सनदी परीक्षा घेण्यासाठी भारतात लोकसेवा आयोगांची स्वतंत्र व्यवस्था आहे. राज्यघटनेतील तरतुदीनुसार हे आयोग स्थापन करण्यात आले आहेत. केंद्रीय पातळीवर विविध सेवांतील पदभरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग तर राज्यांतील सरकारी पदभरतीसाठी राज्य लोकसेवा आयोग काम करतात. विभिन्न संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिराती देणे, उमेदवारांच्या लेखी परीक्षा घेणे, प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नंतर पात्र उमेदवारांची निवड करून त्यांची नावे सरकारकडे पाठवण्याचे काम आयोगांकडून केले जाते. आयोगांचे कामकाज तटस्थ आणि पारदर्शीपणे चालते, असे सांगितले जाते. त्यामुळे उमेदवार निवडीत वशिलेबाजीसारख्या गैरप्रकारांना थारा नसतो, असाही दावा केला जातो. सरकारी पदभरती प्रक्रियेसाठी अत्यंत विश्वासार्ह आणि खात्रीची सरकारी व्यवस्था म्हणून लोकसेवा आयोगांकडे पाहिले जाते. तथापि याच विश्वासाला तडा देणार्या काही घटना हल्ली घडत आहेत. आयोगांच्या कारभारात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे कामकाजात सुलभता आणि गतिमानता आली आहे. त्यासोबतच सायबर सुरक्षेचे धोकेही निर्माण झाले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला त्याचा मोठा धक्का परवा रविवारी बसला. आयोगामार्फत येत्या 30 एप्रिलला गट ब आणि गट क पदांसाठी संयुक्त पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. सरकारी नोकरीचे स्वप्न साकार करण्यासाठी परीक्षार्थी सज्ज झाले आहेत. परीक्षार्थींना त्यांची प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणाली संकेतस्थळावर तसेच तात्पुरत्या बाह्यदुव्याद्वारे (लिंक) उपलब्ध करून देण्यात आली. मात्र त्यानंतर जवळपास 90 हजार परीक्षार्थींची प्रवेशपत्रे उघड होऊन ती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याच्या बातम्या माध्यमांत झळकल्या आणि एकच खळबळ माजली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे प्रशासनही या आकस्मिक प्रकाराने हादरून गेले. केवळ प्रवेशपत्रेच नव्हे तर परीक्षेची प्रश्नपत्रिकाही फुटल्याचा दावा प्रसारित लिंकवर करण्यात आला. याशिवाय परीक्षार्थींची ऑनलाईन पोर्टल लॉगिन, फी पावती, अपलोड केलेली कागदपत्रे, आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आयडी आदी बरीच माहितीही आपल्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे. झाला प्रकार लक्षात येताच आयोगाने परिस्थितीवर तत्काळ नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. घडल्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरणही दिले. ठरल्या वेळापत्रकानुसारच परीक्षा घेतली जाईल, असेही आयोगाकडून जाहीर करण्यात आले. केवळ बाह्यदुव्याद्वारे (बाह्यलिंक) उपलब्ध केलेली प्रवेशपत्रेच समाज माध्यमांवर दिसत होती. विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती अथवा प्रश्नपत्रिका फुटलेली नाही, माहिती फुटल्याचा लिंकवर केलेला दावा धादांत खोटा आहे, असे आयोगाकडून खात्रीने सांगण्यात आले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजवरच्या कारकिर्दीत आयोगाची माहिती संकेतस्थळावरून फुटण्याची ही पहिलीच वेळ असावी. परीक्षार्थीची वैयक्तिक माहिती सुरक्षित असल्याचा दावा आयोगाकडून करण्यात आला असला तरी तो किती खरा मानावा? परीक्षार्थींची प्रवेशपत्रे आणि प्रश्नपत्रिका फुटण्याची ही घटना पाहता प्रश्नपत्रिका रद्द करण्याचा पर्याय आयोगापुढे आहे, पण तसे करायचे झाल्यास परीक्षाच रद्द करावी लागेल. तसे करण्याच्या मन:स्थितीत आयोग दिसत नाही. ठरल्याप्रमाणेच परीक्षा घेण्यावर आयोग ठाम आहे. आज प्रवेशपत्रे फुटली, प्रश्नपत्रिका फुटली; उद्या कदाचित परीक्षार्थींच्या वैयक्तिक माहितीत बदलही केले जाऊ शकतात. परीक्षांचे निकालही फुटू शकतील अथवा त्यात फेरफाराचे प्रकारही घडू शकतात. या शक्यता नाकारता येतील का? परीक्षार्थींची वैयक्तिक माहिती आणि आधार क्रमांकांचा गैरवापर झाला तर काय? याचाही विचार करणे जरूर आहे. भविष्यात ऑनलाईन अर्जप्रणाली संकेतस्थळावरील गोपनीय माहिती पुन्हा फुटू नये, तसे करणे हॅकर्सना शक्य होऊ नये म्हणून आपली ऑनलाईन अर्जप्रणाली यंत्रणा अधिक सुरक्षित आणि निर्धोक करण्यावर आयोगाने भर दिला पाहिजे. त्याबाबत चालढकल वा हलगर्जीपणा झाल्यास त्यातून मोठा गहजब घडू शकतो. स्पर्धा परीक्षा देणे व त्या उत्तीर्ण होणे हे परीक्षार्थींपुढील आव्हान आहे, पण परीक्षार्थींची व्यक्तिगत माहिती, प्रवेशपत्रे आणि इतर गोपनीय माहिती सुरक्षित ठेवणे हे आयोगापुढचे महाआव्हान आहे.