Saturday, July 27, 2024
Homeअग्रलेखसंध्याछाया का भिवविती हृदया?

संध्याछाया का भिवविती हृदया?

ज्येष्ठत्व हा मानवी आयुष्यातील अपरिहार्य टप्पा. आयुष्यभर एका ध्येयाने कार्यरत राहिल्यावर ज्येष्ठत्वाचा काळ मजेत पार पडावा हा अपेक्षा स्वाभाविकच म्हणावी लागेल. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ अशाच त्यावेळी अनेकांच्या भावना असतात. तथापि वास्तव मात्र वेगळे असावे का? संवेदनशील माणसाने अस्वस्थ व्हावे अशी एक घटना नुकतीच उघडकीस आली. एका घरातील आजींचा मृत्यू झाला होता. त्यांचे पती आजाराने अंथरूणाला खिळून होते. त्यामुळे नाईलाजाने ते पत्नीच्या मृतदेहाशेजारी पडून राहिले. दुर्गंधी सुटल्यानांतर शेजाऱ्यांना संशय आला आणि घटना उघडकीस आली. त्या जोडप्याची मुलगी परदेशात स्थायिक आहे. प्रसंग दुर्दैवी खरा. ज्येष्ठांच्या वेदनांना पाझर फोडणारा आणि अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतील असाही.

समाजातील ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. वाढत्या वयाबरोबर त्यांना अनेक समस्या भेडसावतात. शारीरिक आणि मानसिक अवस्थाही कमजोर होते. अनेक प्रकारच्या व्याधी जडतात. अनेकांची आर्थिक परिस्थितीही डळमळीत असते. त्यांचाही ताण त्यांच्यावर असतो. तथापि परिस्थितीचा स्वीकार केला तरच त्यातून मार्ग काढणे शक्य होऊ शकते. तथापि किती ज्येष्ठ परिस्थिती आहे तशी स्वीकारू शकतात? अनेकांची मुले परदेशात स्थायिक आहेत. त्यांचे वयोवृद्ध आईवडील एकटे राहातात हे अनेक घरांमधील वस्तुस्थिती आहे. पण सगळ्याच ज्येष्ठांची मुले दिवटी नसतात. त्यांच्या परीने ते त्यांच्या पालकांची काळजी घेण्याचा प्रयत्न करतही असतील. करत असतात.

- Advertisement -

उपरोक्त घटनेतील जोडप्याच्या घरी देखील काळजीवाहक (केअरटेकर) नेमलेला होता पण त्याला नुकताच काढून टाकला होता असे पोलिसांनी सांगितले. सरकारच्या ज्येष्ठांसाठी अनेक योजना आहेत. सामाजिक संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते ज्येष्ठांचे मदतनीस म्हणून काम करतात. सरकार ज्येष्ठांसाठी एक हेल्पलाइनही चालवते. म्हातारपण मजेत जावे हाच उद्देश असतो. किती ज्येष्ठ त्यांना स्वतःला मदत करायला आणि परिस्थितीचा सकारात्मक पद्धतीने स्वीकार करायला तयार असतात हा खरा प्रश्न आहे. वय वाढले तरी ते कोणावरही अवलंबून नाहीत हे दाखवण्याचा अट्टाहास अनेक ज्येष्ठाकडून केला जातो. वयाची सत्तरी ओलांडून गेल्यानंतरही दुचाकी चालवणारे कितीतरी आजीआजोबा आढळतात. अनेकदा त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा नसतो का? कार्यालयातील निवृत्ती वाजतगाजत स्वीकारली जाते. तथापि त्याच समंजसपणे कुटुंबप्रमुख पदावरून ज्येष्ठ निवृत्त होऊ शकतात का? जे ज्येष्ठ परिस्थिती स्वीकारतात त्यांचा वानप्रस्थाश्रम मजेत जाताना आढळतो. असे ज्येष्ठ नागरिक संघात जातात. त्यांच्या परिसरात त्यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असतात. दुकानदारांचे, पोलिसांचे,

लोकप्रतिनिधींचे, सामाजिक कार्यकर्त्यांचे संपर्क क्रमांक त्यांच्याकडे असतात. समस्या त्यांनाही भेडसावतात पण होकारात्मक पद्धतीने त्यावर मात करणारे ज्येष्ठही समाजात आढळतात. कवी संदीप खरे यांची एक कविता आहे. ‘मी हजार चिंतांनीही डोके खाजवतो, तो कट्ट्यावर बसतो, घुमतो, शीळ वाजवतो’ यातील मर्म ज्येष्ठ लक्षात घेतील का? वयाचा अखेरचा काळ मजेत घालवण्याचा पर्याय सर्वच ज्येष्ठांकडे असतो हेही वास्तव नाही का? तात्पर्य, ज्येष्ठांच्या संध्याछाया त्यांना आणि त्यांच्या मुलांनाही का भेडसावतात याचा विचार सगळेच करतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या