Friday, August 7, 2026
HomeनाशिकNashik News : ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांवर शासनाची नजर

Nashik News : ॲलोपॅथी प्रॅक्टिस करणाऱ्या होमिओपॅथी डॉक्टरांवर शासनाची नजर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

राज्य शासनाने सीसीएमपी उत्तीर्ण झालेल्या बीएचएमए (होमिओपॅथी) डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिन (ॲलोपॅथी) प्रॅक्टिस करण्याची मुभा देत सशर्त नोंदणी सुरू केली असली, तरी आता या डॉक्टरांच्या (Homeopathy Doctors) कार्यक्षमतेवर आणि वैद्यकीय नैतिकतेवर प्रशासनाची नजर असणार आहे.

- Advertisement -

ॲलोपॅथी उपचारादरम्यान होणारा संभाव्य निष्काळजीपणा रोखण्यासाठी आणि स्पष्ट नैतिक चौकट आखण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने उच्चस्तरीय स्वतंत्र समिती गठीत केली आहे. या निर्णयानुसार, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये (एमएमसी) नोंदणी होणाऱ्या या डॉक्टरांच्या मर्यादा, जबाबदाऱ्या आणि निष्काळजीपणाच्या तक्रारींवर कारवाईची पद्धत निश्चित करण्याचे काम ही समिती करणार आहे. ​महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर्स अधिनियम व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियम, १९६५ मधील सुधारणेनुसार सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे (Maharashtra Medical Council) स्वतंत्र नोंदणी करण्याची तरतूद आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) अंतरिम आदेशाच्या (रिट याचिका) अधीन राहून या डॉक्टरांची नोंदणी सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, २८ जुलै २०२६ रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत असा सूर निघाला की, ॲलोपॅथी औषधोपचार करताना रुग्णांच्या सुरक्षेशी तडजोड होता कामा नये. यासाठी केवळ नोंदणी देऊन चालणार नाही, तर या डॉक्टरांची ‘कार्यक्षमता’ आणि ‘वैद्यकीय नैतिकता’ ठरवणे तितकेच गरजेचे आहे.  

​एक महिन्याचा अल्टीमेटम!

​या समितीला शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून एका महिन्याच्या आत आपला सविस्तर अभ्यास अहवाल व शिफारशी शासनाकडे सादर करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. या अहवालानंतरच शासन या डॉक्टरांच्या प्रॅक्टिसबाबत अंतिम सविस्तर नियमावली जारी करेल.  शासनाच्या या निर्णयामुळे एका बाजूला सीसीएमपी डॉक्टरांना दिलासा मिळाला असला, तरी दुसऱ्या बाजूला ॲलोपॅथी उपचारादरम्यान होणाऱ्या संभाव्य चुकींवर व निष्काळजीपणावर प्रशासनाचा अंकुश असणार आहे.  

​समितीची मुख्य कार्यकक्षा

-या उच्चस्तरीय समितीला खालील मुद्द्यांवर अभ्यास करून शिफारशी सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सीसीएमपी अभ्यासक्रमानुसार हे डॉक्टर ॲलोपॅथी उपचारांमध्ये नक्की कोणत्या मर्यादांपर्यंत औषधोपचार करू शकतात, हे स्पष्ट करणे.
-​बीएचएमएष-सीसीएमपी डॉक्टरांकडून उपचारादरम्यान काही निष्काळजीपणा किंवा वैद्यकीय चुकीची घटना घडल्यास त्याविरुद्धच्या तक्रारी हाताळण्यासाठी ‘प्रमाणित कार्यपद्धती’ (एसओपी) तयार करणे.
-​रुग्णांवर उपचार करताना पाळावयाची नैतिक संहिता आणि जबाबदाऱ्या निश्चित करणे.
-​एमएमसीमधील नोंदवहीत नोंदणी झाल्यामुळे या डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येईल की नाही, याबाबतची कायदेशीर भूमिका ठरवणे.

उच्चस्तरीय समितीची रचना

​अध्यक्ष : आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
​सदस्य : वैद्यकीय शिक्षण संचालक व आयुष संचालनालयाचे तांत्रिक प्रतिनिधी
​सदस्य : कुलसचिव, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
​सदस्य : निबंधक, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई
​सदस्य सचिव : प्रबंधक, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, मुंबई

ताज्या बातम्या

संपादकीय : ७ ऑगस्ट २०२६ – जनहिताच्या मुद्यांवर स्पर्धा हवी

0
भारतीय राजकारणात विचार, धोरणे आणि प्रतिवादाची भाषा हा नेहमीच लोकशाहीचा कणा राहिली आहे. राजकीय नेत्यांच्या कार्यशैलीवर, धोरणांवर आणि निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार विरोधी पक्षांना...