Tuesday, April 1, 2025
Homeब्लॉगरविवार ‘शब्दगंध’ : सरकार आपले... पण नेमके कुणाचे?

रविवार ‘शब्दगंध’ : सरकार आपले… पण नेमके कुणाचे?

महाराष्ट्राच्या राजकारणाने अवघ्या दहा दिवसात घेतलेला वेग आणि त्यानंतरची कलाटणी सार्‍यांनी बघीतली आहे. 21 जून ला शिवसेनेत झालेल्या बंडाळीचा अखेर 30 जून ला सत्तातरात झाला आणि महाविकास आघाडीचे सरकार जावून बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे संयुक्त सरकार स्थापन झाले. प्रारंभी सुरत नंतर गुवाहटी आणि त्यानंतर गोव्यात स्थलांतरीत होणार्‍या बंडखोर आमदारांमधून एकनाथ शिंदे यांना पुढे करीत मुंबईत पाठविण्यात आले. केंद्राच्या मदतीने झेड दर्जाची सुरक्षा घेवून दाखल झालेल्या शिंदेनी भाजपाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा दावा केला. यातही ऐनवेळी धक्क्यावर धक्के बसलेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असेच सार्‍यांना वाटत असतांना आणि चित्र स्पष्ट असतांना शपथविधिच्या काही तासांआधी स्वतः फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे केले. हा तमाम महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. मात्र हे सांगतांनाच आपण सत्तेत नसणार आहोत, असे सांगुन फडणवीसांनी दुसरा धक्का दिला. तर केंद्राच्या आदेशाने शेवटच्या मिनीटाला देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्विकारण्यास सांगण्यात आले. हा तिसरा धक्का आपण सार्‍यांनी पाहिला. यामुळे शपथविधीच्या प्रसंगी ऐनवेळी एक खुर्ची वाढविण्यात आली. असो…

महाराष्ट्रात महाविकास आघाडी जावून शिंदेंच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. त्यानंतरच्या नाराजीचे, वेगवेगळे संदर्भ लावून बाहेर आलेले राजकीय नाट्यही पहावयास मिळाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना अभिवादन करुन एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. आपण निष्ठावंत आणि खरे शिवसैनिक असल्याचा दावा त्यांनी केला असतांना माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिंदेचा हा मुद्दा खोडून काढत ‘ते शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही, त्यांनी माझ्या पाठित खंजीर खुपसला’ असे सांगुन सेनेचा मुख्यमंत्री शिंदेशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अडीच वर्ष जेरीस आणण्यास, सेना आमदारांना फोडण्यात, सरकारला पळवून लावण्यात अग्रभागी असलेले, एकहाती नेतृत्व करणारे देवेंद्र फडणीस यांचाच मुख्यमंत्री पदावर दावा होता. असे असतांना त्यांना डावलून तमाम ब्राह्मण समाजाचा भाजपनाने अवमान केला. असे आशयाचे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने काढले. फडणवीसांचे डिमोशन समाजाला रुचलेले नाही हेच यातून सिध्द झाले. स्वतः फडणवीस यांनाही ज्युनियर व्यक्तीच्या हाताखाली काम करणे आवडलेले नाही, हे त्यांच्या चेहर्‍यावरुन स्पष्ट जाणवत असतांनाही पक्षादेश शिरसावद्य माणुन त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर ‘हे सरकार आपलेच आहे’ असे सांगत नाराजांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे.

असे असले तरी…

- Advertisement -

काही असो, निष्ठावंत शिवसैनिक म्हणून दावा करणारे एकनाथ शिंदे आणि नाराजीतूनही कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार विराजमान झाले आहेत. तरिही इतक्या लवकर संभ्रम दूर होणे शक्य नाही. कारण फडणवीसांना डावलले म्हणून तमाम ब्राह्मण समाज आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत, सेनेशी बंडखोरी करुन खंजीर खुपसला म्हणून एकनाथ शिंदेंवर शिवसैनिक नाराज आहे. शिवाय ते स्वतःला निष्ठावंत म्हणून घेत असले तरी त्यांचे नेमके कोण हे अजून स्पष्ट झालेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर काढले म्हणून त्यांच्यातही मोठा संताप आहे. एमआएमचा या सरकारशी काही संबंध नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही नव्या सरकारवर टिकाच केली आहे. तर एकटे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारचे अभिनंदन केले असले तरी विधानभवनात त्यांचे किती? हा प्रश्नच आहे. मग सरकार आपलेच म्हणजे नेमके कुणाचे? हा सध्यातरी संभ्रमाचा प्रश्न आहे.

स्थानिक संदर्भ बदलणार

चार तालुक्यांच्या धुळे जिल्ह्यात विधानपरिषद सदस्य मिळून सहा आमदार आहेत. यापैकी अमरिशभाई पटेल, काशिराम पावरा आणि जयकुमार रावल हे भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. तर धुळे शहरात एमआयएम, धुळे ग्रामीण काँगस आणि साक्रीत अपक्ष आमदार आहेत. यापैकी साक्रीच्या मंजुळा गावीत यांनी निवडून आल्यानंतर सत्ता असलेल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले आणि आता पुन्हा सत्तेसाठी सेनेच्या बंडखोर गटात त्या सहभागी झाल्यात.

राज्यात झालेल्या सत्तांतराचे राज्यभरातील स्थानिक मतदार संघामधील समिकरणे बदलणार आहेत. कारण शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकारला हातात हात घालून अडीच वर्ष गुण्या गोविंदाने नांदायचे असले तरी त्यानंतर येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीचे काय? शिंदे गट स्वतः लढेल, शिवसेनेच्या बाजूने लढेल की, भाजपाशी युती करुन लढेल हे अद्याप निश्चित नाही. मुळात भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष असून भारतात सर्वाधिक ताकदवान आणि महाराष्ट्रात आपली स्वतंत्र ताकद असलेला पक्ष आहे. सन 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपाला शिंदे गटाचे सहकार्य घेण्याची आवश्यकता भासेल असे आज तरी वाटत नाही. म्हणूनच की काय मुख्यमंत्री झाले तरी शिंदे गटाचे समर्थक नेमके कोण? हे उघडपणे समोर यायला तयार नाहीत. असो.

शिरपूरचे अमरिशभाई पटेल यांचा जिल्हाभर असलेला राजकीय दबदबा पाहता ते पुन्हा-पुन्हा पक्ष बदलणार नाहीत तर भाजपाशी एकनिष्ठ राहतील. शिरपूरात अजून तरी ते ठरवतील तो उमेदवार विजयी होईल. शिंदखेड्यात जयकुमार रावलांची आज तरी पकड भक्कम आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांच्या टिममधील निष्ठावंतापैकी एक आहे. यामुळे त्यांचीही चलबिचल होण्याचा प्रश्न येत नाही.

साक्रीच्या आ.मंजुळा गावीत यांनी शिंदे गटाची साथ धरली. आता त्यांचे नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने कदाचीत त्यांच्या साक्री मतदार संघाला काहीसा निधी जास्तही मिळेल. पण त्यानंतर काय? मुळात ज्या साक्री मतदार संघातून तब्बल तीन वेळा भाजपाचे अ‍ॅड.गो.शि. चौधरी निवडून आलेत. युतीच्या काळात कॅबीनेट मंत्रीही झालेत. त्या मतदार संघात आजही भाजपाच्या मतदारांचे पॉकेट असतांना आणि आता साक्री नगरपंचायत देखील भाजपाच्या एकहाती ताब्यात असतांना पुढील निवडणुकीत आ.मंजुळा गावीत यांनी उमेदवारी करायचे ठरविले तरी त्यांच्या विरुध्द भाजपा उमेदवार देणार नाही याची आज शाश्वती काय? भाजपाच्या मतदार संघात अपक्ष निवडून आलेल्या, नंतर सेनेशी हातमिळवणी करुन आता शिंदे गटात सहभागी झालेल्या आ.मंजुळा गावीतांचे पुढील राजकीय भवितव्य तसे आधांतरी असल्याचेच दिसते आहे.

धुळ्यात एमआयएमचे डॉ.फारुख शाह हे विद्यमान आमदार आहेत. मात्र धुळे शहर मतदार संघाची राजकीय समिकरणे विकासापेक्षा धर्म आणि जातीच्या मुद्याशी अधिक निगडीत आहे. अजून दोन वर्षात देशाच्या राजकारणाची हवा कुठे वाहते? राष्ट्रीयत्व आणि हिंदूत्वाचे वारे किती वेगात वाहतात, यावर पुढचे समीकरण अवलंबुन आहे. आज शहराचे आमदार असलेले डॉ.फारुक शाह हे पुन्हा विधानसभा लढतील की, धुळे -मालेगावातील आपला एकगठ्ठा मतदार डोळ्यासमोर ठेवून लोकसभा लढतील, याबाबत मतमतांतरे आहेत. राहिला प्रश्न धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांचा. तर आ. पाटील हे सध्यातरी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. आजोबापासून तीन पिढ्यांचा काँग्रेसशी त्यांचा सख्ख्य घरोबा आहे. गत निवडणुकीत वेगवेगळी आमिषे येवूनही त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही. किंबहूना काँग्रेसकडूनच उमेदवारी करुन भाजपाच्या लाटेतही ते सलग दुसर्‍यांदा निवडून आलेत. परंतु आता एकूणच राजकीय समिकरणे बदलती आहेत. राज्याच्या राजकारणात काँग्रेस महाविकास आघाडीत सत्तेचे वाटेकरी होते तरीही काँग्रेसला प्रदेश पातळीवर पाहिजे तेव्हढे जोमाने काम करता आले नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येणारी नाही. देशाचा कल हिंदुत्वाच्या दिशेने झुकतो आहे. जागतीक पातळीवर सुरु असलेल्या काही देशांमधील वाद, युध्द, देशांतर्गत धार्मीक मतभेद, दंगली यामुळे दोन्ही बाजूने देशवासीयांची मानसीकता प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकांच्या तोंडावर राजकारणाची बदलती हवा विचारात घेवून आ.कुणाल पाटील यांनीही प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला. तर आश्चर्य वाटण्यासारखे अजिबात नाही. त्यातल्या त्यात हातातून गेलेल्या सत्तेचा काहीसा परिणाम मतदार संघात मिळणारा निधी आणि कामांवर होवू शकतो, हेही विचारात घेतले जाईल.

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार असले तरी 120 आमदारांची संख्या पाहता सरकारवर भाजपाचे वर्चस्व राहील हे उघड असल्याने स्थानिक पातळीवर देखील पुढे अडीच वर्ष भाजपाला सुगीचे दिवस राहतील यात शंकाच नाही.

जिल्ह्यात तरी मावळे एकसंघ

शिवसेनेतून बाहेर पडूनही बाळासाहेबांचे नाव घेवून आणि आपण खरे निष्ठावंत शिवसैनिक सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेत दूही निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मुंबई नगरी आणि ठाण्यासह उपनगरात काहीठिकाणी त्यांचे समर्थक समोर येत आहेत. यामुळे सेना कोणाची? कोणती शिवसेना आपली असे म्हणत कोणता झेंडा घेवू हाती असा प्रश्न शिवसैनिकांना पडत असावा. मात्र धुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांचे कौतुकच करायला हवे. राजकारणाच्या प्रचंड संभ्रमीत वातावरणातही भगव्याखाली संघटीत होवून मातोश्रीचा आदेश मानीत इथले मावळे एकसंघ आहे, हे मात्र खरे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...