राज्यात शिवजयंती उत्साहात साजरी झाली. मोठमोठ्या गडकिल्ल्यांपासून छोट्या छोट्या गल्ल्यांमध्येही शिवचरित्राचे देखावे मांडले गेले होते. गडकिल्ले हा चिरंतन ठेवा आहे. तो जपण्यासाठी निधी देण्यास सरकार हात आखडता घेणार नाही, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शिवजयंतीनिमित्त आयोजित एका सार्वजनिक सभेत ते बोलत होते. गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीचे वारसदार आहेत. शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व समजावून घेण्यासाठी संशोधकांना हेच किल्ले खुणावतात. इतिहासाचा अभ्यास करताना शिकलेले छत्रपतींच्या पराक्रमाचे धडे गडकिल्ले डोळ्यासमोर उभे करतात. गडकिल्ल्यांवरील अवशेष त्यांच्या पराक्रमाची गाथा वर्णन करतात. छत्रपतींचे जीवन म्हणजे मुल्यसंस्कारांची शाळाच होते. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी मिरवणुका निघाल्या. त्या मिरवणुकांमध्ये छत्रपतींचा वेश धारण केलेल्या बच्चेकंपनीची संख्याही लक्षणीय होती. त्यांच्यापर्यंत महाराजांची पराक्रमगाथा पोहचवण्याचे काम गडकिल्लेच करतील. भविष्याच्या वाटचालीसाठी इतिहास मार्गदर्शक ठरतो असे म्हणतात. गडकिल्ल्यांची जपणूक व्हायलाच हवी. पण त्यासाठी प्रचंड निधी लागतो. तीच गरज मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतली आहे. निधीची कमतरता भासू देणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. त्याचे मराठी मुलखातील जनता स्वागतच करेल. दुदैर्वाने काही अपवाद वगळता अनेक किल्ल्यांची पडझड झालेली आढळते. किल्ल्यांवरील वास्तुंचे भग्नावशेष आढळतात. कचर्याचे ढिग साठलेले असतात. प्लास्टिकच्या कचर्याने गडांना सुद्धा वेढा घातलेला आढळतो. गडाच्या दगडी भिंतींवर नावे कोरलेली असतात. माहिती फलकांचाही अभाव अनेक ठिकाणी आढळतो. किंवा फलक असलेच तर त्यावरचा मजकुर वाचता येणार नाहीत इतके पुसट होतात. तटबंदी कोसळलेली असते. छत्रपतींचे गडकिल्ले उद्वस्त होणे म्हणजे इतिहास लयाला जाणे. त्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जपला जायलाच हवा आणि त्यासाठी नियोजबद्ध धोरण आखले जायला हवे. किल्ल्यांच्या सद्यस्थितीनुसार आराखडा तयार केला जायला हवा. जाणकार आणि संशोधकच ते काम करु शकतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वारशाची जपणूक केली जायला हवी. सध्या अनेक सामाजिक संस्था गडकिल्ले स्वच्छ करतात. त्यासाठी सातत्याने मोहिम राबवतात. वृक्षारोपण करतात. तेही काम गरजेचेच. संवर्धनाचे निश्तिच धोरण त्यांच्याही कामाला दिशा देण्याचे काम करेल. गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण जरुर केले जावे. तथापि कोणते वृक्ष लावायचे याची जाण नसेल तर ज्याची मुळे दगडी भिंतही फोडतात अशा पिंपळ वृक्षांची रोपेही लावली जातात अशी खंत अभ्यासक व्यक्त करतात. त्यातील मर्म शासन लक्षात घेईल का? तात्पर्य, गडकिल्ल्यांच्या सद्यस्थितीचा अभ्यास केला जायला हवा. गडकिल्ल्यांवरील अवशेषांची पुर्नबांधणी संशोधक आणि तज्ञांच्या सल्ल्यांशिवाय व्हायला नकोत. गडकिल्ले बाराही महिने जागते ठेवले जाऊ शकतील का? त्यासाठी स्थानिक जनतेला सहभागी करुन घेता येऊ शकेल. त्यांनाच त्या त्या गडकिल्ल्याचा इतिहास शिकवला तर कदाचित त्यांच्या रोजगाराचाही प्रश्न सुटू शकेल. अनेक दुर्गसंस्था असे प्रयत्न सातत्याने करत असतात. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले की सत्ताधार्यांना गडकिल्ल्यांची हमखास आठवण होते. त्यांच्या जपणुकीचे आश्वासन दिले जाते. तथापि गडकिल्ले हे राजकारणाचा विषय होऊ नये अशी जनतेची अपेक्षा आहे.