुली गैरमार्गावर जाऊन घरातून पलायन करतांना दिसतात.
4) पालकांचे दुर्लक्ष – आई-वडील कामानिमित्त दिवसभर घराबाहेर असल्याने मुलींकडे दुर्लक्ष होते. या दुर्लक्षाचा गैरफायदा घेऊन मुली घर सोडून जाताना दिसतात.
5) इतर कारणे – घरातील वातावरण, आर्थिक परिस्थिती, घरात सतत भांडण, शिक्षणाचा अभाव, संगत हे देखील मुलींच्या घर सोडण्यास कारणीभूत ठरत असल्याचे दिसत आहे.
पालकांनी घ्यावयाची काळजी
पालकांनी मुलींसोबत सुसंवाद साधावा.
मुलींसोबत मैत्रीचे नाते जपण्यासोबत आदरयुक्त धाकही आवश्यक.
मुलींचे मित्र-मैत्रीण कोण आहेत हे पाहणे महत्त्वाचे.
पालकांनी मुलींवर योग्य संस्कार होतील, असे स्वत:चे वर्तन ठेवावे.
कुटुंबातील व्यक्तींनी मुलाबाळांसमोर वाद टाळावेत, गरज भासल्यास योग्य समुपदेशकाकडून सल्ला घ्यावा.
मुलींना मारहाण न करता समजावून सांगावे.