Saturday, May 4, 2024
Homeजळगावपावसाची दमदार हजेरी : हतनूर धरणाचे दरवाजे उघडले

पावसाची दमदार हजेरी : हतनूर धरणाचे दरवाजे उघडले

जळगाव ।

जिल्ह्यात शनिवारी रात्री दमदार पावसाने हजेरी लावल्याने हतनूर धरणाचे 20 दरवाजे उघडण्यात आले असून 17660 क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जळगाव शहरातही दमदार पाऊस बरसल्याने वातावरणात गारठा निर्माण झाला होता. धुळे जिल्ह्यासह परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. तर नंदुरबार जिल्ह्यातील बोरद येथे वीज पडल्याने बैल ठार झाल्याची घटना घडली.

- Advertisement -

हतनूरचे वीस दरवाजे उघडले : 17660 क्युसेस पाण्याचा विसर्ग

जिल्ह्यातील हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात 4.84 मिमी. पावसाची नोंद झाली असून जिल्हा परिसरात झालेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे परिणामी हातनुर प्रकल्पाचे 20 दरवाजे अर्धा मीटर उघडण्यात आले असून नदीपात्रात 17660 क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती जिल्हा प्रशासन सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात तापी,पूर्णा नदीच्या तसेच हतनूर धरण परिसरात असलेल्या यावल, रावेर सह जिल्ह्याच्या सीमा शेजारी असलेल्या मध्य प्रदेश तसेच अन्य तालुका परीसरात होत असलेल्या पावसामुळे हातनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे शनिवार दिनांक.4 जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हातनुर प्रकल्पाचे 20 दरवाजे अर्धा मिटर ने उघडून 17 हजार 660 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत माहिती जिल्हा सूत्रांनी दिली आहे.

साक्री तालुक्यातील जामकी परिसरात दमदार पाऊस झाल्याने धनाई-पुनाई फाट्यावरील फरशी वाहून गेली. यामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे.

साक्री तालुक्यातील माळमाथा परिसरात निजामपूर-जैताणेसह टिटाणे परिसर आणि वासखेडी-ब्राम्हणवेल परिसरात पावसाने थैमान घातले असून वासखेडी-ब्राम्हणवेल मार्ग बंद झाला आहे. आज दुपारी निजामपूर-जैताणेसह वासखेडी, रुणमली, चिपलीपाडा, ब्राम्हणवेल, नवापाडा या भागात मुसळधार पाऊस झाला. वासखेडी-ब्राम्हणवेल मार्गावरील धनाई-पुनाई फाट्यावर असणारी मोरी वाहून गेली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

काल देखील निजामपूर-जैताणेसह टिटाणे परिसरात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

धुळे तालुक्यातही पाऊस

शहरासह तालुक्यात आज सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. कालही शहरात झालेल्या पावसामुळे नकाणे तलाव ओसांडून वाहत आहे.

दोंडाईचात पाऊस- शहरासह परिसरात वादळासह दमदार पावसाने सुमारे अर्धा तास हजेरी लावली. यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बोराडीत पाऊस- अचानक सोसाट्याच्या वार्‍यासह संध्याकाळी धुवाँधार पाऊस सुरू झाला. या पावसाने शेतकरीही सुखावला आहे.

बोरद येथे वीज पडून बैल ठार

नंदुरबार । बोरद (ता.तळोदा) येथे आज वीज पडून बैल ठार तर एक जण जखमी झाला आहे. तळोदा तालुक्यात आज सायंकाळी वीजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. बोरद ता.तळोदा येथे वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली. तर अजय जयसिंग ठाकरे हे जखमी झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या