Saturday, May 4, 2024
Homeजळगावपहिल्याच दिवशी निर्बंधांचा बोजवारा

पहिल्याच दिवशी निर्बंधांचा बोजवारा

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

कोरोनानंतर आता जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा जिल्ह्यात रविवार सकाळी 5 वाजेपासून कडक निर्बंध लागू केले आहे. यातच शनिवार, रविवार कडक निर्बंध लागू असतांना आज पहिल्याच दिवशी नागरिकांनी सर्व नियम धाब्यावर बसविले. त्यामुळे कडक निर्बंध लागू केल्यानंतर देखील नागरिकांनी निर्बंधांचे तीनतेर वाजविले. मात्र दुपारनंतर शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील मार्केटमध्ये सन्नाटा पसरला होता.

- Advertisement -

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा नवीन विषाणू डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने शासनाने शिथील केलेल्या निर्बंध पुन्हा लागू केले आहे. दरम्यान शनिवारी सायंकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचे आदेश काढले असून जिल्ह्यात वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व उद्योग व व्यसायासाठी निर्बंध घालून दिले आहेत. 27 जून रोजी सकाळी 5 वाजेपासून लागू झाले आहे.

यात प्रशासनाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व प्रकारची दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार असून शनिवार व रविवार पुर्णपणे कडक निर्बंध लागू केले आहे. मात्र कडक निर्बंधांच्या पहिल्याच दिवशी नागरकांनी भाजी विक्रेत्यांसह फळ विक्रेते व व्यापार्‍यांनी आपली दुकाने थाटली होती. परंतु काही वेळातच पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेत विक्रेत्यांना आपली दुकाने बंद करण्यास सांगितली.

मात्र तरी देखील शहरातील गांधी मार्केट, फुले मार्केट, गोलाणी मार्केटसह अन्य मार्केटमधील दुकाने खुली ठेवली होती. परंतु दुपारनंतर मार्केटमध्ये देखील शुकशुकाट दिसून आला.

प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्यात कडक निर्बंधाबाबतचे आदेश काढले. रविवार सकाळी 5 वाजेपासून या आदेशाची अंमलबजावणीचे आदेश आहेत. यात शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने दोन दिवस बंद ठेवण्याचे आदेश असतांना नागरिकांमध्ये याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

सायंकाळी पोलिसांकडून चौकशी

प्रशासनाने व्यापारासह दुकानदारांना सायंकाळी 4 वाजेपर्यंतची मुभा दिली आहे. त्यामुळे पाच वाजेनंतर शहरातील प्रत्येक चौकात पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्याने येणार्‍या जाणार्‍याची पोलीसांकडून कसून चौकशी केली जात होती. तर विनाकारण फिरणार्‍यांना देखील चांगला चोप दिला जात होता.

सायंकाळनंतर नागरिकांची वर्दळ

प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहे. मात्र आज रविवार असल्याने अनेक जण आपल्या कुटुंबियांसोबत फिरायला निघाले होते. दरम्यान मेहरुण तलावावर देखील सायंकाळी गर्दी झाली होती. तसेच नागरिकांनी रस्त्यांवर होणारी गर्दी सायंकाळपर्यंत कायम असल्याने नागरिकांकडून निर्बंधाचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या