खलिस्तानी दहशतवादाचा धोका वाढत असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने होत आहेत. विशेषतः आता पंजाबमध्ये खलिस्तानी शक्ती अधिक शिरजोर होऊ लागल्या आहेत. त्यांच्या कारवाया वाढत चालल्या आहेत. मोहालीतील गुप्तचर खात्याच्या कार्यालयावर झालेला हल्ला असेल अथवा सिमल्यात विधानसभेवर खलिस्तान्यांनी फडकावलेला झेंडा असेल; याबाबत गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे.
पाकिस्तान आणि चीन हे भारताचे पारंपरिक शत्रू गेल्या काही वर्षांपासून खलिस्तानी दहशतवादाचेे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न जोमाने करत आहेत.
वास्तविक, विधानसभा निवडणुकांनंतरचे पंजाबमधील सध्याचे वातावरण पाहून 1980 च्या दशकातील खलिस्तानी चळवळींसारखीच स्थिती आताही निर्माण होते की काय अशी भीती वाटू लागली आहे. पंजाबमध्ये ड्रोनच्या मदतीने आरडीएक्स आणले जात आहे, रॉकेट प्रॉपेर्ड ग्रेनेडस् म्हणजेच आरपीजी आणले जात आहे. काही दिवसांपूर्वी मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या कार्यालयाच्या तिसर्या मजल्यावर आरपीजीच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. तिसर्या मजल्यावर जाणे तसे सोपे नाही. परंतु रॉकेट प्रॉपेर्ड ग्रेनेडची रेंज दीड ते दोन किलोमीटर इतकी असते. परंतु रॉकेट लाँचरच्या सहाय्याने खालून हा हल्ला करण्यात आला. ही गंभीर घटना आहे. कारण अशा प्रकारे रॉकेट लाँचरद्वारे हल्ला यापूर्वी कधीही झाला नव्हता, हे लक्षात घ्यायला हवे.
मोहालीतील गुप्तचर खात्याच्या इमारतीत गुप्तचर विभागाच्या प्रमुखांसह अनेक बडे अधिकारी असतात. अशा संवेदनशील ठिकाणाला दहशतवाद्यांनी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. गुप्तचर खात्याच्या इमारतीवर ग्रेनेड टाकण्यासाठी हल्लेखोर एकदाच आले असे नाही. त्यांनी तीन-चार वेळेस या भागाची रेकी केल्याचेही उघड झाले आहे. दहशतवाद्यांनी एवढी रेकी करूनही त्याची भनक कोणालाही लागली नाही, हे धक्कादायकच आहे.
काही दिवसांपूर्वी हरियाणामधील कर्नाल येथून चार दहशतवादी पकडण्यात आले होते. या दहशतवाद्यांकडून तीन आयईडीज आणि एक पिस्तूल व 31 काडतुसे जप्त करण्यात आली होती. या दहशतवाद्यांचा संबंध बब्बर खालसा या दहशतवादी गटाशी आहे. तरमतारम या भागात चार किलो आरडीएक्स जप्त करण्यात आले होते. डिसेंबर 2021 मध्ये पंजाबमध्ये दोन किलो आरडीएक्सचा स्फोट झाला होता आणि त्यामध्ये एकजण मरण पावला होता आणि चारजण जखमी झाले होते. त्यापूर्वी नोव्हेंबर 2021 मध्ये पठाणकोटमध्ये लष्कराच्या कॅन्टोन्मेंटजवळ एक स्फोट झाला होता. हा ग्रेनेड हल्ला असण्याची शक्यता वर्तवली गेली होती. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या जलालाबाद या पंजाबमधील एका छोट्या गावात मोटारसायकलचा स्फोट झाला होता. 13 ऑगस्ट 2021 रोजी पंजाबमध्ये एक हँडग्रेनेड सापडले होते. मोहालीतील हल्ल्याचा एकूण तपास आणि त्यातून आलेली माहिती पाहता हा एक सुनियोजित कट असल्याचे दिसून येते.
विधानसभा निवडणुकांच्या पूर्वीपासून आणि प्रचाराच्या काळातही हा विषय चर्चिला जात होता की, पाकिस्तान ड्रोनच्या मदतीने पंजाबमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना रसद पुरवत आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2021 मध्ये ड्रोनच्या 59 हालचाली नोंदवण्यात आल्या आहेत. यातील काही ड्रोन्सना पाडण्यात आले. पण पाडण्यात न आलेल्या अनेक ड्रोन्समधून दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून रसद पुरवली गेली असण्याची दाट शक्यता आहे.
पंजाबच्या सीमेवरून एक सबमशिनगन, एक रायफल, एक एके47 रायफल, एक बंदूक अशा प्रकारची अनेक शस्रास्रे पाठवली जाताहेत. पूर्वी ही शस्रास्रे माणसाकडून पाठवली जायची. परंतु आता सीमेवर कुंपण घालण्यात आले आहे. तसेच बीएसएफचे जवान तेथे तैनात आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरून पाकिस्तान मोठ्या प्रमाणावर अफू, चरस, गांजा यांसारख्या अंमली पदार्थांसह शस्रास्रे, दारुगोळा पाठवत आहे, स्मगलिंग जोरदार सुरू आहे. त्यामुळे सीमेवरील सुरक्षा अधिक भक्कम, चौकस करण्याची गरज आहे.
सुरक्षा यंत्रणांनी अलीकडील काळात पाकिस्तानच्या सीमेतून आलेली ड्रोन्स पाडली असली तरी त्याअपरोक्ष किती तरी ड्रोन्स आतमध्ये आलेली आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
खलिस्तानी चळवळींचा विचार करता काही महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकर्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला खलिस्तानी शक्तींनी मदत केल्याची चर्चा झाली होती. 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर कशा प्रकारे हल्ला झाला होता आणि राष्ट्रध्वजाचा कसा अपमान केला गेला, हेही देशाने पाहिले आहे. शीख फॉर जस्टिस संघटनेचा जसवंतसिंग पन्नू हा अशा प्रकारच्या उलटसुलट कारवाया करण्यासाठी कूप्रसिद्ध राहिला आहे. पंजाबमध्ये आणि काश्मीरमध्ये कार्यरत असणार्या दहशतवाद्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयने लष्करे खालसा नावाचा एक गट तयार केला आहे. या गटाला अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या सहाय्याने विशेष प्रशिक्षणही दिले जात आहे. त्यामुळे या परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून राहणे गरजेचे आहे.
काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातून पंजाबमध्ये येत असलेल्या काही गाड्यांना अडवून त्यांच्याकडून खलिस्तान्यांनी खंडणी वसूल केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. खलिस्तान्यांना पाकिस्तानातून आणि देशातील काही घटकांकडून मदत मिळत असल्यामुळे त्यांच्या कारवाया वाढत जाताना दिसताहेत. हिमाचल प्रदेशची राजधानी सिमलामध्ये विधानसभेवर खलिस्तानचा झेंडा लावला गेला आणि खलिस्तान झिंदाबादच्या घोषणाही दिल्या गेल्या. यावरून खलिस्तान्यांची मजल कुठवर गेली आहे, याची प्रचिती येते.
या सर्व घटनांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. केवळ सुरक्षा दलांनीच नव्हे तर पंजाब आणि शेजारच्या अन्य राज्यांतील सर्वसामान्य नागरिकांनीही अत्यंत सतर्क, सजग राहून भोवतालच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. कारण दहशतवाद मग तो कोणताही असो त्याची किंमत अंतिमतः समाजालाच मोजावी लागते आणि ती भीषण असते.