विवाह हा दोन कुटुंबीयांना एकत्र आणणारा आनंदसोहळा! या आनंदात जवळच्या लोकांनाच सहभागी करून घेण्यासाठी त्याला दिले जाणारे मर्यादित सामाजिक स्वरूप समाजानेही स्वीकारार्ह मानले. तथापि अलीकडच्या काळात काही दिवस चालणारे विवाहसोहळे, मानपान, विवाहपूर्व व विवाहानंतरच्या चित्रीकरणाची नवपरंपरा यामुळे विवाहांवर लाखो रुपये खर्च केले जातात. विवाहप्रसंगी आप्तस्वकियांना दिली जाणारी टॉवेल-टोपी आणि फेटे यावरसुद्धा मोठा खर्च केला जातो. त्याला अपवाद सिद्ध होऊ लागले असले तरी विवाहाचा खर्च वधूपक्षाकडून करण्याची परंपरा अजूनही समाजमान्य आहे. मुलीचा विवाहासाठी खर्चाची जुळवाजुळव कशी करायची या कल्पनेनेच तिच्या पालकांच्या पोटात भीतीचा गोळा आला नाही तरच नवल!
तथापि खर्चिक हौसेमौजेला आटोक्यात ठेवण्यासाठी आता काही सामाजिक संस्था पुढाकार घेऊ लागल्या आहेत. विवाहपूर्व चित्रीकरण (प्री-वेडिंग शूट) (Pre-wedding shoot) करू नये, अशा आशयाचा ठराव मराठा महासंघाच्या सोलापूर शाखेने नुकताच केला. त्या ठरावाला समाजबांधवांनी एकमताने मान्यता दिल्याच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. समाजातील जाणते आणि सुजाण लोक या ठरावाचे नक्की स्वागत करतील. अलीकडच्या काळात विवाहसोहळे कमालीचे खर्चिक बनले आहेत. लग्न एकदाच होते, घरातील पहिलेच लग्न आहे, असे म्हणून त्या खर्चाचे समर्थन केले जाते.
आर्थिकदृष्ट्या जे सक्षम आहेत त्यांना खर्चाचा हा भार फारसा डोईजड वाटत नाही. तथापि ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशांनाही खर्चाचा मोह आवरत नाही. त्यांना प्रसंगी कर्ज काढून हौसेचे मोल चुकवावे लागते. कर्ज फेडण्याचा ताण सोसावा लागतो. मराठा महासंघाच्या सोलापूर शाखेने बदलाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. अनेक सामान्य माणसेही विवाह समारंभांत काही अनिष्ट गोष्टींना फाटा देण्याचे धाडस दाखवू लागली आहेत. धाराशिव जिल्ह्यात नुकताच एक विवाह पार पडला. विवाहात उपस्थित पाहुण्या-रावाळ्यांना फेटे बांधले गेले नाहीत. त्याऐवजी त्यांना पुस्तके वाटली गेली. पुस्तके लोकांना जगण्याची वाट दाखवतात म्हणून आपण हा निर्णय घेतला, असे वराच्या पालकांनी सांगितले. हाच पायंडा पाडण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे.
सासवडमधील एका विवाहात वऱ्हाडी मंडळींना पुस्तकांचा आहेर दिला गेला. पुण्यातील एका विवाहात वधूवरांनी फक्त पुस्तकांचा आहेर स्वीकारला. या दृष्टिकोनाचे अनेक फायदे होऊ शकतील. फेटे-शाली यांवर मानपानाच्या नावाखाली विनाकारण होणारा खर्च सहज टाळता येईल. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना अकारण खर्चाला नाही म्हणण्याचे बळ मिळेल. पुस्तक वाटपामुळे वाचनसंस्कृतीलाही पाठबळ मिळू शकेल. वाचनसंस्कृती लयाला चालली आहे, असे सातत्याने बोलले जाते.
तरुण पिढी वाचत नाही, अशा ज्येष्ठांच्या भावना आहेत. पुस्तके तरुणाईपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्याने कदाचित त्यांनाही वाचनाची गोडी लागू शकेल. पारंपरिक सोहळ्यांत नवा विचार करण्याची प्रेरणा मिळू शकेल. कोणताही चांगला बदल होण्याची आणि तो समाजाने स्वीकारण्याची प्रक्रिया अत्यंत संथ असते. त्या बदलाची सुरुवात काहींनी स्वत: बदलून केली आहे. असे प्रयत्न स्वागतार्ह आणि स्तुत्य आहेत. अशा नवपरंपरांना समाजाचे पाठबळ मिळाले तर बदलाच्या पायवाटेचा हमरस्ता होऊ शकेल.