Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Assembly Election 2024 : सिन्नरला महायुतीचा महाजल्लोष

Maharashtra Assembly Election 2024 : सिन्नरला महायुतीचा महाजल्लोष

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी; कोकाटे समर्थकांची पुन्हा दिवाळी

सिन्नर । वार्ताहर Sinnar

सिन्नर विधानसभेची चुरशीची बोलली जाणारी निवडणूक प्रत्यक्षात एकतर्फी ठरली. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांनी 40 हजार 884 मतांनी महाविकास आघाडीचे उमेदवार उदय सांगळे यांना पराभूत करीत पाचव्यांदा विधानसभेत प्रवेश केला.

- Advertisement -

आमदार माणिकराव कोकाटे यांना 1 लाख 38 हजार 656 मते तर उदय सांगळे याना 97 हजार 681 मते मिळाली. कोकाटे यांनी मोठा विजय मिळवत तालुक्यात कोकाटे पर्व जोरात असल्याचे दाखवून दिले.

पहिल्या फेरीत कोकाटे यांनी सांगळे यांच्यावर आघाडी मिळवली. मात्र, दुसर्‍याच फेरीत सांगळे यांनी कोकाटे यांची आघाडी मोडून काढली. त्यानंतर तिसर्‍या फेरीपासून कोकाटे यांची फेरीनिहाय मोठ्या आघाडीकडे घोडदौंड सुरु झाली. अर्ध्या अधिक फेर्‍यांतच निवडणुकीचा कल स्पष्ट दिसू लागल्याने सांगळे समर्थकांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरातून काढता पाय घेण्यास सुरुवात केली. तर कोकाटे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली.

सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीसाठी 14 टेबल मांडण्यात आले होते. पहिल्या फेरीचा निकाल 8.30 च्या दरम्यान आला. त्यात कोकाटे यांनी 6237 मते मिळवित सांगळे (5927) यांच्यापेक्षा 310 मते जादा घेऊन आपल्या आघाडीचा श्रीगणेशा केला. मात्र, दुसर्‍या फेरीत सांगळे यांनी मुसंडी मारत 11940 मते घेतली. कोकाटे यांना 11 हजार 344 मते मिळाली. या फेरीत सांगळे यांनी कोकाटे यांच्यावर 596 मतांची आघाडी मिळवली.

तिसर्‍या फेरीत कोकाटे यांनी सांगळे यांना पुन्हा मागे टाकले. तिसर्‍या फेरी अखेर 19524 मते मिळवत त्यांनी आघाडी घेतली. ही आघाडी पाच हजारांच्या (5901) पूढे गेली. चौथ्या फेरीत सांगळे हे कोकाटेंची आघाडी काहीशी कमी करण्यात यशस्वी ठरले. यात कोकाटे यांची आघाडी कमी होवून 3252 इतकी राहिली. पाचव्या फेरीपर्यंत कोकाटे यांना एकुण 29 हजार 61 तर सांगळे यांना 22 हजार 324 मते मिळाली. यात कोकाटे यांची आघाडी 6 हजार 737 वर पोहोचली. सहाव्या फेरीत एकतर्फी मते घेत कोकाटे यांची आघाडी 13 हजार 318 इतकी झाली. या फेरीपासून कोकाटे यांच्या आघाडीचा वारु सांगळे रोखू शकले नाहीत. सातव्या फेरीत 16 हजार 603 मतांची आघाडी कोकाटे यांना मिळाली. आठव्या फेरीत 18 जार 238 तर नवव्या फेरीत 22 हजार 249 मतांवर आघाडी पोहोचली.

11 व्या फेरीपासून कोकाटे यांची आघाडी अधिकच वाढत गेली. अकराव्या फेरीत कोकाटे हे सांगळे यांच्यापेक्षा 27481 मतांनी पुढे गेले. बाराव्या फेरीत हा फरक अधिक वाढला. यात 30 हजार 765 मतांची आघाडी झाली. त्यानंतर पुढील प्रत्येक फेरीत कोकाटे तीन ते चार हजार मते जास्त मिळवत गेले. 16 व्या फेरीत कोकाटे यांना 42 हजार 366 मतांची आघाडी होती. 17 व्या फेरीत कोकाटे याना काहीसे रोखण्यात सांगळे यांना यश आले. यात कोकाटे यांची आघाडी कमी होवून 40 हजार 125 वर आली.

18 व्या फेरीत कोकाटे याच्या एकुण मतांची बेरीज 1 लाख 8 हजार 843 इतकी होती. तर सांगळे यांना एकुण 69 हजार 931 मते मिळाली. या फेरीत पुन्हा सांगळे यांनी आघाडी कमी करुन कोकाटे यांना 38 हजार 912 वर आणले. 20 व्या फेरीपासून सांगळे यांनी कोकाटे यांचा वेगाने पुढे जाणारा वारु रोखून धरला. या फेरीपासून सांगळे यांनी चांगली लढत दिली. मात्र, दोघांमधील फरक फार नव्हता. 21 व्या फेरीपर्यंत कोकाटे यांना 40 हजार 390 मतांची आघाडी मिळाली.

अखेरच्या 25 व्या फेरीपर्यंत कोकाटे यांना एकुण 1 लाख 38 हजार 565 मते मिळाली. तर उदय सांगळे यांना 97681 मते मिळाली. त्यामूळे कोकाटे यांनी 40 हजार 884 मतांच्या फरकानेे सांगळे यांचा पराभव करीत विजयश्री खेचून आणली. संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी; शहरात कोकाटे समर्थकांची पुन्हा दिवाळी
आमदार माणिकराव कोकाटे यांच्या विजयाचा जल्लोष 12 व्या फेरीपासूनच साजरा केला जावू लागला होता. कोकाटे यांच्या विजयाचे बॅनरही घोषणेआधीच शहरातील चौकाचौकात लागले गेले. उत्साही कार्यकर्त्यांनी डंपर भरुन गुलाल आणला होता. कोकाटे यांचे तहसील कार्यालयाजवळ आगमन होताच समर्थकांकडून गुलालाची जोरदार उधळण करण्यात आली.
.
तहसील कार्यालयात आमदार कोकाटे येताच समर्थकांनी घोषणाबाजी केली. निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र भारदे यांनी कोकाटे यांना विजयाचे प्रमाणपत्र दिले. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र देशमुख, रितेश बैरागी, खर्च निरीक्षक गायत्री यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते. विजयाचे प्रमाणपत्र घेवून कोकाटे तहसीलबाहेर येताच मिरवणुकीला सुरुवात झाली. परिसर गुलालाने न्हाऊन निघाला होता. कोकाटे साहेब आगे बढोच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

शहरातील मुख्य मार्गावरुन काढलेल्या मिरवणुकीचे चौकाचौकात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी जेसीबीतून फुलांच्या भव्य माळा सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. मिरवणूकीतील कार्यकर्त्यांच्या हातात आ. कोकाटे यांच्याबरोबरच खासदार राजाभाऊ वाजे यांचेही कटआऊट दिसत होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या