वसंतदादा पाटील यांचा मुख्यमंत्रीपदाचा दुसरा कार्यकाळ मार्च १९७८ ते जुलै १९७८ असा जेमतेम चार महिन्यांचाच होता. पण एवढय़ा कमी काळासाठीचे मुख्यमंत्रीपद मिळविताना दादांना पहिल्या मुख्यमंत्रीपदापेक्षा
अधिक यातायात करावी लागली. त्यांचे हे मुख्यमंत्रीपद इंदिरा काँग्रेस व रेड्डी काँग्रेसच्या आघाडीचे प्रमुख या नात्याने होते. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा नव्यानेच स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर नाराज झालेल्या काँग्रेसमधील काही नेत्यांनी ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली रेड्डी काँग्रेसची स्थापना करून इंदिरा गांधींशी उभा दावा मांडला.
इंदिरा गांधी यांच्या सर्वाधिक राजकीय अडचणीच्या काळात आपणच त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे पहिले मराठी नेते होतो असे स्वत:चे ढोल वाजवून एकापेक्षा एक सरस राजकीय पदे मिळविणारे शिवराज पाटील हेही त्या वेळी रेड्डी काँग्रेसच्या कळपात होते. रेड्डी काँग्रेसच्या स्थापनेनिमित्त शिवाजी पार्कवर झालेल्या प्रचंड सभेत (या सभेला झालेल्या गर्दीत माथाडी कामगारांचीच संख्या मोठी होती) पक्षाध्यक्ष ब्रह्मानंद रेड्डी यांनी अस्सल इंग्रजीत जे भाषण ठोकले त्याचा मराठी अनुवाद या शिवराज पाटलांनीच जनसमुदायाला ऐकविला होता. असो. सांगायचा मुद्दा हा की, रेड्डी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काही दिवसांतच दिल्लीत इंदिरा काँग्रेसचीही स्थापना झाली. त्या स्थापना सोहळ्यासाठी तेव्हा महाराष्ट्रात मंत्री असलेले नाशिकराव तिरपुडे दिल्लीस गेले होते. त्यांनी तेथूनच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्याकडे पाठवून दिला. त्यानंतर तिरपुडे दिल्लीहून मुंबईला परतले ते इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणूनच. त्याच दरम्यान महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या.
या निवडणुकीत रेड्डी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि जनता पक्ष यांच्यात धमासान लढाई झाली. जनता पक्षाने सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या. इंदिरा काँग्रेसला ६९ जागांवर तर रेड्डी काँग्रेसला ६२ जागांवर विजय मिळाला. त्यानंतर सुरू झाली ती सत्तासंपादनाची स्पर्धा. यानिमित्ताने वसंतदादा पाटील यांचे यशस्वी राजकीय डावपेचही राज्यातील जनतेला पाहायला मिळाले. संयुक्त आघाडी सरकारसाठी दादांनी त्या वेळी जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या एस. एम. जोशी यांच्याशी आपण चर्चा करीत असल्याचे भासवत दुसरीकडे इंदिरा काँग्रेसचे प्रमुख नाशिकराव तिरपुडे यांच्याशीही चर्चेचे नाटक सुरू ठेवले आणि अगदी मोक्याच्या क्षणी जनता पक्षाच्या नेत्यांना तोंडघशी पाडून इंदिरा काँग्रेसबरोबर आघाडी करून राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावाही केला. दादांनी हा दावा करताच आवाक् झालेल्या जनता पक्षाच्या नेत्यांनी आकांडतांडव केले आणि सर्वाधिक जागा जनता पक्षानेच जिंकल्यामुळे सरकार स्थापनेची संधी आम्हालाच मिळायला हवी, अशी मागणी राज्यपालांकडे केली, पण ती फेटाळण्यात आली आणि राज्यपालांनी इंदिरा काँग्रेस-रेड्डी काँग्रेस यांना संयुक्त सरकार स्थापण्यास परवानगी दिली. मग वसंतदादा मुख्यमंत्री, तिरपुडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशी पदांची वाटणी झाली आणि दादा-तिरपुडे यांचा शपथविधीही पार पडला. शरद पवार या सरकारमध्ये उद्योगमंत्री होते. दोन काँग्रेसची ही ढकलगाडी फार काळ धावणार नाही हे राज्यातील सर्वच पक्षांनी ओळखले होते. सरकार दादांनी चालवावे, मी माझ्या पद्धतीने चालणार अशा थाटात तिरपुडे मात्र दादागिरी करत होते.
त्यांनी राज्यभर दौरे काढून इंदिरा काँग्रेसला मजबूत करण्याच्या नावाखाली यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि शरद पवार यांच्यावर टिकेची झोड उठविण्यास सुरुवात केली. चव्हाणांना पुढे करून दादा-पवार गुळाला मुंगळे चिकटावेत तसे सत्तेला चिकटून बसले आहेत, असे तिरपुडे सातत्याने सर्वत्र सांगत फिरत होते. त्यांच्या टीकेने यशवंतराव कमालीचे व्यथित झाले होते तर वसंतदादांना संताप अनावर होत होता. अशा संतापाच्या भरातच एकदा त्यांनी शरद पवार यांना बोलावून घेऊन ‘‘शरद, या नाशिकरावचे बघा काय तरी, नाही तर मीच राज्यपालांकडे राजीनामा देऊन आपल्या सगळ्यांचीच नाशिकरावच्या जाचातून सुटका करून घेतो,’’ असे सांगितले. पण पवारांनी, ‘‘आपण लवकरच यावर तोडगा काढू, सध्या तुम्ही शांत राहा,’’ असे सांगत दादांची समजूत काढली.
पुढे काही दिवसांतच शरद पवार यांनी सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार शिंदे आणि दत्ता मेघे या अन्य तीन मंत्र्यांसह, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चालू असतानाच मंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची नाटय़मय घोषणा करून ऐन अधिवेशनातच दादांचे सरकार पाडून टाकले. वसंतदादांसारख्या डोंगराएवढय़ा नेत्याचे सरकार पवारांनी पाडल्याच्या घटनेची राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटली. शरद पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप अनेकांनी केला. खरे तर पवारांच्या मागे यशवंतराव चव्हाणांनी अत्यंत छुपेपणाने आपली ताकद उभी केली होती. पवारही सर्व हालचाली करून स्वत: नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करीत होते.
दादांसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रमाद आपल्याकडून घडणे शक्यच नाही असे स्पष्ट करून त्यांनी तेव्हा त्यांच्यावर झालेल्या आरोपांचा इन्कारही केला होता, पण यशवंतरावांच्या सल्ल्यानेच त्यांनी मंत्रिमंडळ पाडले होते. अर्थात येथे एक गोष्ट नमूद करायला हवी. ती म्हणजे पवारांनी दादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप अन्य अनेकांनी केला तरी स्वत: दादांनी मात्र तसा थेट आरोप कधीही केला नव्हता. शरदने आपल्याला फसविले, ही भावना तेव्हा दादांनी काही खास जिव्हाळ्याच्या माणसांकडे मात्र व्यक्त केली होती. ‘‘पवार सतत यशवंतरावांच्या संपर्कात होते आणि त्यांच्या भेटीही होत होत्या, हे काय मला माहीत नाही काय?’’ असे वैतागलेले उद्गार दादांनी, ते काळजीवाहू मुख्यमंत्री असताना वर्षां बंगल्यावरील एका बैठकीत काढले होते. एका ज्येष्ठ नेत्याने त्याच्याहीपेक्षा ज्येष्ठ असलेल्या नेत्याचे सरकार पाडणे ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एकमेव घटना कशी घडली याची माहिती स्वत: पवारांनीच अलीकडे एका मुलाखतीत कथन केली होती. नरिमन पॉइंटवरील एअर इंडिया इमारतीच्या बरोबर समोरच असलेल्या ‘रिव्हिएरा’ इमारतीत यशवंतरावांचा फ्लॅट होता.
नाशिकराव तिरपुडेंचा पोरकटपणा असह्य़ झाल्यानंतर आता काय करायचे यावर विचार करण्यासाठी एका सायंकाळी त्यांनी या फ्लॅटमध्येच एक गुप्त बैठक घेतली. शरद पवार, आबासाहेब खेडकर, भाऊसाहेब नेवाळकर आणि ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवलकर या मोजक्याच आणि चव्हाणांच्या खास विश्वासू व्यक्ती या बैठकीस उपस्थित होत्या. या बैठकीतच सरकार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या आधी राज्यातील आघाडी सरकार सत्तेवरून जाणे कसे आवश्यक आहे याची मीमांसा करणारा लेख गोविंद तळवलकर यांनी लिहावा असेही बैठकीत ठरविण्यात आले. त्यानुसार ‘हे सरकार पडावे ही तो श्रींची इच्छा’ हा तळवलकरांचा लेख प्रसिद्ध झाला. पवारांसाठी हा ग्रीन सिग्नल होता. त्यांनी लगेचच सरकार पाडण्याच्या दिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आणि ते अवघड राजकीय ऑपरेशन यशस्वीरीत्या पूर्णही केले.
पवारांनी त्यानंतर जनता पक्षाच्या सहकार्याने पुरोगामी लोकशाही दल (पुलोद) स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवले आणि दादांच्या नशिबी पुढे काही काळ राजकीय वनवास आला.